अमेरिकेद्वारे टीआरएफ ‘परदेशी दहशतवादी संघटना’ जाहिर - पहलगाम हल्ल्यास जबाबदार, लष्कर ए तोयबाची संघटना

    18-Jul-2025   
Total Views |

नवी दिल्ली, जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणाऱ्या पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तैयबाची संघटना द रेसिस्टन्स फ्रंटला (टीआरएफ) अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने परदेशी दहशतवादी संघटना (एफटीओ) व विशेष नामांकित जागतिक दहशतवादी (एसडीजीटी) म्हणून घोषित केले आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकेच्या या निर्णयाचे स्वागत करत तो भारत-अमेरिका दहशतवादविरोधी सहकार्याचा ठोस पुरावा असल्याचे म्हटले आहे.

गुरुवारी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून जारी निवेदनात म्हटले की, टीआरएफवर ही कारवाई करणे ही अमेरिका प्रशासनाची राष्ट्रीय सुरक्षा, दहशतवादाचा बंदोबस्त करणे आणि पहलगाम हल्ल्यात न्याय मिळवून देण्याच्या कटिबद्धतेचा भाग आहे. परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी स्पष्ट केले की, टीआरएफला विदेशी दहशतवादी संघटना व विशेष नामांकित जागतिक दहशतवादी घोषित करण्यामागे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलेल्या स्पष्ट भूमिकेवर आमची कटिबद्धता आहे.




या निर्णयाबद्दल परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी ‘एक्स’वरून प्रतिक्रिया दिली. त्यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांचे आभार मानताना लिहिले की, लष्कर-ए-तैयबाचा मुखवटा असलेल्या टीआरएफला परदेशी दहशतवादी संघटना व विशेष नामांकित जागतिक दहशतवादी घोषित करण्याबद्दल अमेरिकेचे आभार. हे भारत-अमेरिका दहशतवादविरोधी सहकार्य किती मजबूत आहे, याची पुष्टी होते. दहशतवादाविषयी शून्य सहिष्णुतेचा आपला दृष्टिकोन कायम आहे.

वॉशिंग्टनमधील भारतीय दूतावासानेही अमेरिकेच्या या निर्णयाचे स्वागत केले असून, “हा निर्णय दोन्ही देशांमधील दहशतवादविरोधी सहकार्याचे प्रतीक आहे, असे म्हटले आहे.


'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121