लाखाची गोष्ट

    05-Jul-2024
Total Views |
Pune Metro travel organized for Warkaris

लाखाच्या गोष्टी दुनियेत तशा अनेक आहेत. त्यातील रंजकता त्या-त्या वर्तमानाशी, परिस्थितीनुरूप निगडित असल्याने त्याचे महत्त्व अधोरेखित होत असते. ही लाखाची गोष्ट पुण्यनगरी म्हणून गणल्या गेलेल्या पुण्यातील काही सकारात्मक, विकासात्मक बाबींशी निगडित आहे. पुण्यासाठी लाख ही रक्कम म्हणजे काहीच नाही, येथे कोटींच्या कोटी उड्डाणे होत असताना लाख कोठून आणले? हा प्रश्नदेखील रास्त ठरतो. मात्र, या लाखात जेव्हा माणसं बसविली जातात, तेव्हा त्यातील महत्त्व आणखी वाढतं. काळ झपाट्याने बदलत आहे. त्यामुळे एकेकाळी असणार्‍या विकासाच्या आणि प्रगतीच्या कल्पनांचादेखील आता विस्तार झाला आहे. अर्थातच, अपेक्षांनादेखील आणखी पंख येऊ लागले. नुकताच वारीचा सोहळा पुण्यात पार पडला. सहसा या वारीत आपल्या ग्रामीण भागातील माणूस सहभागी होताना दिसतो. तसे बघितले तर माहिती-तंत्रज्ञान आणि समाजमाध्यमांत काम करणारी नागरी वस्त्यांमधील लोकंदेखील आता यात हिरिरीने सहभागी होताहेत, हे मान्य करावे लागेल. तरीही, ग्रामीण भागातून आलेल्या लोकांसाठी मायभगिनींसाठी महानगरातील विकासाची साधनं हे अप्रूप असतं. यावेळी या वारकर्‍यांनी चक्क पुण्यातून धावणार्‍या मेट्रोतून प्रवास अनुभवला आणि या मेट्रो प्रवाशांची संख्या लाखांहून अधिकच्या घरात पोहोचली. तसे पाहिले तर दि. 30 जून रोजी पुणे मेट्रोत प्रवास करणार्‍यांची संख्या उपलब्ध आकडेवारीनुसार होती 1 लाख 99 हजार 437 इतकी आणि त्या दिवशीचे उत्पन्न होते 24 लाख 15 हजार 693 रुपये. प्रवासीसंख्येत दुपटीने वाढ म्हणजे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला आणि सुरक्षित प्रवासाला लोकांनी दिलेली पसंतीच म्हणता येईल. याशिवाय, दिवसेंदिवस पुणे मेट्रो आता विस्ताराकडे आणि प्रवासी सुविधांकडे वाटचाल करीत आहे. विशेष म्हणजे, अ‍ॅपद्वारे या सुविधा प्रवाशांना सहज उपलब्ध होत असल्याने त्याचा वापरदेखील वाढत आहे. विद्यार्थ्यांना पास आणि मासिक पास योजनेतूनदेखील मेट्रो तत्पर असल्याचे दिसून येते. एकीकडे वाहतूककोंडी आणि वाहनांच्या अपघाताने दिवसागणिक जीव जात असताना, प्रवाशांनी दिलेले हे प्राधान्य इतरांसाठीदेखील प्रेरक आणि उपयुक्तच! हीच खरी लाखाची गोष्ट!

कोटींचा उत्साह


'पुणे तेथे काय उणे’ ही म्हण आता जगप्रसिद्ध. कारण, विदेशात असलेले भारतीय नागरिकदेखील पुण्याचे गुणगान करताना थकत नसल्याचे वारंवार अनेक प्रसंगातून दिसून येते. अनेक उपक्रमांत, सामाजिक कार्यात आणि देशाच्या प्रगतीसाठी पुणेकरांचे भरीव योगदान. सध्या सुरू असलेल्या वारी सोहळ्यासाठीदेखील या विदेशातील पुणेकरांनी दिलेल्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित होते. अत्यंत शिस्तबद्ध अशा या वारीने अनेकांना भुरळ घातली. त्यामुळे जगाच्या पाठीवर अशा अनोख्या सोहळ्यांची दखल अनेकांना घेणे भाग पडते. यावेळी या सोहळ्यात दरवर्षीप्रमाणे अगणित वारकरी सहभागी झाले. अतिशय शिस्तबद्धरीतीने निघणारा हा माणसांचा कारवा कोणत्याही अपेक्षेविना अनेक अडथळे पार करीत पंढरपूरकडे मार्गक्रमण करीत असतो. कालानुरूप या पालख्या आणि वारीतील लोकांसाठी सेवेची दारे अनेक समाजोपयोगी संस्था आणि शासनाने अलीकडील काळात उघडी केल्याने ‘नाही’ म्हणायला वारकर्‍यांच्या या प्रवासातील वेदना कमी व्हायला मदत झाली. थेट चरणसेवेपासून ते त्यांच्या आरोग्याची काळजी करेपर्यंत अनेकांनी सेवेत कोणतीही कसर ठेवली नाही. शासनाने ‘निर्मल वारी’तून स्वच्छतेचा संदेश देत यात सहभाग नोंदविला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या वारीत केवळ आणि केवळ माणूस आणि माणुसकी याचेच दर्शन होत असते. भेदाभेद आणि अमंगळ गोष्टींना यात थारा नसतो. सामूहिक प्रयत्नांतून सकारात्मक आणि ऐक्याचा संदेश यातून दिला जात असतो. शिवाय, उर्जेचा अनोखा आविष्कार यातून प्रकट होत असतो, म्हणूनच यात केवळ अध्यात्माकडे वळलेले लोक सहभागी होतात असे नव्हे, तर या आधुनिक काळातील तरुणाईदेखील तितक्याच हिरिरीने यात सहभागी होऊ लागली आहे. ही वारी अध्यात्मासह ऐक्य आणि समतेचा संदेश देत ठिकठिकाणी नवी ऊर्जा प्रदान करीत असते. यातून समाजात नेमका चांगला संदेश जात असतो. काही नतद्रष्ट लोक यात विघ्न आणायचा प्रयत्न करीत असतात. मात्र, वारकरी त्यांना किंमत देत नाहीत, हे देखील अत्यंत महत्त्वाचे. अन्य संस्थांनीदेखील पुढाकार घेत यात आवश्यक ते सर्व सहकार्य केल्याने जगाच्या पाठीवर कोठेही नसेल, असा हा दिव्य, भव्य आणि अनोखा सोहळा अनुभवता येतो, हा चमत्कारच म्हणावा लागेल.

अतुल तांदळीकर