धर्मवीर २ : कट्टर हिंदुत्ववादी आणि सच्च्या शिवसैनिकाची गोष्ट

    29-Sep-2024
Total Views |

dharmveer2
 
ठाणे म्हटलं की, धर्मवीर आनंद दिघे हे नाव सर्वप्रथम डोळ्यांसमोर येतं. ठाण्यात केवळ एकाच वाघाचा दरारा होता, तो वाघ म्हणजे दिघे साहेब. ‘आनंदाश्रम’ हेच त्यांचं सर्वस्व होतं आणि त्यांच्याकडे तक्रारी घेऊन येणारे प्रत्येक नागरिक त्यांचे आप्तेष्ट होते. याच दिघे साहेबांच्या जीवनावर आधारित ‘धर्मवीर १ : मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट २०२२ रोजी प्रदर्शित झाला होता. एकाच भागात इतक्या मोठ्या व्यक्तिमत्त्वाचं जीवन दाखवणं अशक्य असल्यामुळे दि. २७ सप्टेंबर रोजी ‘धर्मवीर २ : साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. यात दिघे साहेबांनी सुरु केलेली दहावीची सराव परीक्षा ते हिंदुत्वाबद्दलचे त्यांचे विचार या सगळ्या बाबी अधोरेखित करत मांडण्यात आले आहेत. जाणून घेऊयात कसा आहे ‘धर्मवीर २’ चित्रपट.
 
'धर्मवीर २’ चित्रपटाची सुरुवात होते कोरोना काळात पालघर जिल्ह्यात दोन हिंदू साधूंवर जो हल्ला करण्यात आला होता, त्या दुर्दैवी घटनेने. २०२० रोजी महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री असलेले एकनाथ शिंदे त्यांच्या गुरुंच्या म्हणजेच आनंद दिघे यांच्या जिल्ह्यात हिंदूंवर झालेल्या या हल्ल्यामुळे फार अस्वस्थ होताना दिसतात आणि शिवसेनेसाठी हिंदुत्वाची व्याख्या काय आहे? हिंदू माणसं ही शिवसेनेला किती जवळची आहेत? याची जाणीव धर्मवीर आनंद दिघे शिंदेंना करुन देतात दिसतात. याशिवाय केवळ भगवी वस्त्र परिधान केली होती, म्हणून, त्या साधूंना मारहाण केली गेली, असा गंभीर आरोप करत, ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी रुजवलेली शिवसेना आणि त्यांचा सच्चा शिवसैनिक असशील, तर भविष्यात हिंदुत्वाचे विचार आणि हिंदू समाजाला जपणं ही तुझी जबाबदारी आहे,’ असा मोलाचा सल्ला दिघे साहेब शिंदेंना देताना दिसतात. हळूहळू कथानक जसे पुढे जाते तसे, हयात नसलेल्या दिघे साहेबांची शिकवण शिंदेंना पदोपदी आठवताना दिसते. सामान्य माणसासाठी लढा असो किंवा विद्यार्थ्यांसाठी दहावी सराव परीक्षा सोप्पी करणं असो, जात, धर्म न पाहता महाराष्ट्रभरातील भगिनी राखीपौर्णिमेला येऊन दिघे साहेबांना भाऊ म्हणून मान दिल्यानंतर त्यांचे ते करत असलेले रक्षण असो किंवा मग आपल्या प्रत्येक कार्यकर्त्यांचा जीव कसा आपल्यासाठी महत्वाचा आहे, त्यांच्यासाठी जगणं काय असतं, हे दाखवणारा प्रसंग असो, असे कित्येक प्रसंग दिघे साहेबांची शिकवण अधोरेखित करतात. शिवाय, कथानकात २०२२ साली महाराष्ट्रात जो राजकीय भूकंप झाला होता, तो नेमका का झाला? आमदारांना कशी चुकीची वागणूक मिळाली? हे सगळं पडद्यामागील सत्य चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
 
‘धर्मवीर २’ चित्रपट हा पूर्णपणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आठवणीतील धर्मवीर आनंद दिघे यावर आधारित आहे. गुवाहाटीला जाऊन बंड पुकारण्यापूर्वी बंद खोलीत नेमकं काय-काय घडलं होतं? आमदार आपली दु:ख एकमेकांना सांगताना प्रत्येक प्रसंगात धर्मवीर आनंद दिघे यांनी काय केलं होतं किंवा त्यांच्यासोबत काय घडलं होतं, हा भूतकाळही एकनाथ शिंदेंनी मांडला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल दिघेंच्या मनातील आदर, मलंगगडाचे आंदोलन, अयोध्येत जाऊन केलेली कारसेवा या सगळ्या महत्त्वपूर्ण घटनांचा उल्लेख करण्यात आला आहे. चित्रपटाचा पूर्वार्ध केवळ आनंद दिघेंच्या आठवणींवर लेखकाने लिहिला असून, उत्तरार्ध हा एकनाथ शिंदेंचं कोरोना काळातील कार्य, आनंद दिघे यांच्या निधनानंतर ठाण्यात पोरकी झालेल्या शिवसेनेचे त्यांनी खांद्यावर पेललेले शिवधनुष्य, ते दाखवल्यामुळे तो काळ प्रेक्षक म्हणून पाहता आणि अनुभवता आला. ठाण्यात दिघे साहेबांना मानणारा कार्यकर्त्यांचा मोठा वर्ग आहे. पण, तो का आहे याचं कारण नक्कीच अधोरेखित केलं आहे. यासाठी लेखक-दिग्दर्शकांचे विशेष कौतुक. याव्यतिरिक्त ठाण्यातील सामान्य माणसांच्या मनातील शिवसेना, त्यांच्यासाठी शिवसेनेचं नेतृत्व कसं हवं आहे, याची अपेक्षा नेमकी काय होती, हे आजवर ऐकून माहित होतं. पण, त्याची अंमलबजावणी कशी झाली, हे मांडण्यात दिग्दर्शकाला यश आलं आहे, असं म्हणता येईल.
 
“मरण आलं तरी काँग्रेससोबत जाणार नाही,” हे शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचजे ब्रीदवाक्य मरेपर्यंत आनंद दिघे यांनी जपलं. पण, आपले गुरु आणि त्यांचे गुरु यांनी जी शिकवण दिली, हिंदुत्व जपण्याची आणि पुढे नेण्याची, खांद्यांवर जी जबाबदारी दिली ती एकनाथ शिंदे यांनी कशी पुढे नेली आणि आपला धर्म, हिंदुत्व जपण्यासाठी आजन्म कार्यरत असणार्‍या भारतीय जनता पक्षासोबतच युती केल्यास महाराष्ट्राचं आणि हिंदू समाजाचं भलं आहे, हे मान्य करुन कशा हालचाली घडल्या, त्या या कथानकातून अगदी योग्य रित्या पोहोचल्या आहेत.
 
आता जरा चित्रपटाच्या तांत्रिक बाबींकडे वळूयात. आनंद दिघे, हिंदुत्व, शिवसेना या प्रत्येक सामान्य माणसाच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आणि जर का त्याला धक्का लागला, तर जग पेटवून देण्याची मराठी माणसाची धमक काय आहे, या ज्वलंत भावना दाखवण्यासाठी जो संगीत, बॅकग्राऊंड, अ‍ॅक्शन, कॅमेरा अँग्लसमधून दर्जेदार पद्धतीने दाखवण्यात आला आहे. शिवाय, प्रत्येक प्रसंगात शिवसैनिक किती कडवा आहे, याची प्रचिती दाखवण्यासाठी वाघाचा फोटो, बाळासाहेबांचा फोटो दाखवून ताकद दाखवण्याचा दिग्दर्शकाचा दृष्टिकोन वाखाणण्याजोगा आहे. एखाद्या राजकारणी व्यक्तिमत्त्वावर चित्रपट साकारणं तसं सोप्पं काम नाही; परंतु, आनंद दिघे यांचे जीवन मोठ्या पडद्यावर दाखवताना त्यांच्या जीवनात एकनाथ शिंदेंचं किती महत्त्व होतं आणि दिघे साहेबांच्या पाऊलांवर पाऊल ठेवून शिवसेना शिंदेंनी कशी पुढे नेली आणि राजकारणात भविष्यात किती मोठी उलथापालथ घडवून आणली, हे प्रामुख्याने दिसून आलं.
 
चित्रपटातील प्रत्येक कलाकाराच्या अभिनयाचं कौतुक करावं तितकं कमीच. आनंद दिघे यांची भूमिका साकारणार्‍या प्रसाद ओक यांनी दुसर्‍याही भागात कस लावला आहे. शिवाय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारणार्‍या क्षितीश दाते यांनी हुबेहूब शिंदेंची भूमिका वठवली आहे. त्याचं बोलणं, चालणं इतकं आत्मसात केलं आहे की, खरोखरीच शिंदे स्वत:च भूमिका साकारत आहेत, असा भास बर्‍याच प्रसंगांत होतो. याशिवाय, शिंदेंसोबत बंड पुकारत गुवाहाटीला निघालेल्या आमदारांची भूमिका ज्या कलाकारांनी साकारली आहे, त्यांची निवडदेखील अतिशय अचूक. यासाठी कास्टिंग दिग्दर्शकाचे विशेष कौतुक केलेच पाहिजे.
 
तर, ‘धर्मवीर २: साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट’ इतक्यातच संपत नाही बरं का. दुसर्‍या भागात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांची हिंदुत्वाची गोष्ट दिसली आणि आता तिसर्‍या भागात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हिंदुत्वाची गोष्ट दिसेल यात शंका नाही. तसेच, चित्रपटाच्या शेवटी प्रेक्षकांसाठी एक विशेष ‘सरप्राईज’ आहे. पण, पहिल्या भागात जसा एक प्रश्न अनुत्तरित होता, तसे दोन प्रश्न या दुसर्‍या भागाअंती प्रेक्षकांसमोर मांडण्यात आले आहेत. पहिला प्रश्न म्हणजे दिघे साहेबांचा मृत्यू कसा झाला? आणि दुसरा प्रश्न म्हणजे, दिघे साहेबांच्या दहाव्याच्या दिवशी एकनाथ शिंदे असं काय त्यांना म्हणाले की, त्यांच्या पिंडाला कावळा शिवला. या दोन्ही प्रश्नांची आणि महाराष्ट्राच्या राजकारणात २०२२ झालेली मोठी उलथापालथ कशी झाली, यांची उत्तर ‘धर्मवीर’ चित्रपटाच्या तिसर्‍या भागात नक्कीच मिळतील.
 
चित्रपट : धर्मवीर २: साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट
दिग्दर्शक : प्रवीण तरडे
कलाकार : प्रसाद ओक, क्षितीश दाते
 
                                                                                                                                               लेखिका - रसिका शिंदे-पॉल