संशोधक मनाचा प्राध्यापक

    06-Mar-2025   
Total Views |

article on professor dr omkar yadav
 
गोगलगायी, बेडूक अशा चाकोरीबाहेरच्या वन्यजीव प्रजातींवर संशोधनाचे काम करणारे प्राध्यापक डॉ. ओमकार विष्णूपंत यादव यांच्याविषयी...
 
आजर्‍यातील आठवडी बाजारात गारुड्यांकडून सुरू असणारा नागाचा खेळ पाहून या माणसाला सरीसृपांविषयी आकर्षण निर्माण झाले. या आकर्षणाला त्यांनी निरीक्षण आणि वाचन या दोहोंची जोड दिली. वयाच्या एका टप्प्यावर रानवाटांवरची त्यांची पाऊलं मार्केटिंगच्या कॉर्पोरेट क्षेत्राकडे वळली. मात्र, या पावलांनी वेळीच माघार घेऊन पुन्हा रानवाटांवर आपली घोडदौड सुरू ठेवली. प्राध्यापकी पेशात काम करत असूनही विद्यार्थ्यांना संशोधनाचा दृष्टिकोन प्रदान करीत, स्वत:देखील संशोधन करून नव्या प्रजातींचा उलगडा करणारे डॉ. ओमकार यादव यांच्याविषयी...
 
ओमकार यांचा जन्म दि. २ नोव्हेंबर १९८६ रोजी राधानगरी तालुक्यातील अर्जुनवाडा या खेडेगावात झाला. वडील विष्णुपंत यादव हे सरकारी कर्मचारी होते. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये होणार्‍या वडिलांच्या बदलींनुसार ओमकार यांचे शिक्षण पूर्ण होत गेले. त्यांचे प्राथमिक शिक्षण हे आजर्‍यात आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण गारगोटीमध्ये झाले. आजर्‍यातील वास्तव्यादरम्यानच ओमकार यांना सरीसृपांविषयी आकर्षण निर्माण झाले. सुट्टीच्या दिवशीही पाहुण्यांसोबत आंबोलीच्या जंगलात जाणे असो वा आजर्‍यात सरीसृपांविषयी भरलेले प्रदर्शन असो, यामुळे सरीसृपांविषयीच्या त्यांच्या आवडीला खतपाणी मिळत गेले.
 
ओमकार यांचे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण हे कागल तालुक्यातील दूधसाखर महाविद्यालय, बिद्रीमध्ये, तर ‘प्राणीशास्त्र’ विषयातील पदवीचे शिक्षण हे कोल्हापुरातील विवेकानंद महाविद्यालयात झाले. शालेय शिक्षणानंतर ओमकार यांना खरे तर सैन्यात भरती होण्याची इच्छा होती. मात्र, सरीसृपांची आवड त्यांना ‘जीवशास्त्र’ विषयाच्या शिक्षणाकडे खेचून घेऊन गेली. ओमकार यांच्या पदवीच्या शिक्षणादरम्यान यादव कुटुंबीय पुन्हा अर्जुनवाडा या आपल्या मूळ गावी परतले. त्यामुळे ओमकार यांचा अर्जुनवाडा ते कोल्हापूर असा रोजचा प्रवास सुरू झाला. मात्र, याच प्रवासाने त्यांना वन्यजीव संशोधन, शिक्षण आणि संवर्धन या वाटेची दिशा दाखवली. कोल्हापुरातील शिक्षणादरम्यान त्यांनी सर्पबचावाचे काम सुरू केले. समविचारी असणारे मित्रवर्य निलेश पाटील यांची भेट झाली. पाटील यांच्याकडे सरीसृप, पक्षी आणि उभयचरांविषयी अनेक पुस्तके होती. त्यामुळे त्यांनी एकत्रच अभ्यासाला सुरुवात केली. कोल्हापूरचे तत्कालीन मानद वन्यजीव रक्षक सुनील करकरे यांचेही त्याकाळात ओमकार यांना मार्गदर्शन मिळाले. शहरातून सायंकाळी गावी परतल्यावरदेखील मन काही शांत बसू देईना.म्हणून मग सुट्टीच्या दिवसात मित्र अमोल पाटील याच्यासोबत राधानगरी अभयारण्य गाठून ओमकार हे वन्यजीवांच्या निरीक्षणाचे काम करत असत. गावीदेखील सर्प बचावाचे काम करत असत.
 
पदवी शिक्षणानंतर ओमकार यांच्या करिअरची दिशा कुठेतरी भरकटली. मार्केटिंग विषयात ‘एमबीए’ करण्याच्या उद्देशाने त्यांनी सातारा गाठले. शिक्षणानंतर नोकरीदेखील केली. मात्र, जंगलात रमलेले मन त्या मार्केटिंगच्या नोकरीत कुठे रमणार होते म्हणा! आपण कुठेतरी भरकटलो आहोत, याची जाणीव झाल्यावर ओमकार यांनी आपल्या करिअरची गाडी मूळ रुळावर आणण्यासाठी पुन्हा प्रयत्न सुरू केले. ‘प्राणीशास्त्र’ विषयात पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेण्याचे ठरले. त्यासाठी शिवाजी विद्यापीठात प्रवेश मिळवला. याच शिक्षणादरम्यान डॉ. वरद गिरी, समीर बजरु, अप्पासाहेब भुसनर अशा काही तज्ज्ञ सरीसृप आणि उभयचर संशोधकांसोबत भेट झाली. तज्ज्ञांसोबत झालेल्या ओळखीतून शिक्षणाचा केंद्रबिंदू निश्चित झाला. जैवविविधता याच विषयात ‘पीएच.डी’ पूर्ण करण्याचे ठरले.त्यानुसार तयारीला सुरुवात झाली. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय त्यावेळी उभयचर विषयात ‘पीएच.डी’ शिक्षण घेऊ पाहणार्‍या मुलांना प्रशिक्षण देत असे. हे प्रशिक्षण केवळ २५ मुलांना दिले जात असे. या प्रशिक्षणासाठी जुलै २०१३ साली ओमकार यांची निवड झाली आणि त्यासाठी आवश्यक असणारे प्रशिक्षणदेखील पूर्ण झाले. या प्रशिक्षणादरम्यान ओमकार यांची भेट देशविदेशातील नामवंत सरीसृप आणि उभयचर संशोधकांसोबत झाली. त्यामुळे करिअरची वाट चोखंदळपणे निवडली गेली. कोल्हापूरमधील बेडकांची जैवविविधता, असा विषय घेऊन २०१७ साली त्यांनी आपली ‘पीएच.डी’ पूर्ण केली. २०१७ सालीच त्यांनी ‘सेट’ आणि २०१९ साली ‘नेट’ची परीक्षा दिली आणि ते प्राध्यापकासाठी पात्र झाले.
 
सध्या ओमकार हे मेढा येथील आ. शशिकांत शिंदे महाविद्यालयात साहाय्यक प्राध्यापक म्हणून विद्यादानाचे काम करत आहेत. सरीसृप आणि उभयचर क्षेत्रात कार्यरत असलेले सतपाल गंगलमाले आणि सौरभ कीनिंगेसारखे होतकरू तरुण संशोधकही त्यांनी घडवले आहेत. प्राध्यापकी करत असताना त्यांनी प्रकर्षाने आपल्यातील संशोधक मात्र मरू दिलेला नाही. विद्यादानाचे काम करत असतानाच ओमकार हे सरीसृप आणि उभयचरांच्या काही नव्या प्रजातीदेखील शोधून काढत आहेत. आजवर त्यांनी विंचू आणि गोगलगायीची प्रत्येकी एक आणि बेडकाच्या दोन नव्या प्रजातींचा शोध लावला आहे, तर गोगलगायीच्या दोन नव्या प्रजातींविषयीचे संशोधन लवकरच प्रकाशित होणार आहे. प्राध्यापकी पेशा सांभाळून वन्यजीव संशोधनाची कास धरलेल्या ओमकार यांना पुढील वाटचालीकरिता दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा!

अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.