महाराष्ट्रात ‘एआय’बाबत स्वतंत्र कौशल्यविकास प्रशिक्षण अभ्यासक्रम
- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश; ‘मायक्रोसॉफ्ट’सारख्या कंपन्यांकडून मिळणार सहकार्य
05-May-2025
Total Views | 8
मुंबई, शेती, उद्योग, व्यापार, सहकार, शिक्षण, आरोग्य, नगरविकास अशा अनेक क्षेत्रांना कृत्रीम बुद्धीमत्तेचे (एआय) ज्ञान असलेल्या कुशल मनुष्यबळाची गरज लक्षात घेऊन ‘मायक्रोसॉफ्ट’ आणि संबंधित शासकीय विभागांनी चर्चा करुन कौशल्यविकास प्रशिक्षण अभ्यासक्रम तयार करावेत. आयटीआय, पॉलिटेक्निक, पदवी, पदव्यूत्तर विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र अभ्यासक्रम असावेत. अभ्यासक्रम तयार करण्यासाठी उद्योग, तंत्रशिक्षण, कौशल्यविकास विभागांनी मार्गदर्शक, समन्वयकाची भूमिका बजावावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवार, दि. ५ मे रोजी मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले.
विद्या प्रतिष्ठानच्या बारामतीतील प्रस्तावित सेंटर ऑफ एक्सलन्स ऑफ आर्टीफिशिएल इंटलिजन्स केंद्रासोबत राज्यात मायक्रोसॉफ्टच्या माध्यमातून जागतिक दर्जाच्या प्रयोगशाळा उभारणे, बारामतीतील कृषी विज्ञान केंद्रात कृत्रीम बुद्धीमत्ता वापराचे प्रशिक्षण सुरु करणे, कृषी क्षेत्रात एआय तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे, मायक्रोसॉफ्ट व शासनाच्या सहकार्यातून ज्ञान व माहितीचे आदान-प्रदान, एआय तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, डिजिटील कौशल्यवृद्धी, संशोधन केंद्रे सुरु करणे, कर्करुग्णांवरील उपचारप्रक्रियेत वापरले जाणारे मायक्रोसॉफ्टचे इ-संजीवनी तंत्रज्ञान बारामतीतील वैद्यकीय महाविद्यालय, सिल्वर ज्युबिली रुग्णालय, राज्यातील अन्य रुग्णालयांना उपलब्ध करुन देण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली.
राज्य शासनाचे सर्व विभाग, शेती, उद्योग, व्यापार, सहकार अशा अनेक क्षेत्रांमध्ये कृत्रीम बुद्धीमत्तेचा वापर वाढवणे ही काळाची गरज बनली असून या क्षेत्रात राज्याला मदत करण्यासाठी पुढे येणा्ऱ्या मायक्रोसॉफ्टसह सर्वांचे स्वागत करण्यात येईल. सर्वांना शक्य ते संपूर्ण सहकार्य, मदत केली जाईल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत दिला.