नवी दिल्ली : केंद्रीय सहकार मंत्रालयातर्फे 30 जून रोजी नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सहकार मंत्र्यांची मंथन बैठक केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे.
सहकारी क्षेत्राला बळकटी देण्यासाठी ही बैठक महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या बैठकीत सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे सहकार मंत्री तसेच सहकार विभागांचे अतिरिक्त मुख्य सचिव, प्रमुख सचिव आणि सचिव सहभागी होणार आहेत. या मंथन बैठकीचे मुख्य उद्दिष्ट सहकार मंत्रालयाच्या आतापर्यंतच्या उपक्रमांचा आणि योजनांचा सर्वंकष आढावा घेणे, प्रगतीचे मूल्यमापन करणे आणि राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांकडून अनुभव, उत्तम पद्धती आणि रचनात्मक सूचनांचे आदान-प्रदान सुनिश्चित करणे आहे.
या बैठकीत ग्रामीण भागात सेवा वितरण सुधारण्यासाठी 2 लाख नवीन बहुउद्देशीय प्राथमिक कृषि कर्ज सोसायट्या, डेअरी आणि मत्स्य सहकारी समित्यांच्या स्थापनेवर चर्चा होईल. याशिवाय, खाद्य सुरक्षा बळकट करण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे सशक्तीकरण करण्यासाठी ‘विश्वातील सर्वात मोठी अन्न भंडारण योजना’ यावर विचारविनिमय केला जाईल. ‘सहकारातून सहकार’ मोहीम आणि ‘आंतरराष्ट्रीय सहकारिता वर्ष 2025’ अंतर्गत राज्यांची प्रगती आणि सहभाग यावरही चर्चा होईल.
याशिवाय, त्रिभुवन सहकारी युनिव्हर्सिटीच्या स्थापनेसह सहकारी क्षेत्रातील मानव संसाधन विकास, प्रशिक्षण आणि क्षमता निर्माण यावरही चर्चा होईल. सहकारी बँकांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारने उचललेल्या पावलांचा आढावा घेतला जाईल.