विकासाचा ध्यास घेत व्रतस्थ जीवन जगणारे नेते म्हणजे लोकनेते कर्मवीर दादासाहेब कन्नमवार!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती सोहळ्यात प्रतिपादन

    10-Jan-2025
Total Views |
 
Fadanvis
 
चंद्रपूर : राज्याच्या आणि जिल्ह्याच्या विकासाचा ध्यास घेऊन व्रतस्थ जीवन जगलेले द्रष्टे नेते म्हणजे कर्मवीर दादासाहेब कन्नमवार, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. शुक्रवार, १० जानेवारी रोजी चंद्रपूर येथे आयोजित लोकनेते कर्मवीर दादासाहेब कन्नमवार शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती सोहळ्यात ते बोलत होते.
 
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कर्मवीर मा. सां. कन्नमवार गौरव स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, आमदार किशोर जोरगेवार, आमदार देवराव भोंगळे, काँग्रेस नेते वडेट्टीवार, माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
 
हे वाचलंत का? -  आघाडीत बिघाडी? विधानसभेच्या निकालानंतर मविआत अजिबात समन्वय नाही!
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्याच्या आणि जिल्ह्याच्या विकासाचा ध्यास घेऊन व्रतस्थ जीवन जगलेले द्रष्टे नेते म्हणजे कर्मवीर दादासाहेब कन्नमवार. अशा नेत्याचा समाजाला विसर पडू नये, हेच नेते पुढच्या पिढ्यांना प्रेरणा देत असतात. तुलनेने कमी लोकसंख्या असलेल्या आणि मागास असलेल्या समाजात जन्म घेतल्यामुळे आणि दुर्दैवाने गरिबीत जीवन जगत असल्याने दादासाहेब कन्नमवार यांना फार शिक्षण घेण्याची संधी मिळाली नाही. तरीसुद्धआ त्यांनी स्वत:च्या मेहनतीने आपले व्यक्तीमत्व तयार केले. महात्मा गांधी आणि लोकमान्य टिळकांचा मोठा पगडा त्यांच्यावर होता. त्या विचारातूनच त्यांचे नेतृत्व तयार होत गेले."
 
"शिक्षण आणि आरोग्य या दोन गोष्टींकडे लक्ष देण्यासाठी दादासाहेबांनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये आरोग्य केंद्र उभारण्याची संकल्पना मांडली. तसेच चंद्रपूर आणि विदर्भात शैक्षणिक संस्था उभारण्यासाठी काम करत आपल्या जीवनाl अनेक मानके तयार केले. त्यांना मुख्यमंत्री म्हणून फार कमी काळ मिळाला. मुख्यमंत्रीपदावर असताना त्यांचे दु:खद निधन झाले. परंतू, त्यांना अधिक काळ मिळाला असता तर त्यांनी विकासाच्या संकल्पना मांडल्या असत्या," असे ते म्हणाले.
 
ते पुढे म्हणाले की, "दादासाहेब कन्नमवार हे मूलचे होते. माझे लहानपणसुद्धा मूलमध्येच गेले. त्यामुळे माझी एक नाळ जुळलेली आहे. मूल किंवा चंद्रपूर जिल्हातून दादासाहेब पहिले मुख्यमंत्री होते आणि त्यानंतर मी मुख्यमंत्री झालो. आपल्या गावातला आणि जिल्ह्यातल्या एका व्यक्तीने महाराष्ट्राच्या विकासात मोठे योगदान दिले, याचा मला खूप अभिमान आहे. या जिल्ह्याच्या विकासातील सर्व अडचणी दूर करणार," असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. तसेच लोकनेते कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांच्या कार्याचा गौरव करणारा ग्रंथ राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या माध्यमातून निर्माण करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
 
चंद्रपूर हा वाघ आणि 'वारां'चा जिल्हा!
 
"चंद्रपूर हा वाघांचा आणि 'वारां'चा जिल्हा आहे. सुधीरभाऊ मुनगंटीवार आमचे नेते आहेत. विजयभाऊ वडेट्टीवार आणि किशोरभाऊ जोरगेवार आमचे मित्र आहेत. त्यामुळे कुठलेही वार असले तरी आम्ही त्यांचा सन्मानच करतो. कारण आम्ही हेडगेवारांचे अनुयायी आहोत," असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.