नवी दिल्ली: ( America will not be Wok anymore Donald Trump ) अमेरिकेत आता कौशल्य आणि क्षमतांना प्राधान्य दिले जाणार असून आपला देश आता ‘वोक’ राहणार नाही असे प्रतिपादन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकी काँग्रेसला दिलेल्या पहिल्याच संबोधनात केले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनात भाषण करताना ‘वोकिझम’वर हल्ला चढवला. ते म्हणाले, “तुम्ही डॉक्टर असाल, अकाऊंटंट असाल किंवा एअर ट्रॅफिक कंट्रोलर असाल, तुम्हाला वंश किंवा लिंगाच्या आधारावर नव्हे, तर कौशल्य आणि क्षमतेच्या आधारावर नियुक्त केले पाहिजे, असे सरकारला वाटते. प्रत्येक नागरिकास गुणवत्तेच्या आधारावर नियुक्त केले पाहिजे आणि सर्वोच्च न्यायालयाने एका अतिशय शक्तिशाली निर्णयात सरकारने तसे करण्याची परवानगी दिली आहे. अमेरिकेच्या सरकारचे अधिकृत धोरण आहे की, फक्त दोन लिंग आहेत, पुरुष आणि महिला. त्यामुळे आतापासून अमेरिका देश हा ‘वोक’ राहणार नाही,” असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे.
अमेरिकेत सत्तेत आल्यापासून ट्रम्प यांनी ‘वोकिझम’ला अमेरिकेत जागा नसेल, असे स्पष्ट केले आहे. अमेरिकेसह संपूर्ण जगात सध्या ‘वोकिझम’चा धुमाकूळ सुरू आहे. ‘वोकिझम’च्या नावाखाली विविध देशांमध्ये सांस्कृतिक आक्रमण घडविण्याचा प्रकार जागतिक इकोसिस्टमद्वारे जाणीवपूर्वक घडविण्यात येत आहे. अमेरिकेने मात्र आता या ‘वोकिझम’विरोधात स्पष्ट आघाडी उघडली आहे.
‘वोक’ म्हणजे काय?
केंब्रिज शब्दकोशानुसार, ‘वेक’ या शब्दाचा अर्थ जागरूक असणे, विशेषतः वंशवाद आणि असमानता यांसारख्या सामाजिक समस्यांबद्दल असा होतो, तर ‘ऑक्सफर्ड’ इंग्रजी शब्दकोशात ’वोक’चे वर्णन सामाजिक आणि राजकीय समस्यांबद्दल जागरूक असणे आणि समाजातील काही गटांना इतरांपेक्षा कमी न्याय्य वागणूक दिली जाते, याची काळजी घेणे, असे केले आहे. मात्र, प्रत्यक्षात ‘वोकिझम’च्या नावाखाली लिंगगोंधळ घालण्यात येत असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे.