अ‍ॅडमिरल डेव्हिड ग्लासगो फरगान

    05-Jul-2024
Total Views |
David Fargan

दि. 12 एप्रिल 1861 या दिवशी अमेरिकन यादवी युद्ध सुरू झाले, तेव्हा डेव्हिड फरगान कमांडर होता. दि. 29 एप्रिल 1862 या दिवशी न्यू ऑर्लिअन्स बंदरात जी आरमारी लढाई झाली, तिच्यात फरगानच्या हाताखालील आरमाराने बंडखोर आरमाराचा धुव्वा उडवून निर्णायक विजय मिळवला.

साधुसंत असे सांगतात की, कोणताही माणूस जन्म, मृत्यू आणि वाढदिवस या तीन वेळांना परमेश्वराच्याअतिशय जवळ असतो. ते साधुसंत थोड्या विनोदाने, थोड्या खिन्नतेने पुढे असेही सांगतात की, जेव्हा एखादा माणूस जन्म घेत असतो, तेव्हा त्याला देवाच्या कृपेची जाणीव असतेच, पण ती व्यक्त करण्याची शक्ती त्याच्याकडे नसते. जेव्हा एखादा माणूस मृत्यू पावत असतो, तेव्हा तो साधारणपणे बेशुद्ध असतो, कोमात असतो किंवा आपण आता मरणार आहोत, या जाणिवेने भयभीत झालेला असतो. परमेश्वराचे स्मरण शब्दांनीच नव्हे, तर मनातल्या मनात करण्याचीसुद्धा त्याला आठवण राहात नाही. मग आता राहाता राहिला वाढदिवस हा दरवर्षी येणारा ठरलेला दिवस. परंतु, या दिवशी आपण जिवंतपणी, पूर्ण भानावर असताना देवाच्या अगदी निकट असतो, हेच मुळी कोणाला माहीत नसते. यामुळे माणसे वचावचा खाणे, मौजमजा, नाचगाणी करणे यात तो अनमोल दिवसही वाया दवडतात.
आता मी कोणी साधुसंत नव्हे. एक खर्डेघाशा पत्रकार आहे. पण, मला असे वाटते की, माणूस जेव्हा युद्ध लढत असतो, तेव्हाही तो परमेश्वराच्या फार जवळ असला पाहिजे. एकप्रकारे तो योद्धा मृत्यूच्या ओठांवरच तर उभा असतो.

एकतर त्याच्या शस्त्राच्या आघाताने त्याचा शत्रू मृत्यूच्या मुखात ढकलला जाणार असतो किंवा शत्रूच्या आघाताने हा स्वतःच काळाच्या उदरात गडप होणार असतो. कदाचित यामुळेच असेल की, अशा मरण-मारणाच्या हातघाईच्या वेळी जे उद्गार त्याच्या तोंडून निघतात, ते ऐकणार्‍या प्रत्येकाच्या काळजाला हात घालतात. ते उद्गार इतिहासात अजरामर होतात. पिढ्या उलटतात, शतके उलटतात, पण ती माणसे आणि त्यांचे ते उद्गार कवींच्या, शाहिरांच्या, कीर्तनकारांच्या आणि कथाकथकांच्या वाणीतून समाजमनांत खोल झिरपत राहतात. दि. 7 जुलै 1999. कॅप्टन विक्रम बात्रा. फक्त 24 वर्षांचा तरणाबांड झुंजार तरुण. कारगिल युद्ध पेटले आहे. ‘13 जम्मू-काश्मीर रायफल्स’ या पथकातला विक्रम बात्रा ‘पॉईंट 5140’ या शिखरावरच्या यशस्वी चढाईत स्वतःच जखमी झालाय. मश्को नाल्याच्या बाजूला एका सुरक्षित जागी स्लिपिंग बॅगमध्ये आडवा पडून तो बघत आहे की, त्याचे सहकारी आता ‘पॉईंट 4875’ शिखर जिंकण्यात गुंतले आहेत. विक्रमच्या अंगात ताप आहे, पण त्याच्या लक्षात आले आहे की, बटालियनला त्याच्या नेतृत्वाची गरज आहे. विक्रम त्याच्या ‘डेल्टा कंपनी’चे 25 जवान घेऊन गर्द काळोखात निघालासुद्धा. शत्रूचे तीन मशीन गन मोर्चे उद्ध्वस्त करीत दि. 7 जुलै 1999च्या पहाटेस त्याची कंपनी शिखरावर पोहोचली आहे.

विक्रम बेस कॅम्पला संदेश पाठवतो, ‘ये दिल मांगे मोर.’ खरोखरच त्याला पराक्रमाची तहान लागली होती. स्वच्छ सूर्यप्रकाशात विक्रम सरळ समोरच्या मशीन गन मोर्च्यावर धावून गेला.आणि अगदी जवळून गोळ्या झाडत त्याने खडाखड चार पाकिस्तानी ठार मारले. याचा तो भयंकर रणावेश बघून उरलेले तिघे गर्भगळितच झाले. पण, मागच्या मोर्चातल्या एकाने झाडलेली गोळी आणि खांद्यावरून सोडल्या जाणार्‍या अग्निबाणाचा एक घातकी कपचा एकाचवेळी त्याच्या शरीरात घुसले आणि कॅप्टन विक्रम बात्रा कोसळला. आज 25 वर्षे झाली या घटनेला. आता लोकांना ‘ये दिल मांगे मोर’ म्हटले की, कुठलेतरी अमेरिकन पेय न आठवता परमवीर चक्र विभूषित कॅप्टन विक्रम बात्रा आठवतो. दि. 13 जानेवारी 1761. स्थळ - पानिपतची मराठ्यांची धावणी. प्रमुख सेनापती सदाशिवराव उर्फ भाऊसाहेब पेशवे यांनी सगळ्या सरदारांची युद्धबैठक घेतली. योजना सांगितली. आपण गेले दीड-दोन महिने अब्दालीच्या वेढ्यात अडकून पडलो आहोत.
 
गिलच्यांनी आपली रसद रोखून धरली आहे. जनावरेच काय, माणसांनादेखील खायला अन्न नाही. आता हद्द झाली. तेव्हा उद्या म्हणजे दि. 14 जानेवारीला एकामेळाने हा वेढा फोडून काढत पलीकडे जायचे. आघाडीवर इब्राहिमखान गारदीचा तोफखाना राहील. त्याच्या संरक्षक छत्राखाली (अंडर कव्हर) घोडदळ, पायदळ आणि बाजारबुणगे यांनी यमुनेचा तीर गाठायचा. ही योजना सांगितल्यावर भाऊसाहेब आपल्या पुतण्याला म्हणजे विश्वासरावाला म्हणाले, “या मोहिमेतून तुम्हाला सुखरुप सांभाळून आणण्याची जबाबदारी तुमच्या वडिलांनी (म्हणजे नानासाहेब पेशव्यांनी) माझ्या शिरावर दिली आहे. तेव्हा तुम्ही सर्व फौजेच्या मध्यभागी जपून-सांभाळून कूच करा. तुमच्या सभोवती हुजुरातीचे पथक (म्हणजे कमांडो पथक) असेल.” आणि या सल्ल्यावर तो तेजस्वी विश्वासराव पेशवा, तो अवघा 20 वर्षांचा तेजतर्रार तरुण म्हणतो कसा, “काकासाहेब, अहो, हे गिलचे म्हणजे कालचे शेणाचे गोळे, ते आज लोखंडाचे गोळे होऊन आम्हाला शिकस्त देऊ पाहतात? ते काही नाही. मी जातीने गर्दीत घुसून मारामारी करणार. गिलच्यांना शिकस्त देणार.” हे बोलत असताना त्या विश्वासरावाच्या डोळ्यांत पराक्रमाचा असा काही करारी भाव तरळत होता की, तो पाहून भाऊसाहेब थक्क होऊन गेले.
 
सप्टेंबर 1965. भारतीय सैन्य पंजाबच्या खेमकरण सीमेवरून पाकिस्तानी पॅटन रणगाड्यांचा चक्काचूर उडवीत लाहोरच्या दिशेने निघाले. लाहोर शहराबाहेर असलेला इचोगिल हा भलामोठा कालवा म्हणजे लाहोरचे संरक्षण करणारा एक खंदकच आहे. पण, तरीही एकदा भारतीय सैन्याने इचोगिल कालवा गाठला, की लाहोर धोक्यात आले, हे पक्के ठाऊक असल्यामुळे पाक सैन्याने जीव खाऊन प्रतिकार केला. तो सगळा मोडून काढत भारतीय सैन्याने बर्की हे ठाणं जिंकलं आणि ते इचोेगिल कालव्यावर उभे ठाकले. पाक सैन्याने माघार घेताना अर्थातच कालव्यावरचे सगळे पूल उडवले. भारतीय सैन्याने कालवा ओलांडण्याची घाई न करता, अलीकडेच पक्के मोर्चे बांधले. भारतीय टेहळणी पथके उंच झाडांवर चढून दुर्बिणीतून पाक सैनिकांच्या हालचाली टिपू लागली, यांच्या दुर्बिणींना भेट लाहोर शहरातली बाटा कंपनीच्या कारखान्याची उंच चिमणीसुद्धा दिसू लागली. पाकड्यांना काही हे पसंत पडेना. त्यांनी काय करावे? इचोगिलच्या निकडच्या काठावर त्यांनी एक उंचच उंच लाकडी फळ्यांची भिंत उभारली. देवा रे! देवाने जेव्हा सर्व मनुष्यांना अक्कल वाटून दिली, तेव्हा हे पाकिस्तानी कुठे होते? आता यावर आपल्या लोकांनी काम करावे?
 
1958 साली बी. आर. चोपडाने सुनील दत्त आणि वैजयंतीमाला यांना घेऊन ’साधना’ नावाचा चित्रपट काढला होता. त्यातली एन. दत्ता यांनी संगीत दिलेली आणि महंमद रफीने गायलेली ‘आज क्यों हम से परदा हैं’ ही कव्वाली खूपच गाजली होती. आपल्या कमांडिंग ऑफिसरने ती रेकॉर्ड मागवून घेतली. एका उंच झाडावर दोन-तीन मोठे भोंगे लावले आणि दिवसरात्र मी रेकॉर्ड वाजवायला सुरुवात केली. मृत्यूच्या ओठांवर विनोद करता येत नाही, असे कोण म्हणतो? चिडलेल्या पाकड्यांनी मशीन गनच्या फैरींची सतत धार धरली. आमच्या लोकांनी खदाखदा हसत तितक्याच जोषात प्रत्युत्तर दिले. 1971चे बांगलादेश युद्ध. लेफ्टनंट जनरल सगत सिंग यांनी आपली ‘चौथी कोअर’ ढाक्याच्या पिछाडीला आणली. तिथे त्यांना आडवी आली मेघना नदी. हाताखालचे अधिकारी नदीत रणगाडे घुसवायला घाबरू लागले. जनरल साहेब म्हणाले, “बेधडक घुसा. अर्थ रणगाडे वाहून गेले तरी बेहतर, उरलेले अर्धे रणगाडे घेऊन मी ढाक्यात घुसणार.” प्रत्यक्षात संपूर्ण रणगाडापथक सुखरुप पलीकडे पोहोचले आणि त्यांनी ढाका शहर जिंकले.
 
आरमार आधी की आर्माडा आधी, याबाबत भाषातज्ज्ञांमध्ये मतभेद आहेत. म्हणजे असे की, 15व्या शतकापासून युरोपीय लोक नौकानयन शास्त्रात पुढारले. तोपर्यंत अरब लोक हेच सर्वश्रेष्ठ दर्यावर्दी होते. त्यामुळे लढाऊ जहाजांचा काफिला या अर्थी असलेला ‘आरमार’ हा अरबी शब्दच मूळ आहे. मग युरोपीय म्हणजे, मुख्यतः स्पॅनिश दर्यावर्दींनी त्याचा ‘आर्माडा’ हा अपभ्रंश केला. तसंच, ‘फरगान’ आधी की ‘फ्रिगेट’ आधी याबद्दलही मतभेद आहेत. ‘फ्रिगेट’ हा लढाऊ जहाजाचा एक प्रकार आहे, हे आपल्याला माहीतच आहे. पण, तो काही युरोपीय दर्यावर्दींनी शोधून काढलेला नव्हे. अरबांच्या आरमारातही ‘फरगान’ किंवा ‘फरगन’ या नावाने त्या जातीच्या युद्धनौका होत्या. शिवकालीन आरमारातसुद्धा संगमिरी, शिबाडं, यांच्यासह फरगनांचा उल्लेख आढळतो. आक्रमक अरबांनी भूमध्य समुद्रातील जिब्राल्टर हे ठाणे जिंकून युरोप खंडात म्हणजेच स्पेन देशात प्रवेश करावा, तेथील चर्च उद्ध्वस्त करावी, तिथे मशिदी बांधाव्या, मनसोक्त बाटवाबाटवी करावी, बायका पळवाव्या, काही काळाने स्पॅनिश कॅथलिकांनी अरबांचा पराभव करून मशीदींची पुन्हा चर्च करावी, मुसलमानांना पुन्हा ख्रिश्चन करावे, पुन्हा अरबांनी जोर करावा असे तीन-चार वेळा घडले आहे. यातून अरब-स्पॅनिश संकरातून ‘मूर’ ही अरबांची एक वेगळीच जात निर्माण झाली. हे मूर अरब मुसलमान अत्यंत शूर, क्रूर आणि पक्के दर्यावर्दी असतात. कदाचित त्यामुळेच आरमारी परिभाषेत अरबी आणि युरोपीय शब्दांची सरमिसळ होऊन गेली असावी.
 
जेम्स ग्लासगो फरगान हा मूळचा स्पॅनिश ख्रिश्चन. त्याचा बाप जॉर्ज हा अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धात जनरल जॉर्ज वॉशिंग्टनच्या सैन्यातून लढला. पण, हा जॉर्ज फरगान आणि त्याची बायको पुढे लवकरच मरण पावले. तेव्हा जॉर्जचा मित्र डेव्हिड पोर्टर याने त्याच्या मुलाचा जेम्सचा सांभाळ केला. म्हणून जेम्सने डेव्हिड फरगान असेच स्वतःचे नाव लावायला सुरुवात केली. दर्यावर्दीपणा डेव्हिडच्या नसानसांत भिनला होता. वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी तो अमेरिकन आरमारात साधा ’बॉय’ म्हणून दाखल झाला.
दि. 12 एप्रिल 1861 या दिवशी अमेरिकन यादवी युद्ध सुरू झाले, तेव्हा डेव्हिड फरगान कमांडर होता. दि. 29 एप्रिल 1862 या दिवशी न्यू ऑर्लिअन्स बंदरात जी आरमारी लढाई झाली, तिच्यात फरगानच्या हाताखालील आरमाराने बंडखोर आरमाराचा धुव्वा उडवून निर्णायक विजय मिळवला. फरगानच्या नेतृत्वाखाली आरमारी काफिला न्यू ऑर्लिअन्स बंदराच्या दिशेने चालला होता. समोरच्या आरमाराच्या तोफांच्या भडिमारामुळे धूरच धूर पसरला होता. यातूनही फरगानला दिसले की, आपल्या जहाजांचे कप्तान जरा डळमळीत झाले आहेत. त्याने हातातल्या भोंग्यातून जोरात ओरडून याचे कारण विचारले. त्याला तसेच उत्तर मिळाले. टॉरेपेडो! म्हणजे शत्रूच्या पाणसुरुगांच्या भीतीने आम्ही वेग कमी केला आहे. त्यावर भडकून फरगान ओरडला, “टॉरपेडो गेले खड्डयात. सगळी जहाजे पूर्ण वेगाने बंदरात घुसवा.” त्याच्या हुकमाची तंतोतंत अंमलबजावणी झाली आणि अमेरिकन आरमाराने जंगी विजय मिळवला. अब्राहम लिंकनच्या सरकारने फरगानला प्रथम रिअर अ‍ॅडमिरल, मग व्हाईस अ‍ॅडमिरल आणि अखेर अ‍ॅडमिरल बनवले. अमेरिकन राष्ट्राचा तो पहिला अ‍ॅडमिरल. दि. 5 जुलै 1801 ही त्याची जन्मतारीख. याचे वरील उद्गार आजही अमेरिकन नौदलात सुभाषिताप्रमाणे स्मरले जातात.
 
 
मल्हार कृष्ण गोखले