राजकारणात आपले इप्सित साध्य करण्यासाठी नेतेमंडळी कोणत्या थराला जातील, हेही सांगता येणार नाही. आता तर या नेतेमंडळींनी अगदी देवालाही वेठीस धरल्याचे बघायला मिळत आहे. असेच काहीसे सध्या उबाठा गटाचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर करत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील महिला मतदारांना देवदर्शनासाठी गाड्या भरून पाठवायला सुरुवात केली आहे. अगदी दोनच दिवसांपूर्वी 15 बसेस भीमाशंकर येथे दर्शनासाठी रवाना करण्यात आल्या. दरम्यान, हे तेच बडगुजर आहेत, ज्यांना दाऊदचा हस्तक सलीम कुत्ता यासोबत संबंध उघड झाल्याने शहरातून तडीपारीची नामुष्की झेलावी लागली. या प्रकरणात बदनामी झाली ती वेगळीच, सलीम कुत्ता प्रकरणात डागाळलेली आपली प्रतिमा उजळ करण्यासाठीचा हा केविलवाणा प्रयत्न म्हणून महिला मतदारांना देवदर्शनासाठी पाठवण्याचा अट्टहास बडगुजर करत आहेत. आता यातून फायदा होईल की तोटा (आर्थिक) हे देवदर्शनाला जाणार्या महिलांनाच माहीत. तर दुसरीकडे मित्रपक्षांना विश्वासात न घेता, उबाठा गटातील स्थानिक पदाधिकार्यांनी नाशिक पश्चिममधून बडगुजर यांची उमेदवारी परस्पर जाहीर करून टाकली. ही उमेदवारी पुढे रेटण्यासाठी बडगुजर यांनी देवाचा आसरा घ्यायचा जणू चंगच बांधला असून बडगुजर एकप्रकारे देवालाच वेठीस धरत आहेत. रोजच्या रोज जेवणावळी काय उठवतात, महिलांना देवदर्शनाला काय पाठवतात, भल्या मोठ्या छत्र्यांचे वाटप काय करतात... आपला माथा कायम पांढराफटक राहावा, यासाठी आटापिटा करण्यापेक्षा गेली अनेक वर्षे नगरसेवक असलेल्या प्रभागाचा विकास केला असता, तर अशा मार्गांचा अवलंब करावा लागला नसता. आणि उजळ माथ्याने मतांचे दानदेखील मागता आले असते. यांना कोण सांगणार की, निवडून येण्यासाठी फक्त प्रलोभने नाही, तर विकासाची दृष्टीसुद्धा असावी लागते. ज्यातून मतदारांचा आणि पर्यायाने मतदारसंघाचा विकास साधता येतो. मात्र, बडगुजर यांच्या प्रभागावर नजर टाकली, तर लक्षात येते की, जी व्यक्ती एका प्रभागाचा विकास व्यवस्थित करु शकत नाही, ती व्यक्ती विधानसभा मतदारसंघाचा विकास काय करेल? शेवटी इतकेच म्हणावे लागेल की, सगळे करून थकले आणि बडगुजर देवपणाला लागले!
आरक्षणाच्या झारीतील शुक्राचार्य
मराठा आरक्षणाचा मुद्दा मनोज जरांगे पाटील यांनी चांगलाच तापवला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात या प्रकरणाने चांगलीच राळ उडवून दिली आहे. समाजाचा विषय म्हणून एकवेळ जरांगे पाटलांचे बरोबर आहे. पण या प्रकरणाला विरोधी पक्षाचे नेते हवा देऊन, राज्य धुमसत कसे राहील आणि असंतोष कसा माजेल, यासाठी धडपड करताना दिसत आहेत. या कुरघोडीच्या राजकारणात महाविकास आघाडीतील सर्वच वाचाळवीर एकत्र गरळ ओकत महाराष्ट्रभर फिरत आहेत. नुकत्याच नाशिक दौर्यावर असलेले उबाठा गटाचे युवराज आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणाला बत्ती देण्याचा प्रयत्न केला आहे. नाशिक भ्रमंती करत असताना छावा क्रांतिवीर सेनेने त्यांना निवेदन देत मराठा आरक्षणाविषयी आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले. यावर ठाकरे यांनी आपली भूमिका मांडणे बाजूला ठेवले आणि भाजपने काय करायला पाहिजे, याचेच सल्ले देत बसले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कायम पाण्यात पाहणारे ठाकरे यांनी आरक्षणाचे खापर त्यांच्या डोक्यावर फोडण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. तसेच सवयीप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर तोंडसुख घेताना छत्रपती शिवाजी महाराजांसमोर मराठा आरक्षण मिळवून देण्याची शपथ घेतली असल्याचे सांगितले. पण मविआचे सरकार असताना देवेंद्र फडणवीस यांनी उच्च न्यायालयात टिकवलेले आरक्षण या समाजद्रोह्यांनी सर्वोच्च न्यायालयात घालवले, हे सोयीस्करपणे आदित्य ठाकरे विसरभोळेपणाचे नाटक करत विसरत आहेत. तर दुसरीकडे पक्षाच्या मेळाव्यासाठी आलेले काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना मराठा आंदोलकांनी घेराव घालत मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण आणि सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी यावर भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले. यावर आपण सत्ताधारी पक्षाला जाब विचारणार असल्याचे पटोले यांनी आंदोलकांना सांगितले. मात्र, पटोले हे कसे विसरतात की, सर्वात जास्त काळ सत्ता उबवलेल्या काँग्रेसने का नाही आरक्षण दिले? याचे उत्तर पटोलेंकडे नाही आणि आता सत्ताधारी महायुतीला जाब विचारायला निघाले आहेत. अहो नाना पटोले, जनतेला एवढेसुद्धा वेड्यात काढू नका, जनतेला सर्व कळते. हे मविआच्या नेत्यांना सांगितले पाहिजे की, मराठा आरक्षणाच्या आड येणार्या झारीतील शुक्राचार्य खरे तर तुम्हीच आहात!
विराम गांगुर्डे