लेखक, कवी किरण येले यांनी ’बाईच्या कविता’ या आपल्या काव्यसंग्रहाच्या माध्यमातून स्त्रीच्या संवेदनशीलतेचा एक अनोखा पट वाचकांसमोर उभा केला. एक दशकापेक्षा अधिकचा काळ उलटून गेल्यानंतर आता ’बाईच्या कविता’चा पुढचा भाग ’बाई बाई गोष्ट सांग’ अर्थात ‘बाईच्या कविता २’ हा काव्यसंग्रह नुकताच प्रकाशित झाला. आज ‘जागतिक महिला दिना’निमित्त बाईच्या कविता लिहिणार्या या अनोख्या पुरूषाची गोष्ट...
१.)‘बाईच्या कविता’ ही संकल्पना दशकभरापूर्वी नेमकी कशी सुचली आणि ‘बाई बाई गोष्ट सांग’ हा त्याचा पुढचा भाग डिसेंबर महिन्यात प्रकाशितही झाला. तेव्हा, आजवरचा आपला काव्यप्रवास आणि दोन्ही काव्यसंग्रहांमधील वेगळेपणा याविषयी काय सांगाल?
माझ्या कवितांचा बाज मूलत: सामाजिक. २००० साली ‘चौथ्यांच्या कविता’ हा कवितासंग्रह आला, ज्यात ‘आम्ही चिल्लर’ ही कविता होती. त्या कवितेने मला ओळख दिली. त्यानंतर एक दिवस दुपारी आई झोपली होती. मी शेजारीच वाचत होतो. झोप झाल्यावर आई उठली आणि पदर सावरत तिने कपाळावरील टिकली पाहिली. टिकली नाही म्हणताच, ती अस्वस्थपणे शोधू लागली. ते पाहून पहिली कविता सुचली आणि मग धरण फुटून लोंढा यावा, तशा कविता मी लिहीतच गेलो. ते थोपवणे कठीण होते. बरं, मला काही ‘बाई’विषयी लिहायचे नव्हते. माझा तो विषय नसल्याने कवितासंग्रहाचा प्रश्नच येत नव्हता. पण, गझलकार चंद्रशेखर सानेकरने या सर्व कविता सुदेश हिंगलासपूरकर यांच्या पुढे ठेवल्या आणि ‘ग्रंथाली प्रकाशना’ने २०१० साली त्या प्रकाशित केल्या. आता १४ वर्षांनी त्याचा पुढचा भाग आला आहे, ‘बाई बाई गोष्ट सांग.’ पूर्वीच्या सार्या बाया त्यांच्या भावना, सुख-दु:ख ओव्या, भोंडला गीते वगैरेतून मांडत असत. आताची स्त्री तिच्या मनातले सांगेल, तर या पारंपरिक शैलीत कसे सांगेल, ते सांगणे म्हणजे ‘बाई बाई गोष्ट सांग.’ उदाहरण द्यायचे तर खेळफुगडी गाण्याच्या लयीत स्त्री म्हणते -
अल्लंग अल्लंग आमचा पल्लवी
आमच्या पलंगावर स्वप्ने फार
कळतील त्यालाच जो वेडा ठार
किंवा नव्या युगाच्या मुलीला, आई सांगते,
लाट पोरी लाट, नवी पोळी लाट
२१ पोळ्या लाटता लाटता, दुखून आली पाठ
तर याच संग्रहात पुरुषाची व्याख्या करताना बाई म्हणते,
विसरेल त्याचे पुरुषपण,
तुझ्याशी जुळताना तोच तुला भागेल,
हरेल मनापासून तुझ्याशी खेळताना,
तोच तुला जिंकेल।
कोण असेल कुठे असेल,
असा जुळून पाहणारा,
जिंकेल का कुणी कधी
स्वत:च हरणारा,
ज्याला कळेल नियम खेळाचा,
तोच होईल पुरुष,
तोच होईल भोई पालखीचा
तोच होईल उरुस.
२.) आपल्या दोन्ही काव्यसंग्रहाचे स्वागत कसे झाले? मराठी काव्यविश्वातील मान्यवरांच्या प्रतिक्रिया काय होत्या?
पहिल्या संग्रहाचे स्वागत अनपेक्षितपणे मला चकित करणारे होते. अनेक अनोळखी आया-बायांनी त्या सामाजिक माध्यमातून सादर केल्या. ज्येष्ठ दिवंगत कवी शंकर वैद्य सरांनी, ‘हे तर स्त्रीसुक्त आहे,’ असे पोस्टकार्ड पाठवले. योगेश शेट्ये, संतोष गायकवाड, संतोष संखे, रिद्धी म्हात्रे, महेंद्र गौतम, मोहन शिरसाट, अविनाश साटम, दीपेश मोहिते अशा अनेकांनी त्यांच्या मित्रमैत्रिणींना ‘बाईच्या कविता’ भेट म्हणून दिल्या. पुण्याच्या भार्गवी यांनी हळदीकुंकू समारंभात वाण म्हणून यावर्षी हे पुस्तक दिले. महिला दिनाच्या दिवशी अनेकजणी या कवितांचे व्हिडिओ बनवून टाकत असतात. अभिनेत्री स्पृहा जोशी, मधुराणी प्रभुलकर, परी तेलंग, या अभिनेत्रींनीही या कविता समाजमाध्यमावर सादर केल्या. या कवितांवर तीन नाट्यविष्कार रंगमंचावर आले.
३.) कविता लिहिल्यावर एका प्रकारचे मोकळेपण कवी अनुभवतो. तुमच्याबाबतीत हे रितेपण कसे होते?
कवितासंग्रह प्रकाशित झाल्यावर रिते झालो, असे वाटत असतानाच अनेक धन्यवाद देणारे अनोळखी फोन आभार मानत, त्यांच्या व्यथा सांगत राहिले. हे सारे ऐकून मला या विषयाची व्याप्ती जाणवू लागली. मग स्त्री-पुरुष यांच्यात नेमका विसंवाद का होतो, तो कुठे सुरू होतो, याचा अभ्यास करता करता स्त्री आणि पुरुष या दोघांच्या शरीररचना, मेंदूची रचना वेगळी असते आणि त्यामुळे काही गोष्टी घडतात, हे लक्षात आले. तेव्हा अचंबित करणार्या काही गोष्टी कळल्यावर विज्ञान आणि पुराण या दोन्हीचे वाचन केले. अनेक आश्चर्यचकित करणार्या बाबी पुढे आल्या. जागेअभावी त्या इथे सांगता येणार नाहीत. फक्त एक गोष्ट सांगतो की, स्त्री-पुरुष रचनाच अशी आहे की, दोन्ही एकत्र येतील तेव्हाच पूर्णत्वास जातील. जसे की, कुलूप आणि किल्ली. अर्धनारीनटेश्वर फक्त शंकर नाही, तर प्रत्येक स्त्री-पुरुष आहे. प्रत्येक पुरुषाला स्तनाग्रे आहेत. ते अर्धविकसित स्तन आहेत. प्रत्येक पुरुष, अर्धा स्त्री आहे आणि प्रत्येक स्त्रीला शिस्निका आहे. तिच्यात अर्धा पुरुष आहे. या सगळ्या गोष्टी वाचताना कविता आल्या त्या ‘बाई बाई गोष्ट सांग.’ या कवितासंग्रहाच्या मलपृष्ठावर दोन ओळी आहेत-
ऐलमा पैलमा आता एक करा देवा
बाईच्या योनीला दोन दात तरी ठेवा
या ओळी अनेकांना अचूक निशाणा साधणार्या वाटल्या, तर काही जण त्यातील ‘योनी’ शब्दामुळे दचकले. त्यांना तो शब्द अश्लील वाटला. याचा त्यांनी ‘योनी’ हा शब्द नाक, कान, डोळा, हात या अवयवांसारखा सहज घेतला नव्हता. अनेकजण या अवयवांकडे कामुकतेने पाहतात. वास्तविक, ‘योनी’ म्हणजे सृजनाविष्काराचा प्रदेश. एक नवा जीव जेथून जन्म घेतो, तो प्रदेश पवित्रच असतो. असायला हवा आणि आहे. म्हणूनच पूर्वी योनीपूजा व्हायची. पूर्वी ती पूजेची जागा होती. आता ती मजेची जागा झाली आहे. ज्यांना ‘योनी’ शब्द वाचताच मजेची जागा आठवते, त्यांना साहजिकच ‘योनी’ हा शब्द अश्लील वाटतो.
४.) ‘बाईच्या कविता’ लोकांना आवडल्या, त्यामागे एक कारण होते की, त्या सहज सोप्या तरी परिणामकारक होत्या. हे सोपे लिहिणेच अवघड असते का?
जगभरातील कोणत्याही परंपरेत, धर्मात ज्या गोष्टी सांगितल्या, त्या सोप्या आहेत. सर्वसामान्यांना समजतील अशा आहेत. आपल्याकडे कठीण विषय सोपे करून सांगण्याचे कार्य संतांनी केले आहे. पुराणकथा, झेनकथा, जातककथा, लोककथा यांनी केले आहे. या गोष्टी कठीण विषय सोपे करून सांगतात, म्हणून टिकून आहेत. सोपा विषय कलात्मकतेच्या नावाखाली कठीण करून सांगणे, म्हणजे साहित्यिक व्यभिचार आहे. वाचकांची प्रतारणा आहे. दिशाभूल आणि फसवणूक आहे.
बाई नखं वाढवते
आणि आयुष्यभर रंगवत राहते
ही ‘बाईच्या कविता’मधील फक्त सात आळींची कविता. साधी, सोपी आहे; पण तिची व्याप्ती मोठी आहे. तर ‘बाई बाई गोष्ट सांग’मधील, ‘बाई म्हणजे मीठ’ ही ‘बाई बाई गोष्ट सांग’मधील तीन शब्दांची कविता. वरवर सोपी वाटते. पण, जेवणातल्या मीठ या प्रथमदर्शनी अर्थासोबत अनेक अर्थ मीठ शब्दातून येतात. मीठ शरीरातही असते, मीठ म्हणजे सोडियम. शरीरातील सोडियमची पातळी कमी झाली की, शरीराचा तोल जाऊ लागतो. मीठाचे शरीरातील प्रमाण नियंत्रित असावे लागते. मीठ हे मंथनातून आलेल्या रत्नापैकी असल्याचे मानले जाते. समुद्राच्या पाण्याची वाफ निघून गेल्यावर मीठ तयार होते. मीठ जेव्हा तयार होत असते, तेव्हा ते स्पटिकासारखे चमकत असते. त्यावरून परावर्तित होणारा प्रकाश तुमचे डोळे सहन करू शकत नाहीत. नंतर तेच मीठ आपण हाताळल्यावर डागाळत जाते. मीठ समुद्रातच असते, पण ते दिसत नाही. समुद्राचे पाणी एका दांड्यात, आगरामध्ये साठवले आणि समुद्राने आपला मीपणा सोडून दिला की, मग मीठ दिसू लागते. त्याबद्दल काही अर्थ या तीन ओळीत सामावून घेतले आहेत.
५.) कविता, लघुकथा, पटकथा लेखन अशा विविध प्रांतांमध्ये आपण मुशाफिरी केली. यानंतर वाचकांसाठी आपण काय घेऊन येत आहात?
पाच ते सहा पुस्तकांचा ऐवज तयार आहे. पण, मला निकड नाही. 2000 साली ‘चौथ्यांच्या कविता’ हा सामाजिक विषयावर असलेल्या कवितासंग्रहानंतर 24 वर्षांतल्या कवितांचा संग्रह तयार आहे. मीच तो थांबवून ठेवला आहे. एक कथासंग्रह, दोन नाटके, एक बालकवितासंग्रह, अनुवादित कथासंग्रह, मंटोच्या वेगळ्या कथांचा अन्वयार्थ आणि स्त्री पुरुष गोष्टी असा ऐवज आहे.
६.) प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते, असे म्हणतात. तेव्हा, तुमच्याही आजवरच्या प्रवासातील स्त्रियांचे योगदान आणि त्यांचा आधार कसा मिळाला?
‘बाई बाई गोष्ट सांग’ हा कवितासंग्रह आई, बायको आणि बहिणीला अर्पण केला आहे. त्यांचे योगदान मोठे आहे. त्यांनी मला सांभाळले, माझे वेळी अवेळी घरी असणे नसणे त्यांनी समजून घेतले. म्हणून मी लिहू शकलो. माझे घरी असून नसणे समजून घेतले. याशिवाय काही मैत्रिणी आहेत, ज्या विश्वासाने अनेक गोष्टी, मित्राने मित्राला सांगावे तशा सांगितल्या. अनेक चर्चा केल्या. अशा अनेकांचे योगदान आहे.
७.) महिलांच्या व्यक्त-अव्यक्त भावनांशी तुम्ही समरस आहात. तेव्हा, आजच्या जागतिक महिला दिनाच्या औचित्यावर तमाम महिलावर्गाला काय संदेश द्यायला आवडेल?
मला असे वाटते की, आजचा दिवस पाळणे म्हणजे आपण सांस्कृतिक आणि वैचारिकदृष्ट्या किती मागासलेले आहोत याचा दाखला आहे. आपण जेवणाचा दिवस पाळतो का? आज ‘लंच डे’ किंवा ‘श्वास घेण्याचा दिवस?’ तुमची संस्कृती जर स्त्रियांचा सन्मान करणारी असेल, तर महिला सन्मान ही अंगीभूत गोष्ट असायला हवी. जी गोष्ट नाही किंवा कमी आहे, तिची आठवण करून देण्यासाठी आपण असे दिवस पाळतो. त्याला सुंदर, सुंदर नावे देतो. स्त्रीचा सन्मान ही गोष्ट शिकवून नाही, तर स्वभावातच असायला हवी. यासाठी पुरुषांसह स्त्रियांचेही योगदान असायला हवे. किती घरात मुलींसोबत मुलालाही घरकामाला लावले जाते. किती घरात मुलाला मुलीसारखे ‘वेळेत घरी ये’ सांगितले जाते. मुलीचे मित्रमैत्रिणी तपासले जातात; मात्र मुलांचे तपासतो का? अशा अनेक गोष्टी आहेत. जन्मापासून आपण मुलाला कणखर आणि मुलीला सहनशील बनवण्याचा प्रयत्न करत असतो. याचवेळी काही स्त्रिया बाईपणाचा गैरफायदा घेताना बोलावेसे वाटूनही आपल्याला काय करायचे आहे म्हणत, गप्प राहतात. यामुळे इतर चांगल्या स्त्रियांचे अवमूल्यन होते. अशा दुहेरी पातळीवर महिलांना काम करावे लागेल, तर मग महिला दिन रोज असायला हवा, ज्यात अत्याचाराच्या बातम्या नसतील. आपण मागील कित्येक वर्ष महिला दिन साजरा करत आहोत आणि तेव्हापासून महिला अत्याचारात वाढ झाली आहे की घट, याचा आढावा घेतला तर काय दिसेल, याचा विचार करून गरजेचे बदल व्यवस्थेपासून नागरिकांपर्यंत सगळ्यांना करावे लागतील. महिलांना एकमेकींचे ‘आऊटलेट’ व्हावे लागेल. आज जग जवळ आले, तरी माणसं दूर गेली आहेत. शांतपणे ऐकणारे, समजून घेणारे आणि समजावून सांगणारी माणसे मिळत नाहीत. ते माणूस व्हावे लागेल स्त्रीपुरुष दोघांनाही!