प्रविण दरेकरांनी आणला ठाण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्याचे गृह राज्यमंत्र्यांचे आश्वासन

    06-Mar-2025
Total Views |

pravin darekar
 
मुंबई-  ( Pravin Darekar on issue of traffic in Thane ) ठाणे शहरातील वाहतुकीच्या समस्येला ठाणे महानगरपालिका आणि नगररचना विभागाचा नियोजनशून्य कारभार जबाबदार आहे, अशी स्पष्ट भूमिका प्रविण दरेकर यांनी विधान परिषदेत मांडली. विधान परिषदेत प्रविण दरेकर यांनी ठाण्यातील वाहतूक कोंडी, वाहतूक पोलीस व टोईंग कंत्राटदारांचा गैरव्यवहार, महापालिका व नगर रचना विभागाचा नियोजनशून्य कारभार याविषयी नियम १०१ अन्वये लक्षवेधी सूचना मांडली होती. या लक्षवेधीला गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी उत्तर दिलं.
 
ठाण्याच्या वाहतूक कोंडीला महापालिका आणि नगररचना विभाग जबाबदार-दरेकरांची स्पष्ट भूमिका
 
ठाण्यात महाकाय गृह संकुलांच्या बांधकामांना परवानगी देताना रस्त्यांच्या नियोजनाचा विचार न केल्यामुळे ठाणे शहराला प्रचंड वाहतूक कोंडीची समस्या भेडसावते आहे. घोडबंदर रोडवरून मोठ्या ट्रकच्या वाहतुकीमुळे वाहतूक पूर्णतः ठप्प होते. याला पर्याय म्हणून वसई व अलिबाग कॉरीडोर लवकर झाला पाहिजे. ठाण्यात जागोजागी तयार झालेल्या बॉटलनेकमुळे ठाणेकरांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे. त्याबाबत सरकार कोणत्या उपाययोजना करणार, असा प्रश्न दरेकर यांनी या चर्चेत उपस्थित केला.
 
ठाण्यात वाहतूक पोलीस व टोईंग कंत्राटदारांचे रॅकेट मोडून काढा, दरेकरांची मागणी
  
वाहतूक पोलीस व टोईंग कंत्राटदारांबाबतही दरेकर यांनी प्रश्न उपस्थित केला. वाहतूक पोलिसांचे एक मोठे रॅकेट ठाण्यामध्ये निर्माण झाले आहे. कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार यामध्ये आहे. टोईंग वाहने खाजगी तत्वावर घेतलेली आहेत. त्यांना एका दोन चाकी वाहनासाठी १०० रुपये दिले जातात. जास्तीत जास्त वाहने उचलून नेण्यासाठी हे लोक दिवसभर ठाण्यात फिरत असतात. वाहतूक पोलीस वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याऐवजी कुठे तरी कोपऱ्यात वाहने पकडून त्यांच्याकडून वरकमाई करत असतात. त्यामुळे वाहतूक पोलीस आणि टोईंग वाहनांचा जाच कमी करण्यासाठी सरकार काही नियंत्रण आणणार आहे का, असा सवाल प्रविण दरेकर यांनी उपस्थित केला.
 
मुलुंड व ठाणे यामध्ये नवीन रेल्वे स्टेशनची निर्मिती लवकर करावी! प्रविण दरेकरांची सरकारला विनंती
 
ठाणे शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी मुलुंड व ठाणे दरम्यान नवीन रेल्वे स्टेशनच्या निर्मितीचा प्रकल्प प्रस्तावित आहे. तो लवकर मार्गी लावावा, अशी विनंतीही या चर्चेत दरेकरांनी केली. या चर्चेला उत्तर देताना गृहराज्य मंत्री योगेश कदम यांनी सांगितले की, घोडबंदर, आनंदनगर या मार्गांवर मोठ्या प्रमाणावर गेल्या अनेक वर्षांपासून वाहतूक कोंडी होते आहे. वाहतूक पोलिसांमार्फत होणाऱ्या अनधिकृत कारवाया थांबविण्यासाठी डिसेंबर, २०२४ पासून वाहन पूल करणे बंद केले आहे. जी अनधिकृत वाहने उभी असतील त्यासाठी दोन क्रेन उपलब्ध करून दिल्या आहेत.
 
ठाणे शहर हे मुंबईपाठोपाठ मोठे शहर म्हणून नावारूपाला येतेय. मोठ्या प्रमाणावर विकास होतोय. ठाण्याचे वाहतूक मॅनेजमेंट हा गृह विभागाशी संबंधित विषय नाही. तथापि, सन्माननीय सदस्यांच्या भावना लक्षात घेऊन जटील प्रश्न सोडविण्यासाठी महापालिका, परिवहन विभाग, व अन्य विभागांची एकत्रित बैठक याच अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत घेऊ.