मुंबई : मुंबई महानगर क्षेत्रातील शीव (सायन) व बेलासिस उड्डाणपुलांच्या कामांना वेग मिळत असून, ही कामे गतीने आणि नियोजनबद्ध रितीने पूर्ण करण्यावर भर द्यावा. रेल्वे प्रशासनासह समन्वय साधत कामाचे सुयोग्य नियोजन करावे. बेलासिस पूल दि.१५ डिसेंबर २०२५ पर्यंत आणि शीव (सायन) उड्डाणपुल दि.३१ मे २०२६ पर्यंत पूर्ण झाला पाहिजे, अशी ठोस कालमर्यादा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी निश्चित केली आहे.
शीव पूर्व - पश्चिम भागांना जोडणारा शीव (सायन) उड्डाणपूल आणि ताडदेव ते नागपाडा आणि मुंबई सेंट्रल स्थानकाला जोडणारा बेलासिस उड्डाणपूल या दोन्ही रेल्वे उड्डाणपुलांच्या पुनर्बांधणीचे काम बृहन्मुंबई महानगरपालिकेने हाती घेतले आहे. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी या दोन्ही प्रकल्प कार्यस्थळास प्रत्यक्ष भेट देऊन प्रगतीचा स्वतंत्रपणे आढावा घेतला.
अभिजीत बांगर म्हणाले की, शीव पुलाच्या दक्षिण बाजूकडील पादचारी पुलाचे काम रेल्वे विभागामार्फत सुरू असून ते दि.३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत पूर्ण केले जाईल. त्यानंतर,मुख्य पुलाच्या दक्षिणेकडील भागाच्या तोडकामास सुरूवात केली जाईल. त्याचवेळी पुलाखालील जुन्या पुलाच्या भिंतीचे तोडकामदेखील सुरू केले जाईल. नोव्हेंबर महिन्यात उत्तर भागातील तर, जानेवारी महिन्यात दक्षिण भागातील गर्डर स्थापित करण्यात येतील. त्यानंतर रेल्चे हद्दीतील इतर कामे पूर्ण केली जातील. पोहोच मार्गापैकी पश्चिमेकडील पोहोच मार्ग अधिक महत्त्वाचा आणि गुंतागुंतीचा आहे. पैकी लाल बहादूर शास्त्री मार्गावरील भुयारी मार्ग पूर्णत्वास आला आहे. त्या पोहोच मार्गाचे काम प्राधान्याने पूर्ण केले जाईल. दि. १ ऑक्टोबर २०२५ पासून दुस-या भुयारी मार्गाचे काम हाती घेण्यात येईल. धारावी आणि लाल बहादूर शास्त्री मार्गाकडे जाणा-या पोहोच रस्त्यांची कामे मार्च २०२६ पर्यंत पूर्ण केली जातील. रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे हद्दीतील कामे दि. १५ मे २०२६ पर्यंत पूर्ण करून संपूर्ण पोहोच मार्ग बीएमसीला उपलब्ध करून दिला जाईल. पूर्वेकडील उर्वरित पोहोच मार्गाचे काम १५ दिवसात पूर्ण करून शीव उड्डाणपूल दि.३१ मे २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत, असे देखील बांगर यांनी नमूद केले.
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर पुढे म्हणाले की, बेलासिस पूल प्रकल्प पूर्णत्वाचा कालावधी एप्रिल २०२६ पर्यंत आहे. मात्र, बेलासिस पुलाचे बांधकाम नियोजित कालावधीपूर्वी पूर्ण करून डिसेंबर २०२५ अखेरपर्यंत वाहतुकीस खुला करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. पूल बांधकामास अडथळा ठरणारी १३ बांधकामे हटविण्यासाठी पर्यायी घरांचे वाटप करण्यात आले आहे. रेल्वेचे गर्डर येण्यासाठी नियोजनापेक्षा काही प्रमाणात विलंब झाला आहे. सद्स्थितीत लोखंडी गर्डर प्रकल्पस्थळी आले आहेत. हे काम दि. १० ऑगस्ट २०२५ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्यानंतर पश्चिम दिशेच्या पोहोच मार्गातील राहिलेल्या एका खांबाचे काम सुरू करण्यात येईल. दि.१४ सप्टेंबर २०२५ पर्यंत रेल्वे भागातील काँक्रिट टाकण्याच्या कामासह इतर सर्व कामे पूर्ण केली जातील. त्यानंतर, दोन्ही पोहोच मार्गांची कामे हाती घेऊन एकंदरीत दि.१५ डिसेंबर २०२५ पर्यंत पुलाचे संपूर्ण काम पूर्ण होईल, असे नियोजन आहे, असे अभिजीत बांगर यांनी नमूद केले.