...तर पाकिस्तानला कडक संदेश देण्याची गरज : रोहित पवार
12-May-2025
Total Views | 12
रत्नागिरी : पाकिस्तान शांत बसणार नसेल ,आणि शब्द देऊनही पाळणार नसेल तर त्यांना एक कडक संदेश देण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी दिली. रविवार, ११ मे रोजी रत्नागिरी येथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
रोहित पवार म्हणाले की, "एकीकडे शांततेचा संदेश दिला जात असताना दुसरीकडे तीन तासांतच पाकिस्तानकडून आमच्या देशवासीयांवर ड्रोन हल्ले केले जातात. देशवासी म्हणून आम्हाला या गोष्टी पटत नाहीत. इंदिरा गांधींच्या काळात अमेरिकेने दबाव आणण्याचा प्रयत्न केला. पण इंदिरा गांधींनी न झुकता पाकिस्तानला गुडघ्यावर आणले आणि पाकिस्तानचे दोन तुकडे केले होते. आजही ती संधी आहे. या वातावरणात पाकिस्तान शांत बसणार नसेल, गद्दारीच करणार असेल आणि शब्द देऊनही पाळणार नसेल तर त्यांना एक कडक संदेश देण्याची गरज आहे," असे ते म्हणाले.
"आमचा सैन्यावर विश्वास आहे. अशा काळात कुठलेही सरकार असले तरी सगळ्यांनी सरकारसोबक राहणे गरजेचे असून आम्ही सरकारसोबत आहोत. पण जो काही निर्णय घेतला जाईल तो लवकरात लवकर घेण्याची गरज आहे, असे मला वाटते," असेही ते म्हणाले.
दोन राष्ट्रवादी एकत्र येणार?
"दोन राष्ट्रवादी एकत्र येणार या केवळ चर्चाच आहे. जोपर्यंत पवार साहेब आणि सुप्रियाताई याबाबतीत निर्णय घेत नाहीत तोपर्यंत काहीही होणार नाही. आमच्यापर्यंत असा कुठलाही विषय आलेला नाही, आमच्यापर्यंत कुठलाही आदेश आलेला नाही. त्यामुळे याबाबतीत आम्ही काही सांगणे योग्य ठरणार नाही. वरच्या पातळीवर काही होत असल्यास त्याबाबतचा संदेश सुप्रियाताई देतीलच. आजपर्यंत तो संदेश आला नाही याचा अर्थ याबाबत कुठलीही चर्चा झाली नाही," असेही रोहित पवार म्हणाले.