भारतातील स्वदेशी एआय कंम्पुट पोर्टल लाँच, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून अनावरण
चीनच्या डीपसेकच्या ९ पट क्षमता असलेले हे भारतीय पोर्टल
07-Mar-2025
Total Views |
नवी दिल्ली : भारताचे केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी नवी दिल्ली येथे भारताचे एआय म्हणजेच कृत्रिम बुध्दीमत्ता कंप्युट मॉडेल लाँच केले. या पोर्टलमुळे देशातील सर्व सरकारी यंत्रणा, स्टार्टअप्स, संशोधक यांना एआय तसेच प्रगत ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट्स म्हणजेच जीपीयू यांचा वापर करणे सुलभ होणार आहे. चीनच्या बहुचर्चित डीपसेक तंत्रज्ञानापेक्षा हे पोर्टल ९ पट जास्त सामर्थ्यवान आहे. असे सरकार कडून जाहीर करण्यात आले आहे. भारताच्या तंत्रज्ञानातील प्रगतीच्या दृष्टीने हे महत्वाचे पाऊल मानले जात आहे.
अश्विनी वैष्णव यांनी यावेळी भारत सरकार देशात २७ एआय प्रयोगशाळांची निर्मिती करणार असल्याचे जाहीर केले. याशिवाय प्रगत अशी एआय मॉडेल्स यांची भारत सरकार चाचणी करत आहे. भारत सरकारने २०२४ मध्ये एआय मिशनला सुरुवात केली. या मिशनच्या माध्यमातून एआय तंत्रज्ञानाच्या विकासासाठी १० हजार ३०० कोटी रुपयांच्या तरतुदीची घोषणा केली होती. आतापर्यंत १८६९३ जीपीयूची क्षमता भारतीयांनी विकसित केली आहे. यामुळे भारत हा जगातील सर्वात मोठ्या एआय सुविधा असणाऱ्या देशांमधील एक बनला आहे. भारताची ही क्षमता चीनचा बहुचर्चित ओपनसोर्स प्लॅटफॉर्म डीपसेक याच्या ९ पट जास्त आहे. असेही अश्विनी वैष्णव यांनी आपल्या निवेदनात सांगितले आहे.
एआय म्हणजेच कृत्रिम बुध्दीमत्ता तंत्रज्ञानाच्या विकासाबरोबर भारताने सेमीकंडक्टर उत्पादनावरही लक्ष केंद्रीत केले आहे. आता पर्यंत पाच सेमीकंडक्टर प्रकल्पांची उभारणी भारचात सुरु आहे. यामुळे भारतातील एआय तंत्रज्ञानाच्या विकासाला बळच मिळणार आहे असे या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगत आहेत.