मुंबई,दि. १० : विशेष प्रतिनिधी मीरा-भाईंदरमधील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी आणि भविष्यात वाहतूक व्यवस्था नियोजनबद्ध राखण्याच्या उद्देशाने अत्याधुनिक शैलीतील डबल-डेकर उड्डाणपुलाचे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि एमएमआरडीएचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते आणि परिवहन मंत्रीप्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. शनिवार, दि. ८ रोजी हे उदघाटन करण्यात आले. नियोजनबद्धपद्धतीने विकसित करण्यात आलेला हा डबल-डेकर उड्डाणपूल मेट्रो मार्गिका - ९चा भाग आहे.
या अत्याधुनिक पायाभूत सुविधेमुळे वाहतुकीची कोंडी कमी होईल, जोडणीमध्ये सुधारणा होईल आणि शहरी वाहतूक व्यवस्थेत नवे मापदंड प्रस्थापित होतील. या वेळी महा मुंबई मेट्रोच्या अध्यक्ष रुबल अगरवाल, मीरा-भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त राधाबिनोद शर्मा हेही उपस्थित होते. मेट्रो मार्गिका - ९चा भाग असलेला हा उड्डाणपूल एस. के. स्टोन जंक्शनजवळील साईबाबा नगर मेट्रो स्थानकापासून शिवार गार्डनपर्यंत आहे. हा उड्डाणपूल एकाच सामायिक खांबांवर (शेअर्ड पिअर) उभारलेला आहे. या रचनेमध्ये मेट्रो व रस्ते पायाभूत सुविधा अखंडितपणे एकत्र करण्यात आल्या आहेत. १७ मीटर रुंद रस्त्यावर २+२ मार्गिका आहेत. त्यामुळे वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर मार्ग उपलब्ध होतो.
वाहतुक जोडणीवर होणारा परिणाम
एस. के. स्टोन जंक्शन, कनाकिया जंक्शन आणि शिवार गार्डन जंक्शन ही वाहतूक कोंडी होणारी तीन प्रमुख ठिकाणी टाळता आल्याने या उड्डाणपुलामुळे प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होईल आणि वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. हा उड्डाणपूल एमएमआरडीएच्या महत्त्वाकांक्षी मेट्रो लाईन-९ प्रकल्पाचा एक भाग असून, तो दहिसर पूर्व ते मीरा-भाईंदर यांना जोडतो. या प्रकल्पांतर्गत तीन उड्डाणपुलांचा समावेश असून रस्ते जोडणी सुधारण्यासोबतच मेट्रोशी सुलभपणे जोडणी करण्यासाठी हे नियोजन करण्यात आले आहे. यातील उड्डाणपूल १ प्लेझंट पार्क ते सिल्व्हर पार्क सिग्नल हा ऑगस्ट, २०२४मध्ये वाहतुकीसाठी खुला झाला. तर आज उदघाटन झालेला उड्डाणपूल २ आहे. तिसऱ्या उड्डाणपुलाचे कामही ऑगस्ट २०२५पर्यंत पूर्ण होईल अशी माहिती एमएमआरडीएने दिली आहे.
---------
"हा डबल-डेकर उड्डाणपूल म्हणजे जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्मितीसाठी असलेल्या आमच्या बांधिलकीचे प्रतीक आहे. या उड्डाणपुलामुळे वाहतूक व्यवस्थेत सुधारणा होईल आणि आर्थिक विकासाला चालना मिळेल. मेट्रो आणि रस्ते वाहतूक सामायिक खांबांवर उभारल्यामुळे जागेचा सुयोग्य वापर होत आहे, वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत झाली आहे आणि प्रवास अधिक सोयीस्कर झाला आहे. मीरा-भाईंदरच्या रहिवाशांना अखंड आणि सुरळीत प्रवासाची सुविधा मिळावी, यासाठी हा प्रकल्प एक महत्त्वाचे पाऊल ठरेल."
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
"हा केवळ एक उड्डाणपूल नाही तर आम्ही केलेली वचनपूर्ती आहे. मीरा-भाईंदरच्या झपाट्याने होणाऱ्या विकासामुळे वाहतूक कोंडी वाढत असून, त्यावर तोडगा काढण्यासाठी हा डबल-डेकर उड्डाणपूल हे एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे."
- एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री आणि एमएमआरडीए अध्यक्ष
"एमएमआरडीएतर्फे केवळ आजच्या गरजा पूर्ण करणाऱ्या नव्हे, तर भविष्यातही उपयोगी ठरणाऱ्या पायाभूत सुविधांच्या निर्मितीला प्राधान्य देण्यात येते. कार्यक्षमता, टिकाऊपणा आणि आधुनिक अभियांत्रिकी यांचा मिलाफ साधणारा हा डबल-डेकर उड्डाणपूल म्हणजे एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. लवकरच दुसऱ्या स्तरावर मेट्रो सेवा सुरू होत असल्याने मीरा-भाईंदरच्या शहरी वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल अनुभवायला मिळणार आहे."
-डॉ. संजय मुखर्जी, महानगर आयुक्त, एमएमआरडीए
-------------------------------------
डबल-डेकर उड्डाणपुलाची वैशिष्ट्ये
एकूण लांबी : ८५० मीटर
मेट्रो व उड्डाणपुलाचे सामायिक खांब : २१
चढणीच्या रॅम्पची लांबी : १२२.६ मीटर
उतरंडीच्या रॅम्पची लांबी : १५३ मीटर