'छावा' चित्रपटाला ग्रीन सिग्नल मिळणार ; मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया!
27-Jan-2025
Total Views |
मुंबई : विकी कौशल च्या 'छावा' चित्रपटाचा ट्रेलर २२ जानेवारी २०२५ रोजी प्रदर्शित झाला. 'छावा' चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज लेझीम खेळताना दिसत असल्याबद्दल आक्षेप घेतला जात आहे. काही संघटनांनी याविरोधात
आंदोलनही सुरू केले. ट्रेलरमधल्या नृत्य दृश्यांमुळे सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या 'छावा' चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांना लेझीम करत नृत्य करताना दाखवले होते. या दृश्यावर मराठा संघटनांनी आक्षेप घेतला, चित्रपटाच्या टीआरपी साठी चित्रपटात संभाजी महाराज आणि येसुबाई यांना नृत्य करताना दाखवणे म्हणजे इतिहासाचे अपमान करण्यासारखे आहे असे असल्याचे सांगण्यात आले.
याशिवाय चित्रपटातले काही संवाद देखील नेटकऱ्यांना खटकले आहेत. सिनेमॅटिक लिबर्टीचा वापर करून चुकीची माहिती पसरवण्याचा प्रयत्न असल्याची टीका करण्यात आली. राजकीय आणि सामाजिक पातळीवर ट्रेलरमधील नृत्य दृश्यांमुळे छावा चित्रपटावर आक्षेप घेण्यात आला. काही संघटनांनी दिग्दर्शक आणि निर्मात्यांवर कारवाईची मागणी केली होती. यावर राज्य सरकारने त्वरित कारवाई केली आणि निर्मात्यांना योग्य निर्णय घेण्याचे आदेश दिले.
राज्य सरकारचे मंत्री आणि शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते उदय सामंत यांनी या वादावर आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "विकी कौशलची प्रमुख भूमिका असलेला ‘छावा’ चित्रपट सध्या सर्वत्र चर्चेत आला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरचं सर्वांनीच भरभरून कौतुक केलं आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवणे खूप महत्त्वाचे आहे, पण त्यात काही दृश्यांमुळे लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे आम्ही निर्मात्यांना सूचित केले की, त्या दृश्याला काढून टाकावे."
उदय सामंत यांनी पुन्हा माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. त्यात ते म्हणाले, “मी स्वतः २६ जानेवारीला निर्माते दिनेश विजन आणि दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांना फोन केला होता. "तेव्हा त्यांनी त्यांची सकारात्मक बाजू मांडली संभाजी महाराज आणि महाराणी येसुबाई यांचे नृत्याचे जे दृश्य होते ते काढून टाकण्यात आले आहे.” तसेच, उदय सामंत यांनी सांगितले की, "चित्रपट तज्ज्ञ आणि जाणकारांना आधी दाखवला जावा आणि त्यानंतरच प्रदर्शित केला जावा अशी आमची भूमिका आहे.”
छावा चित्रपटावर माजी खासदार संभाजीराजे भोसले यांची प्रतिक्रिय :
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाई एकत्र नृत्य करत दाखवले गेले, ज्यावर माजी खासदार संभाजीराजे भोसले यांनी नाराजी व्यक्त केली. त्याच वेळी, त्यांनी चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचे कौतुकही केले.
संभाजीराजे भोसले यांनी सांगितले, "छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर एवढ्या मोठ्या बजेटचा चित्रपट तयार करणे, हे प्रशंसा करण्यासारखे आहे. त्यामुळे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर आणि त्यांच्या टीमचे कौतुक करतो." तसेच, त्यांना चित्रपटातील काही भागांची अचूकता महत्त्वाची वाटली, त्यामुळे त्यांनी दिग्दर्शकांना संपूर्ण चित्रपट दाखविण्याची मागणी केली होती. "चित्रपटात एखादी ऐतिहासिक चूक होऊ नये, म्हणून मी इतिहासकारांना जोडण्याची इच्छा होती. परंतु त्यांनी इतिहासकारांशी भेटण्यास स्वारस्य दाखवले नाही," अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
माजी खासदार संभाजीराजे भोसले यांनी चित्रपटावरची आपली नाराजी व्यक्त केली असली तरी, छत्रपती संभाजी महाराजांच्या ऐतिहासिक योगदानाला उजाळा देणाऱ्या या चित्रपटाचे कौतुकही केले.