नवी दिल्ली: काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे खोटारड्यांचे सरदार असून हिंदू धर्माची बदनामी करण्याची एकही संधी ते सोडत नाहीत, असा घणाघात विश्व हिंदू परिषदेने (विहिंप) शनिवारी केला आहे.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नुकतेच एका प्रचारसभेत अयोध्येतील श्रीराम मंदिरातील श्रीरामलला प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम म्हणजे केवळ नाचगाण्यांचा कार्यक्रम होता, असे बेताल वक्तव्य केले होते. त्यास विहिंपचे संयुक्त सरचिटणीस डॉ. सुरेंद्र जैन यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, काँग्रेस नेते राहुल गांधी हे खोटारड्यांचे सरदार आहेत. भारत देश, भारताची संस्कृती आणि हिंदू धर्माची बदनामी करण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. श्रीराम जन्मभूमीविषयी त्यांनी अनेकदा बेताल वक्तव्ये करून हिंदूंच्या ५०० वर्षांच्या संघर्षाचा अपमान केला आहे, असे डॉ. जैन यांनी म्हटले.
श्रीराम मंदिराच्या उभारणीत राहुल गांधी व त्यांच्या कुटुंबाने वारंवार अडथळे आणण्याचा प्रयत्न केल्याचे डॉ. जैन यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, हे प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर आता श्रीराम मंदिरासाठी बलिदान देणाऱ्यांचा अपमान त्यांनी सुरू केला आहे. या चळवळीमध्ये जातीभेद विसरून हिंदू समाज एकत्र आल्याचा धक्का काँग्रेसला अद्यापही पचविता आलेला नाही. प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात मंदिराची उभारणी करणारे कामगार आणि कर्मचाऱ्यांसह असंख्य लोक आपली जात विसरून केवळ श्रीरामासाठी एकत्र आले होते. त्यामुळे काँग्रेस आणि राहुल गांधी यांनी हिंदूंचा अपमान करण्याऐवजी भानावर यावे, असाही इशारा विहिंपतर्फे देण्यात आला आहे.