ठाणे : ( Temperature update ) राज्यात उन्हाळ्याचा चटका दिवसेंदिवस अधिकच तीव्र होत चालला आहे. मागील काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत असून, आता शहापूर शहरासह तालुक्यात तब्बल ४३ अंश सेल्सियस इतकं विक्रमी तापमान नोंदवलं गेलं आहे. हा आकडा यंदाच्या उन्हाळ्यातील आतापर्यंतचा सर्वाधिक आहे, ज्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.
हवामान विभागानुसार, महाराष्ट्रात सध्या गुजरातकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे तापमानात झपाट्याने वाढ होत आहे. त्याचसोबत कर्नाटक व परिसरात वाहणारे चक्राकार वारे, आणि त्यातून तयार होणारा दक्षिणोत्तर कमी दाबाचा पट्टा या हवामानात अस्थिरता निर्माण करत आहेत. त्यामुळे काही भागांत उष्णतेसोबतच ढगाळ हवामान आणि हलक्याफुलक्या पावसाचीही शक्यता आहे.
कोकण, मुंबई व उपनगरांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आला असून, नागरिकांनी अत्यावश्यक कारणाशिवाय दुपारच्या वेळी घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. उष्णतेच्या लाटेचा विशेष फटका मराठवाडा, विदर्भ व मध्य महाराष्ट्रातील भागांना बसतोय. अकोला, अमरावती, नागपूर, यवतमाळ या शहरांचं तापमान ४० अंशांच्या पुढे गेलं आहे.
या उष्णतेमुळे सार्वजनिक आरोग्याचाही प्रश्न निर्माण होतोय. डोकेदुखी, घाम, त्वचेचे त्रास, डिहायड्रेशन अशा तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे डॉक्टरांनी भरपूर पाणी प्यावे, हलका आहार घ्यावा आणि उन्हापासून बचाव करण्यासाठी टोपी, गॉगल, व प्राथमिक उपाय करावेत, असं सुचवलं आहे.
हवामान विभागानुसार, पुढील दोन ते तीन दिवसांत तापमानात आणखी २-३ अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यभरात उष्णतेचा कहर सुरूच राहणार आहे. दरम्यान, १० एप्रिलनंतर काही भागांमध्ये हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, जी थोडासा दिलासा देऊ शकते.