कला असो व जीवनातील कोणतेही क्षेत्र त्यात गुरु फार महत्त्वाचा. गुरुकृपा झाली की, असाध्य असे काहीच नाही. मात्र, गुरु हा विद्यार्थ्यांनाही प्रिय असला पाहिजे. बालरंगभूमीवर गुरुच्या भूमिकेतून बालकलाकारांना शिकवताना काय काय करावे लागते, याचे हे अनुभवकथन...
'बाळांनो, शिक्षण घेणे हे खडतर व्रत आणि ते तुम्ही पूर्ण करायलाच हवे’, असे साक्षात गणपती बाप्पा शाळेत न जावेसे वाटणार्या मुलांना सांगतो. शेखर लाड लिखित ‘आम्ही शाळेत जाणार नाही‘ या नाटकातले हे वाक्य, माझ्या मनात इतके घर करून बसले आहे की, माझ्या बालपणी नकळतपणे घेतलेले हे व्रत, मी आजही सोडू शकलेले नाही. ‘बालरंगभूमी’ या विषयात माझी ‘पीएच.डी’ सुरू आहे. शिक्षण म्हटले की विषय, शिक्षक आणि विद्यार्थी हे आलेच. परंतु, विषय कोणताही असो, तो शिकण्यासाठी दोघांच्या पात्रतेची गरज असते. ते दोघे म्हणजे, विद्यार्थी आणि शिक्षक. जेव्हा ‘नाटक’ हा विषय असतो, तेव्हा काहींचे म्हणणे असते, तो शिकवता येत नाही. म्हणजे, तो विषय शिकवण्यासाठी शिक्षक नसतोच. चला, आपण हे थोड्यावेळा पुरते मानून चालूया, शिक्षकाची आवश्यकता पूर्ण करता येत नसली, तरी प्रशिक्षक तर लागतोच ना? त्यात प्र‘शिक्षक’ हा आलाच. असो. शिक्षक लागतो का नाही लागत? नंतर तो गुरू होतो का? हे आपण सध्या बाजूला ठेऊया.
परंतु, नक्की गरज कसली असते, तर ती म्हणजे पात्रतेची. एखादी भूमिका साकारण्यासाठी, कलाकाराची पात्रता तपासली जाते. त्या तपासणीचे अनेक मापदंड आहेत. पण, आज मी माझ्यातल्या बालनाट्य शिकवणार्या शिक्षक, प्रशिक्षक, गुरू काय हवे ते म्हणा, त्यातील माझ्या पात्रतेबद्दल एकांगाने लिहिणार आहे. मागील लेखांमध्ये उल्लेख केलेल्या, बालरंगभूमीच्या ‘षटकोन‘मधील चौथा कोन, ‘शिक्षक-प्रशिक्षक‘बद्दल आज मी बोलणार आहे. नेहमी बालनाट्याच्या पडद्यामागे काम करणार्या ‘शिक्षक-प्रशिक्षक‘ या पात्राबद्दल बोलण्यासारखे बरेच काही आहे. यात भूमिका आहे ती शिक्षक, प्रशिक्षक, गुरू यांची. पात्र जर वाटी एवढे असेल, तर शिक्षक फुलपात्रा एवढे असेल आणि प्रशिक्षक लोटी एवढे असेल, त्यानंतर गुरू कसा असेल, ते तहानलेल्या विद्यार्थ्यावर अवलंबून आहे. अर्थातच नाटकाचे ज्ञानार्जन केलेल्या, खळखळत्या नदीसारखे वाहते ठेवणार्या रॅडी म्हणजे राधिकेवर म्हणजेच, माझ्यावर ते अवलंबून आहे. तुम्ही म्हणाल ‘रॅडी’ हा काय प्रकार आहे? तर ते पुढे सांगते.
बालनाट्य शिकवणारा शिक्षकाला, बालकलाकारांमधलेच एक होऊन त्यांना शिकवावे लागते. बालनाट्य म्हणजे भावभावनांचा खेळ. इथे चुकांचे स्वागत आहे. इथे कोणी मोठे नाही, का छोटे नाही. इथे कशाचे भय नाही, का दडपण नाही, गरज मात्र सगळ्यांचीच. एकमेकांना समजून घेण्याची, स्वतःला ओळखण्याची, सगळ्यांना सामावून घेण्याची. नाटक ही सांघिक कला आहे. इथे प्रत्येक कलाकार महत्त्वाचा आहे. येथील प्रत्येकाला, नाटक मी अनुभवातून शिकवते. मग ‘रॅडी’चे काय काम? साखरेचा पाक तयार करण्यासाठी, साखर आणि पाणी आवश्यक असते, तसाच तो ढवळण्यासाठी जादूची कांडीही आवश्यक असते. पण, ‘रॅडी’ नाव कशाला? टीचर, मैडम, ताई, मावशी म्हटले की, कांडी काहीशी अवघड, जड होते आणि मग मुलं मोकळेपणाने व्यक्त होत नाहीत. म्हणूनच मी त्यांची ‘रॅडी’! त्यांच्यातलीच! बालनाट्य शिकवणे म्हणजे, नुसताच पोरखेळ किंवा खेळ-खेळ नाही. शिकवताना मुलांवर विशेष प्रेम, नाटकाच्या अमर्याद सामर्थ्यावर श्रद्धा, बालनाट्याची जाण आणि याही पलीकडे जाऊन, पाळावा लागणारा संयम हे महत्त्वाचे आहे.
जेव्हा पाच ते 14 वर्षांच्या वयोगटातील मुलं माझ्याकडे नाटक शिकण्यासाठी येतात, तेव्हा मी सर्वप्रथम त्यांना समजून घेते. त्यांना बोलते केले, त्यांना आपलेसे केले, त्यांना विश्वासात घेतले की, ती मुलं माझी होतात. त्यांच्यात आत्मविश्वास वाढवणे, हे माझे पहिले काम. मग कधी आईसारखे वात्सल्य, कधी ताईसारखे प्रेम, तर कधी मैत्रीण होऊन धम्माल, मस्ती आणि मज्जा करणे हे सगळे ‘रॅडी‘ला जमते. एक वेळ नाटकात काम करता आले नाही तरी चालते, पण ‘रॅडी‘शी माझे जमते असे जेव्हा विद्यार्थी मला सांगतो, तेव्हा त्याला नाटकही जमणार आहे, हे मला माहीत असते. सोपे आहे. एकतर विषय आवडीचा पाहिजे, नाहीतर विषय शिकवणार्या बाई आवडल्या पाहिजेत, म्हणजे विद्यार्थी आपोआप शिकतो. पण, मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की, ही ‘रॅडी’ नुसतीच माया करते की, गरज पडली की रागावते पण? अहो, रागावते ना. पण मला फारसे रागवावे लागत नाही. कारण, माझ्याकडे ‘तिसरा डोळा’ आहे. आता ‘तिसरा डोळा’ हे काय अजून नवीन? सांगते. मी विद्यार्थ्यांना सांगते, हे बघा शंकराला जसा तिसरा डोळा मध्यभागी आहे, तसा मलासुद्धा आहे. पण तो मागच्या बाजूला. तुम्ही माझ्या अपरोक्ष जे करता, ते मला दिसते. त्यामुळे मला सगळ्या गोष्टी कळतात. काही मुलं तो डोळा माझ्या डोक्यामागे खरंच आहे का, हे शोधायला जातात. तो आहे त्यांना माहिती आहे, पण अदृश्य आहे. कारण, ‘रॅडी’ला गोष्टी सांगितल्या नाही, तरी कशा कळतात? असा प्रश्न त्यांना कायम पडतो. आता कसे, हे गुपित मी इथे उलगडणार नाही. मी नाटक शिकवताना माझ्या विद्यार्थ्यांची ‘रॅडी’ असते. राधिकाला ‘रॅडी’ची भूमिका करत असताना, काही बदल करून घेणे आवश्यक आहेत आणि ते मी आनंदाने करून घेतले आहेत. एक एक करून सांगते.
दिसणे - तुमचे चालणे, बोलणे मुलं बारकाईने बघत आणि ऐकत असतात. पण, ‘रॅडी’ दिसते कशी? याकडेही त्यांचे लक्ष असते. मुलांना रंगीत कपडे आवडतात, त्यांना मी लांब कानातले घातलेले आवडतात, नीटनेटके राहण्यासोबतच त्यांना फॅशनेबल कपडे आवडतात. त्यांना जे जे आवडते, ते ते मी करते. कारण, त्यांना मी आवडणे आवश्यक आहे. त्यांना जर मी आवडले, तर त्यांना नाटकाच्या तासाला यावेसे वाटेल. वागणे - मुलांना खरे वागलेले आवडते. खोटेपणा त्यांना कळतो. त्या सर्वांना समान वेळ, लक्ष, महत्त्व दिलेले आवडते, न थकता वावरणे, न कंटाळता त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देणे, शिवाय वेळ पाळणे आणि महत्त्वाचे म्हणजे, त्यांच्याबरोबर अभिनय करणे, नाचणे, डब्बा खाणे, एखादी शाळेतली मज्जा सांगा ना, असे म्हणत त्यांचे ऐकून घेणे हे सगळे मी करते.
बोलणे - मी त्यांच्याशी सहज बोलते. अवघड इंग्रजी किंवा जडजड शब्दप्रयोग करून, मराठीत बोलत नाही. मी त्यांच्यासारखीच बोलते. मी त्यांच्यातलीच एक वाटली पाहिजे, म्हणून कधी मुद्दाम चुकीचे बोलते. ते मला हसतात आणि मला शिकवतात, फार गोड वाटते ते. माझ्याशी बोलताना त्यांना दडपण येता कामा नये, म्हणून मैत्रीच्या नात्याने बोलते. नाटक काही भाषेचा तास नाही. भाषा आलीच पाहिजे; पण त्याचे ओझे नको, त्यात संवाद महत्त्वाचा आहे. मग इंग्रजीत बोलणारी मुलं, आपसूक मराठीत स्पष्ट बोलायला लागतात. आजच्या बर्याच मुलांची भाषा, म्हणजे चायनीज नूडल्सची भेळ, त्यावर अमेरिकन विगन चीज अशी काहीशी मिश्रित असते. मग ती बाजूला सारून, साजूक तूप पोळीची गोडी लावते ते म्हणजे नाटक. नाटक भाषेवर प्रेम करायला शिकवते, नाहीतर मी असतेच जादूची कांडी फिरवायला.
शालेय जीवनात बालनाट्य शिकण्याचे वेगळेच महत्त्व आहे. म्हणूनच, त्याचे महत्त्व वाढावण्यासाठी मी अधिक प्रयत्न करते. मुलांनी सृजनशील व्हावे म्हणून, नाटकातील घटना मुलांनी त्यांच्या कल्पनाशक्तीचा वापर करून सादर करून दाखवावी, असा माझा कल असतो. मुलांना चुका करण्याची संधी मी देते. त्यांच्या चुकांमधून ते काय शिकले, याचा विचार करायला लावते. नाटकाचा प्रवेश, चुका सुधारून करायला लावते. नंतर अधिक चांगले कसे वाटेल? यावर चर्चा करायला लावते. मग अचानक तिथून गायब होते. मुलांना माझा आधार वाटत असताना, मी नाहीशी झाली, हे पाहून अस्वस्थता येते. पण, आज काहीही झाले, तरी नाटकाची तालीम करायचीच, समस्या आहे, त्याचे समाधानही तुम्हीच शोधा. समस्येचे समाधान प्रत्येकाकडे असते. पण शेवटी मुलंच ती, ती गोंधळतात, एकमेकांमध्ये वादविवाद होतात, हताश, निराश होतात आणि थकतातही. मग मी पुन्हा येते, ती जादूची कांडी फिरवायला. मुलं मला मिठी मारल्याशिवाय राहत नाही. पण, लगेचच मुद्दाम मी त्यांच्यासमोर नवीन समस्या तयार करून ठेवते, पण, आता मात्र मुलं त्यांचा त्यांचा मार्ग काढतात. मग मी बोलावते, चला या पोरांनो, ‘रॅडी’ला ‘जादू की झप्पी’ हवी आहे.
मुलं माझ्यावर प्रचंड प्रेम करतात. त्यांना माहिती आहे, मला त्यांनी त्यांच्या हाताने तयार केलेल्या वस्तू भेट म्हणून मला आवडतात. मी त्यांनी दिलेली प्रत्येक गोष्ट जपून ठेवली आहे. त्या वस्तू म्हणजे बाप्पाने त्यांच्या रूपात येऊन, माझ्या कामाची पावतीच मला दिली असते! विद्यार्थ्याने दहा कामे चांगली केली की, त्याचे एकदातरी सार्वजनिक कौतुक मी करते. नाटक मुलांना जीवन कौशल्य शिकवते आणि म्हणूनच, या प्रवासात ते मला कधी गुरू मानायला लागतात, त्यांनाही कळत नाही. घरी आई रागावलीपासून, आज माझ्याबरोबर काय काय झाले, मला तुझी खूप आठवण येते म्हणून एखादा फोन, ते मी मोठी झाले की काय करू रॅडी? पर्यंतचे सगळे प्रश्न मला विचारतात. खरंच! पृथ्वीवरच्या सर्वात निरागस, निष्पाप मुलांना मोठे करण्याचे काम मला मिळाले, हे माझे अहोभाग्यच!
नाटक प्रभावी माध्यम आहेच; पण ते तुमच्यात जीवन जगण्याचे कौशल्य विकसित करते. कलेच्या माध्यमातून इतरांची मने जिंकत, आपल्या मनी वसलेल्या त्या परमात्म्याचे दर्शन घडले पाहिजे. माया नगरीच्या या पंखात आपण झुलतो आहोत. माझ्या बालमित्रांनो, खर्याचे खोटे आणि खोट्याचे खरे करून सांगणार्या या वास्तविक जगापेक्षा, आपले काल्पनिक जग, ‘बालरंगभूमी’ वरचे जग सुंदर नाही? बालमित्रांनो, आज जरी हे काल्पनिक असले, तरी हीच एक दिवस तुमच्या उद्याच्या रंगभूमीचा भक्कम पाया ठरेल, माझ्यावर विश्वास ठेवा. ‘मनी वसे ते स्वप्नी दिसे.’ पण, त्याही थोडे पलीकडे जाऊन ‘स्वप्नी दिसे ते दृष्टीस पडे, दृष्टीस असे ते सृष्टीत मिळे.’
वाचक पालकांनो, तुम्हाला कशी वाटली ‘रॅडी’ हे मी पोल घेऊन विचारणार नाही. बालनाट्य आणि बालकलाकारांमधील पूल बांधण्याचे काम तेवढे ते माझे आहे. माझा इथंवरचा प्रवास एकटीचाच नाही. माझे गुरुजी संजय पेंडसे, श्यामराव सर माझ्याबरोबर असतात. हे गणराया, हे नटवरा, शिक्षण देणे हे एक खडतर व्रत आहे आणि ते मी पूर्ण करणारच!
रानी राधिका देशपांडे