दांडिया उत्सवात गैर-हिंदूंना प्रवेश देऊ नये; विश्व हिंदू परिषदेची गरबा आयोजकांना सूचना
22-Sep-2025
Total Views |
मुंबई (प्रतिनिधी) : दांडिया हा हिंदूंचा सांस्कृतिक सोहळा असल्याने या कार्यक्रमात गैर-हिंदूंना सहभागी होऊ देऊ नये. जर कोणत्याही आयोजकाने अशा लोकांना परवानगी दिली तर विश्व हिंदू परिषद त्याला विरोध करेल, असा इशारा विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते डॉ. रविनुथला शशिधर यांनी दिला. विश्व हिंदू परिषदेच्या तेलंगणा विभागाद्वारे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
त्यांनी सांगितले की, दांडिया हा हिंदूंचा सांस्कृतिक सोहळा असल्याने प्रत्येक कार्यक्रमस्थळी श्री दुर्गामातेचे छायाचित्र लावून विशेष पूजन करण्यात यावे. तसेच फक्त हिंदू धर्मियांनीच यात सहभागी व्हावे. खाजगी आयोजकांकडून तिकीट विक्री होत असल्याने अनेक गैर-हिंदू आत प्रवेश करून मुलींशी गैरवर्तन करतात. तसेच 'लव्ह जिहाद' सारखी कृत्ये करतात. कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला कपाळावर टिळा लावणे बंधनकारक असावे तसेच सरकारमान्य ओळखपत्र दाखवल्यानंतरच प्रवेश द्यावा.
ते पुढे म्हणाले की, आयोजकांनी ब्रेथलायझर चाचण्या करूनच लोकांना आत सोडावे. जेणेकरून दारू पिऊन कुणीही या सोहळ्यात येणार नाही. पोलिसांनीही पुरेशा प्रमाणात महिलांविरुद्ध होणारी छेडछाड थांबवणाऱ्या 'SHE तुकड्या' तैनात कराव्यात. आयोजकांनी मनमानी वागणूक दाखवली तर विश्व हिंदू परिषद त्याला योग्य उत्तर देईल, असा इशारा शशिधर यांनी दिला.