सावित्रीबाई फुले स्मृती पुरस्कार प्रदान सोहळा एसएनडीटी महिला विद्यापीठात उत्साहात संपन्न

    11-Mar-2025
Total Views |

Savitribai Phule Memorial Award Ceremony held with enthusiasm at SNDT Women University
 
मुंबई: ( Savitribai Phule Memorial Award Ceremony held with enthusiasm at SNDT Women University ) महाराष्ट्रातील शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना गौरवण्यासाठी आयोजित सावित्रीबाई फुले स्मृती पुरस्कार प्रदान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीत आणि विद्यापीठ गीताने झाली. प्रास्ताविक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी केले. त्यांनी पुरस्कारप्राप्त मान्यवरांचे अभिनंदन करत त्यांच्या प्रेरणादायी कार्याचा गौरव केला.
 
श्री. वेणुगोपाल रेड्डी यांनी पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करत, ग्रामीण भागातील विकासात त्यांच्या कार्यामुळे महत्त्वाचा बदल घडेल, अशी अपेक्षा व्यक्त केली. सन्माननीय कुलगुरू प्रा. उज्वला चक्रदेव यांनी आपल्या भाषणात पुरस्कार निवड प्रक्रियेबद्दल माहिती दिली आणि सर्व पुरस्कारप्राप्त महिलांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या सोहळ्यात सहा महिलांना त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी सावित्रीबाई फुले स्मृती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या विविध उपक्रमांवरही या वेळी चर्चा करण्यात आली. समाजासाठी गरजेचे आणि प्रभावी उपक्रम राबवण्याचे आवाहन उपस्थित मान्यवरांनी केले.
 
मा. आमदार छगन भुजबळ यांनी सावित्रीबाई फुले यांच्या स्त्री शिक्षणातील योगदानाची आठवण करून दिली. तसेच, हा पुरस्कार नियमितपणे प्रदान व्हावा यासाठी २०२३-२४, २०२४-२५ आणि २०२५-२६ या वर्षांचे पुरस्कार याच वर्षी वितरित करण्याची विनंती त्यांनी केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करत १९८१ पासून सुरू असलेल्या या पुरस्काराची रक्कम आता १ लाख करण्यात आल्याचे जाहीर केले.
 
कोविड आणि इतर कारणांमुळे काही वर्षे हा पुरस्कार वितरण थांबला होता, मात्र आता हा उपक्रम नियमित सुरू राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. पुढील पुरस्कार वितरण सोहळा नायगाव, सातारा येथे होणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. डॉ. अविनाश आवलगावकर, कुलगुरु, मराठी भाषा विद्यापीठ, अमरावती हे देखील कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता प्रा. विलास नांदवडेकर यांनी केली.