भारताशी व्यापार करार लवकरच; चर्चा अंतिम टप्प्यात – ट्रम्प

    17-Jul-2025   
Total Views |

नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संकेत दिले की भारत आणि अमेरिका यांच्यातील बहुप्रतिक्षित अंतरिम व्यापार करार लवकरच पूर्ण होऊ शकतो. ट्रम्प म्हणाले की या प्रस्तावित कराराअंतर्गत अमेरिकन कंपन्यांना भारतीय बाजारपेठेत अधिक प्रवेश मिळेल, जो अमेरिका आणि इंडोनेशियामधील व्यापार करारासारखाच असेल.

भारत आणि अमेरिका या व्यापार करारासाठी वाटाघाटी करत आहेत जेणेकरून दोन्ही देशांमधील कर २० टक्क्यांपेक्षा कमी ठेवता येईल. ट्रम्प यांनी पत्रकारांना सांगितले की, आम्ही इंडोनेशियाशी करार केला आहे. अमेरिकेस इंडोनेशियाच्या बाजारपेठेत पूर्ण प्रवेश मिळाला आहे. त्यांनी असेही सांगितले की त्यांचे प्रशासन काही इतर व्यापार करारांची घोषणा करणार आहे आणि या संदर्भात भारताचाही उल्लेख केला आहे.

या करारांतर्गत, अमेरिकेला इंडोनेशियाच्या बाजारपेठेत पूर्ण प्रवेश मिळेल, तर इंडोनेशियातून येणाऱ्या उत्पादनांवर अमेरिकेत १९ टक्के कर आकारला जाईल. याशिवाय, इंडोनेशियाने १५ अब्ज डॉलर्सची ऊर्जा, ४.५ अब्ज डॉलर्सची कृषी उत्पादने आणि ५० बोईंग विमाने अमेरिकेकडून खरेदी करण्याचे आश्वासन दिले आहे.