‘किम जोंग ऊन आणि उत्तर कोरिया’

    06-Jul-2024
Total Views | 166
kim jong un and north korea book


पुस्तक पहिल्यांदा वाचताना सरळ रेषेत ‘अथ ते इति’ असे पुस्तक मी वाचत नाही. मधूनमधून प्रकरणांची नुसती शीर्षकं, काही परिच्छेद, सलग चार-पाच पाने असे स्वैर वाचन करून साधारण एखाद्या रागाचे आरोह-अवरोहवादी संवादी चलन वगैरे समजून घेण्याचा प्रयत्न असे करतो. एकदा विषयाचा माहोल मनात तयार झाला की, मग थोडंसं सलग वाचन आणि तीन-चार वेळा वाचन झालं की, मग त्याची दोन-तीन पारायणं असे ते पुस्तक समजून घ्यावे, असा प्रयत्न असतो. विशेषतः मोठ्या किंवा नवीन विषयाची ओळख करून घेताना.
 
उत्तर कोरिया हा विषयच मुळी एक गूढ किंवा पोलादी पडद्याआडचा मामला आणि आपला त्याच्याशी फारसा संबंध नाही आणि नसावा, असा काहीसा संस्कार काही दशके झालेला. त्या पार्श्वभूमीवर एखाद्या अनवट रागातील बिकट चीजेला तोंड घालावे तसे निखिलने आपले पहिलेच पुस्तक मांडले आहे.

कोरियाच्या इतिहासाचा मागोवा, जपान, चीन, रशिया या देशांशी राजकीय, सामाजिक असलेला निकटचा संबंध, त्यांच्या भाषांचे परस्पर संबंध त्यांची खाद्यसंस्कृती हे सगळे वाचून आपल्या अनभिज्ञतेचं माप कळतं. उत्तर आणि दक्षिण कोरियाचं परस्पर नातं, तिथल्या सत्ताधारी लोकांचं आयुष्य वाचताना स्तिमित व्हायला होत आहे. उत्तर कोरिया आणि भारत यांचे राजनैतिक संबंध आहेत, हे वाचून मी थक्क झालो.

किम जोंग उन हा एरव्ही रंगवला गेलेला सरफिरा चक्रम राज्यकर्ता या प्रतिमेशी काहीसा विसंगत वाटणारा राज्यकर्तासुद्धा आहे, हे वाचून भुवया वक्र झाल्या. जो राज्यकर्ता आपल्या देशासाठी अन्नधान्य, संरक्षण याचबरोबर ज्ञान, माहिती व्यवस्थापन अत्युच्च पातळीवर करतोय, वेगवेगळ्या ज्ञानशाखांची सर्वोत्तम जोपासना करतोय, देशातील विद्यार्थ्यांना देशाच्या ज्ञानगरजा पुरवण्यासाठी पुष्कळ मार्ग उपलब्ध करून देतोय, हे वाचून खरोखर आश्चर्य वाटलं. खरंतर कौतुकही वाटलं थोडंसं!

बरे हे करताना कोणत्याही मार्गानं का होईना, पण जगाला आपली दखल घ्यायला लावणं वाटतं तितकं सोपं नाही आणि अमेरिकेला न जाता किंवा अमेरिकन राष्ट्राध्यक्षाला आणि तेही ट्रम्पसारख्या मुरलेल्या राजकारणी आणि पोहोचलेल्या व्यावसायिकाला आपल्या खंडात खेचून आणून चर्चा करायला भाग पाडणे, तेही इतक्या लहान वयात; हे दिसतं तितकं सोपं नाही!
निखिलने हे अतिशय अभ्यासपूर्ण रीतीने समजून घेतलं आहे आणि अशा प्रकारच्या लिखाणाला लागणारी एक निष्पक्षता बाळगून लिखाणात कोणताही कोरडेपणा येऊ दिलेला नाही. अशा प्रकारच्या लिखाणात एक रुक्ष दस्तावेजीकरण होण्याचा धोका त्याने अगदी सहज टाळला आहे, त्याबद्दल त्याचे विशेष कौतुक.

प्रांजळपणे सांगायचं तर जवळपास तीन आठवडे पुस्तक हाताळत असूनही, सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे रागाचा पुरता आवाका न येताच मैफलीला दाद देऊ लागतो तसे माझे होत आहे. रांगोळीचे ठिपके मांडले जात आहेत, नक्षी तयार होत आहे, काही ठिकाणी रंग भरले जात आहेत आणि तयार होणार्‍या अंतिम रांगोळीच्या अंदाजाने आनंदाने भरून यावं तसे होत आहे.

आंतरराष्ट्रीय विषयाचे हे पुस्तक ‘वरदा प्रकाशना’ने प्रसिद्ध केले आहे. मुखपृष्ठ व आतील मांडणी आकर्षक झाली आहे. अनोळखी असलेल्या देशाबद्दल आणि व्यक्तिमत्त्वाबद्दल लेखकाच्या सोप्या आणि रंजक भाषाशैलीमुळे आपल्याला हा देश ओळखीचा वाटू लागतो. जागतिक पातळीवरील राजकारण कसे असते, तेही कळते.

निखिलच्या पहिल्याच पुस्तकाला उदंड यश चिंतितो आणि असे अनेक विषय त्याच्याकडून अभ्यासले जाऊन ते आम्हा वाचकांपर्यंत पोहोचतील, असे लेखन त्याने करावं.


अभिजीत कासखेडीकर
९८१९०२१७३०
अग्रलेख
जरुर वाचा
बोरिवलीच्या नॅशनल पार्कमध्ये तृणभक्षी प्राण्यांसाठी विशेष प्रकल्प; गवताचे पुनरुज्जीवन

बोरिवलीच्या नॅशनल पार्कमध्ये तृणभक्षी प्राण्यांसाठी विशेष प्रकल्प; गवताचे पुनरुज्जीवन

'विवेक पार्क फाऊंडेशन'ने (वीपीएफ) बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या सहयोगाने राबविलेल्या गवताळ अधिवास पुनरुज्जीवन प्रकल्पाचे रविवार दि १३ जुलै रोजी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले (grassland development program). यावेळी एसएफसी इन्व्हार्यमेंटल टेक्नाॅलाॅजिजचे सह-संस्थापक व संचालक संदीप परब हे देखील उपस्थित असेल (grassland development program). या प्रकल्पाचे कौतुक करत असतानाच वन आणि वन्यजीवांविषयी शिकण्याची संधी मिळाल्यास ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121