मुंबई, मराठवाड्यातील मदतमाश इनाम वर्ग दोन जमिनी वर्ग एकमध्ये रूपांतरित करण्यासंदर्भात आणि मुंबईतील जमिनींच्या भोगवटा वर्ग बदलाबाबत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी विधानभवनातील त्यांच्या दालनात एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत आमदार अतुल भातखळकर आणि आमदार सुनील प्रभू यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत मराठवाड्यातील मदतमाश इनाम वर्ग २ जमिनी वर्ग १ मध्ये रूपांतरित करताना आकारण्यात येणारा नजराणा कमी करण्याच्या मागणीवर सविस्तर चर्चा झाली. सध्या शेतसाऱ्याच्या तीनपट नजराणा आकारला जावा, अशी मागणी होत आहे. ही रक्कम अत्यंत कमी असल्याने रेडी रेकनरच्या पाच टक्के दराने रक्कम आकारण्याबाबत चर्चा करण्यात आली. महसूलमंत्र्यांनी या प्रकरणाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. तसेच, या प्रक्रियेत अधिक सुलभता आणण्यासाठी 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान' अंतर्गत विशेष शिबिरे आयोजित करण्याचे निर्देश दिले. या शिबिरांमधून अधिकाधिक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा यासाठी, शिबिरे घेण्यापूर्वी संबंधित कुटुंबे निश्चित करून त्यांना विभागीय आयुक्तांचे पत्र घरोघरी पाठविण्याचे आदेशही त्यांनी दिले.
मालाड (पूर्व) येथील नागरी निवास सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या जमिनीचा भोगवटा वर्ग दोन मधून वर्ग एकमध्ये रूपांतरित करताना आकारली जाणारी सध्याची १०% रक्कम कमी करण्याच्या मागणीवरही चर्चा झाली. हा निर्णय मंत्रिमंडळाच्या अंतिम मंजुरीनंतरच घेतला जाईल, असे महसूलमंत्र्यांनी स्पष्ट केले. जिल्हाधिकारी मालकीच्या भोगवटा वर्ग बदलाची प्रक्रिया लोकांना क्लिष्ट वाटत असून, ती अधिक सुटसुटीत करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. या निर्णयामुळे राज्यातील लाखो नागरिकांना आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, प्रलंबित असलेले जमिनींचे वर्ग बदल अधिक वेगाने पूर्ण होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे.
'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या आठ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. महाराष्ट्राचे राजकारण आणि त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. २०१४, २०१९ आणि २०२४ सालच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे वार्तांकन. २०१८ साली राजस्थानमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रत्यक्ष वार्तांकनाचा अनुभव.