मुंबई : राज्यात आता काय होणार? अशा बातम्या सुरु आहेत. जे राज्याच्या मनात आहे तेच मी करेन, असे विधान उद्धव ठाकरेंनी केले आहे. गुरुवार, १९ जून रोजी सायन येथील षण्मुखानंद सभागृहात आयोजित शिवसेनेच्या ५९ व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी उबाठा गटाच्या सर्व प्रमुख नेत्यांसह शिवसैनिक उपस्थित होते. उद्धव ठाकरे म्हणाले की, "राज्यात आता काय होणार? अशा बातम्या सुरु आहेत. जे होणार ते होणारच. जे राज्याच्या मनात आहे तेच मी करेन. पण मराठी माणसाची शक्ती एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी सुरु आहेत. आम्ही मुंबई परत आमच्या ताब्यात घेणार आहोत. मी आज तयारीने उभा आहे," असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "हा जल्लोष पाहून शिवसेनेला ५९ वर्षे झाली यावर कुणाला विश्वास बसणार नाही. शिवसेना आजही तरुण आहे आणि नेहमी तरुणच राहणार आहे. आम्ही इंडियन मुजाहिद्दीन आहोत तर मग जगभर तुम्ही न केलेल्या शौर्याचे कौतूक सांगण्यासाठी आमच्या पक्षाचे खासदार का पाठवले? तुम्ही जगभर फिरलात पण कठीण काळात तुमच्या बाजूने एकही मित्र उभा राहिला नाही. आम्ही तुमच्यासोबत उभे राहिलोत. आमची तुलना तुम्ही देशद्रोह्यांसोबत करता आणि संकट आल्यावर आमचेच खासदार पाठवता."
माझे हिंदूत्व म्हणजे राष्ट्रीयत्व!
"माझे हिंदूत्व म्हणजे राष्ट्रीयत्व आहे, असे शिवसेनाप्रमुखांनी सांगितले. आम्ही हिंदू आहोतच पण त्याचबरोबर राष्ट्रधर्म पाळणारे कट्टर देशाभिमानी हिंदू आहोत. या देशासाठी जो कुर्बानी द्यायला तयार आहे तो कुणीही असला तरी आमचा आहे. शिवसेनाप्रमुखांनी मराठी माणसांवर होणाऱ्या अन्यायाचा मुकाबला करण्यासाठी आणि हिंदूत्वाच्या रक्षणासाठी शिवसेनेची स्थापना केली. शेठजींचे बुट चाटण्यासाठी शिवसेनेची स्थापना केली नाही. ही लढाई केवळ शिवसेनेची नाही. १९६० साली ज्या मराठी माणसाने रक्त सांडून मुंबई आपल्याला मिळवून दिली त्या रक्ताची शपथ घेऊन ही मुंबई आम्ही तोडू देणार नाही यासाठी आपण उभे राहीलो तरच ही मुंबई वाचेल," असेही ते म्हणाले.