मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Meenakshi Sharan) "फाळणीत मारल्या गेलेल्यांचे स्मरण करणे हे आपले कर्तव्य आहे. धर्माचे रक्षण व्हावे, येणाऱ्या पिढ्या हिंदू राहाव्यात म्हणून त्यांनी स्वतःचे बलिदान दिले. त्यांचे केवळ स्मरण करणेच नव्हे तर त्यांचे श्राद्ध विधी करणे हे देखील आपले कर्तव्य आहे. त्यामुळे येत्या २ ऑक्टोबर रोजी सर्वपित्री अमावस्येच्या निमित्ताने सामूहिक तर्पण विधी आयोजित केले जावेत.", असे मत अयोध्या फाऊंडेशनच्या अध्यक्षा मीनाक्षी शरण यांनी व्यक्त केले. नुकत्याच संपन्न झालेल्या शाश्वत भारत संवाद कार्यक्रमात त्यांनी फाळणीच्या भीषणतेला स्पर्श करत श्राद्ध करण्याचे महत्त्व सांगितले.
उपस्थितांना संबोधत त्या पुढे म्हणाल्या, "सध्याच्या पिढीला फाळणीचा इतिहास आणि त्यावेळच्या भीषण परिस्थितीचा सामना करणाऱ्या त्यांच्या पूर्वजांचे काय झाले याची माहिती असणे आवश्यक आहे. लाखो हिंदू आणि शीख मारले गेले. उन्मादी धर्मांधांपासून आपल्या प्रतिष्ठेचे रक्षण करण्यासाठी अनेकांनी स्वतःची आणि आपल्या प्रियजनांची हत्या केली. अगदी चूलीवर शिजत असलेले अन्नही मागे टाकून अनेकांनी घरे सोडली."
त्याकाळात झालेल्या हिंदूंवरील अत्याचारांबाबत बोलताना त्या पुढे म्हणाल्या, "पाकिस्तानातून भारताच्या दिशेने पळून चाललेल्या अनेकांचा वाटेत बळी गेला. कुटुंबातील सदस्य एकमेकांपासून विभक्त झाले. मृतदेहांनी भरलेल्या रेल्वेच्या बोगी येऊ लागल्या. हिंदू महिलांवर बलात्कार झाले, गरोदर महिलांचे पोट फाडून न जन्मलेल्या बाळांना बाहेर काढून मारले. गेल्या हजारो वर्षांत हिंदूंच्या बाबतीत हेच होत आले आहे."