जनतेचे प्रत्युत्तर

    27-Sep-2024
Total Views |

Vidhansabha Election
 
पुण्यात तर अशा विरोधकांची खिल्ली उडवली जात आहे. विकासकामे मार्गी लागत असताना केवळ माध्यमांत झळकायचे म्हणून आंदोलक क्षुल्लक आणि निरर्थक गोष्टींवर आंदोलने करताना दिसतात. जनता यांना चोख उत्तर देताना पुरून उरेल. कारण, कोणेएकेकाळी मेट्रोला विरोध म्हणून आंदोलन करणार्‍यांना किती पुणेकरांनी विक्रमी संख्येत मेट्रो प्रवास केला, ते बघून धडकी भरली आहे.
 
राज्यात विधानसभा निवडणुकांच्या हालचाली सुरू झालेल्या आहेतच. मागील लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात शरद पवार आणि उद्धव ठाकरे कंपूने विश्वासघात आणि संधिसाधूपणाचे राजकारण तर केलेच. मात्र, सत्तेत राहून चक्क वसुलीचा कारभार करून कोरोनाग्रस्तांना आणि निरपराध जनतेला जो त्रास दिला, तो संतापाचा कडेलोट करणारा होता. त्यामुळे जनतेने दिलेले मत शिरोधार्य मानून त्यांच्या विकासासाठी एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी सत्तेत आले. मात्र, आज हेच शरद पवार उद्धव ठाकरे यांना हादरा देणारे ठरले. त्यानंतर राज्यात केवळ सुडाच्या राजकारणाने वेग घेतला. लोकांना दिशाभूल आणि संभ्रमात ठेवून कार्यपद्धती अमलात आणण्याचे कार्यक्रम यशस्वी केले जाऊ लागले. दुर्दैवाने, सत्ताधार्‍यांना ते खोडून काढण्यात अपयश आले. मात्र, याचा अर्थ राज्यात विकासकामे थांबली नाहीत. उलट ती अधिक जोमाने होऊ लागली आणि खोट्या विरोधकांचे चेहरेच जनतेसमोर आले. आज तर ज्यांना विकासावर काहीही बोलता येत नाही, ते चक्क गुन्हेगाराची बाजू घेताना दिसत आहेत. ज्यांनी अवघे आयुष्य सत्तेत घालवले, मात्र आरक्षण दिले नाही, ते आता आरक्षणावर गोलमाल बोलताहेत. उलट सत्तेतील वज्रमूठ बळकट होत आहे आणि जे वज्रमूठ दाखवित होते, त्यांची शकले उडताना दिसत आहेत.
 
एकूणच सरकारच्या विकासकामांवर काहीही बोलता येत नाही, म्हणून खोटा आव आणला जात आहे आणि राज्यातत काहीही आलबेल नसल्याचे चित्र अगदी पद्धतशीरपणे रंगविले जात आहे. मग काय एपीजे अब्दुल कलामांची तुलना ओसामा बिन लादेनशीच करुन मुक्ताफळे उधळणे, अक्षय शिंदेसारख्या आरोपीचे उदात्तीकरण करणे, न्यायालयाने शिक्षा दिल्यावरदेखील ‘मी चुकीचे काही केलेच नाही,’ असे उर्मटपणे सांगणे, या प्रकारांनी जनतेला आता कोण विश्वासाचे, हे कळून चुकले आहे. पुण्यात तर अशा विरोधकांची खिल्ली उडवली जात आहे. विकासकामे मार्गी लागत असताना केवळ माध्यमांत झळकायचे म्हणून आंदोलक क्षुल्लक आणि निरर्थक गोष्टींवर आंदोलने करताना दिसतात. जनता यांना चोख उत्तर देताना पुरून उरेल. कारण, कोणेएकेकाळी मेट्रोला विरोध म्हणून आंदोलन करणार्‍यांना किती पुणेकरांनी विक्रमी संख्येत मेट्रो प्रवास केला, ते बघून धडकी भरली आहे.
कृतिशील पर्यावरणपूरकता
 
पर्यावरण जागृतीसाठी पुणेकर नागरिक कायमच सजग असतात. मात्र, तरीही पुण्यात सर्वांनी अशा उपक्रमांना साथ दिली तर नक्कीच पुण्याचे तसेच येथील नागरिकांचे आरोग्य चांगले राहील. पर्यावरण संतुलन राखण्यासाठी निसर्गातील कितीतरी घटक हे उपयुक्त असतात, हे या क्षेत्रातील अभ्यासकांनी नमूद केले आहे. ’स्मॉल इज ब्युटीफुल’ या विषयावर मार्गदर्शन करताना ईशान पहाडे यांनी एक मधमाशी २० किलो परागकणांचे वहन करते. मधमाशी आपल्या पोळ्यापासून साधारण तीन किलोमीटर प्रवास करते. फुलपाखरे, मुंग्या परागीकरणात मदत करतात. अगदी माशासुद्धा परागीकरणात मदत करतात, अशी रंजक माहिती देताना पर्यावरण संतुलनासाठी कीटकांचे महत्त्व उलगडून सांगितले. सजीवसृष्टी आणि पर्यावरणासाठी सूक्ष्मजीवदेखील कसे उपयुक्त आहेत, हे डॉ. प्रगती अभ्यंकर यांनी उलगडून सांगितले.
 
एकूणच काय तर निसर्गातील प्रत्येक लहानमोठा घटक हा आपल्या कृतीने पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाला हातभार लावत असतो. मग या सगळ्यात पर्यावरणाचा एक अविभाज्य घटक म्हणून मानवाचे योगदानही तितकेच महत्त्वाचे नाही का? हल्ली पर्यावरणपूरक जीवनशैलीचा अवलंब करण्याकडे तरुणाईचाही कल मोठ्या प्रमाणात दिसून येतो. यात पुणेकर मंडळीही तितकीच आघाडीवर. पुण्यात देखील ई-वाहनांचा वाढता वापर, वृक्षारोपण अभियाने, सौरऊर्जा उपकरणांच्या वापराकडे झुकता कल यामध्ये पुणेकरांनी आघाडी घेतलेली दिसते. एवढेच नाही तर उत्सवकाळातही पुणेकरांच्या या कृतिशील पर्यावरणपूरकतेचा प्रत्यय आला. पर्यावरणपूरक गणेशमूर्ती, पर्यावरणस्नेही देखावे आणि विसर्जनासाठी कृत्रिम जलस्रोतांचा वापर करुन पुणेकरांनीही सर्वार्थाने हरित गणेशोत्सव साजरा केला. आगामी उत्सवांतही हीच परंपरा पुणेकर नक्की कायम राखतील, अशी आशा.
 
असे हे एकूणच चित्र सकारात्मक म्हणावे लागेल. कारण, आजची पिढी पुढील पिढीच्या भविष्यासाठी पुढाकार घेताना दिसते. ही बाब नक्कीच आश्वासक आहे. याचा लाभ भविष्यात निश्चितच नव्या पिढीला होणार आहे. सरकारदेखील यासाठी जनतेला विविध माध्यमांतून प्रोत्साहन देताना दिसते. यामुळेच पर्यावरणासाठी सकारात्मक पाऊले पडू लागली आहेत, असे म्हणायला वाव आहे.
 
लेखक - अतुल तांदळीकर