मुंबई : राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा बेमुदत संप पुकारला असून राज्यभरात अनेक ठिकाणी बससेवा ठप्प झाली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मंगळवार सकाळपासून हा संप पुकारण्यात आला आहे. दरम्यान, या संपाचा प्रवाशांना मोठा फटका बसला आहे.
विविध प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी सकाळपासून संप पुकारला आहे. अनेक आगारांमधून अद्याप एकही गाडी सोडण्यात आलेली नाही. या संपामुळे सामान्य प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. शिवाय विद्यार्थ्यांनाही या संपाचा जोरदार फटका बसला आहे.
हे वाचलंत का? - लाडकी बहिण योजनेला मुदतवाढ! 'या' तारखेपर्यंत भरता येणार अर्ज
ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने प्रवाशांना गावी जाण्यास समस्या येत आहे. अनेक प्रवाशी सकाळपासूनच बसस्थानकांवर ताटकळत आहेत. नागपूर, अहमदनगर, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, धुळे यासह अनेक जिल्ह्यांमध्ये वाहतूक सेवा पुर्णपणे ठप्प झाली आहे. तर अनेक आगारांमध्ये या संपाचा परिणाम दिसत नाही. मुंबई विभागातील वाहतूक सुविधा सुरळी सुरु आहे. मात्र, कल्याण आणि विठ्ठलवाडीत कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने इथले आगार बंद आहे.