वॉशिंग्टन : (Ohio Plane Crash) अमेरिकेतील ओहायो येथील यंग्सटाऊन-वॉरन विमानतळावर झालेल्या खासगी विमान अपघातात सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती आहे. विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही क्षणातच हे विमान कोसळले आणि भयंकर स्फोट झाला. या दुर्घटनेत प्रसिद्ध उद्योगपतीसह कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. हे कुटुंब मॉन्टाना येथील बोजमन येथे सुट्टीसाठी निघाले होते. याशिवाय विमानाचे दोन्ही वैमानिक या भीषण अपघातात मृत पावले आहेत.
या दुर्घटनेतील मृतांची ओळख पटली असून यामध्ये वैमानिक जोसेफ मॅक्सिन (६३), सह-वैमानिक टिमथी ब्लेक (५५) आणि प्रवाश्यांमध्ये प्रसिद्ध उद्योगपती जेम्स वेलर (६७) त्यांच्या पत्नी वेरोनिका वेल्लर (६८) त्यांचा मुलगा जॉन वेल्लर (३६) आणि त्यांची पत्नी मारिया वेल्लर (३४) यांचा समावेश आहे. ब्लेक आणि इतर प्रवासी हे हब्बार्ड येथील तर मॅक्सिन हे कॅनफिल्ड येथील रहिवासी होते.
दरम्यान एफएए आणि नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड हे या अपघाताचा तपास करत आहेत, मात्र त्यांनी अपघाताच्या कारणांबद्दल अद्याप कोणतेही विधान केलेले नाही. तसेच त्यांनी नागरिकांना त्यांच्या सीसीटीव्ही कॅमे-यात अपघात रेकॉर्ड झाला असेल किंवा तपासात मदत करू शकेल अशी इतर काही माहिती असेल तर त्यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\