उद्धटासी व्हावे उद्धट!

    23-Jul-2024
Total Views | 39
farmers-unions-call-for-protest


दि. 1 जुलैपासून देशभरात लागू झालेल्या तीन फौजदारी कायद्यांच्या विरोधात आंदोलनाचा निर्णय आंदोलनजीवींनी घेतला आहे. आंदोलन हेसुद्धा उपजीविकेचे साधन असू शकते, याचा शोध नव्यानेच लागलेल्यांपैकी काहीजण हे पुन्हा एकदा शेतकरी होऊन नवी दिल्लीला धडकणार आहेत आणि या आंदोलनजीवींनी मुहूर्त शोधला तो देशाच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याचा! ‘किसान मजदूर संघ’ आणि ‘संयुक्त किसान मोर्चा’ने ‘ट्रॅक्टर मार्च’ काढण्याची घोषणावजा धमकीच सरकारला दिली. तसेच या मोर्चादरम्यान फौजदारी कायद्यांच्या प्रती जाळणार असल्याचेदेखील त्यांनी सांगितले. शेतकर्‍यांच्या नावाखाली निघणारा ‘किसान मोर्चा’ हा एक आता मस्करीचा विषय झाला असून, देशात कोणत्याही गोष्टीसाठी ‘किसान मोर्चा’ काढण्याची एक नवी शैली उदयास आलेली दिसते. किमान एक महिन्याचा शिधा घेऊन आंदोलनजीवी दिल्ली सीमेवर जमा होऊ लागले आहेत. इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, देशाच्या स्वातंत्र्यदिनी मोठा कार्यक्रम असल्याने देशविदेशातल्या पत्रकारांची रेलचेल राजधानीत असते आणि त्या पत्रकारांना असे काही आंदोलन झाल्यास आयते खाद्य भारतावर टीका करण्यासाठी उपलब्ध होऊन जाते. नैसर्गिक न्यायाने या आंदोलनजीवींनी जर काही गोंधळ घातल्यास, पोलिसांना त्यांच्यावर कारवाई करावीच लागेल. मग याचेच भांडवल करून, मगरीचे अश्रू ढाळत विरोधीपक्ष येत्या हिवाळी अधिवेशनात संसदेत गोंधळ घालायला मोकळे! मुळात गेल्या पाच वर्षांचा गांभीर्याने विचार केल्यास, संसदेत गोंधळ घालण्याच्या आधी असेच आंदोलन मुद्दाम सुरू केले जाते. मग त्याच्याच आधारे संसदेचे कामकाज ठप्प पाडले जाते. त्यात देशासाठी महत्त्वाच्या अनेक सुधारणा सरकारला प्रलंबित ठेवाव्या लागल्या. कृषी कायदे माघारी घ्यावे लागल्यानंतर अशी आंदोलने ही मोठी शस्त्र असल्याचे देशांतर्गत आणि परकीय विरोधकांनाही कळून चुकले आहे आणि देशभरातून सहानुभूती मिळण्याचा अशा शेतकर्‍यांच्या वेशातील आंदोलनजीवींचे कुटील मनसुबे आहेत. मात्र, देशाच्या जनतेने हे षड्यंत्र गांभीर्य ओळखण्याची गरज आहे. हे असेच चालू राहिल्यास, या देशात कायदे आणि सुधारणा अवघड होऊन बसेल. म्हणूनच आता सरकारनेही ‘उद्धटासी व्हावे उद्धट’ या नीतीचा अवलंब करण्याचीही गरज आहे.

अखंड सावधान असावे!

या देशातील महान राजनीतीतज्ज्ञ योगेंद्र यादव यांना एक साक्षात्कार नुकताच झाला. “प्रजासत्ताक राष्ट्र हे संसदेत नाही, तर रस्त्यावरील आंदोलनानेच सुरक्षित राहू शकते,” असे दिव्यज्ञान यादवांना या साक्षात्कारात मिळाले. आता साक्षात नाव ‘योगेंद्र’च असल्याने स्थितप्रज्ञ होऊन त्यांनी हे ज्ञान भारतीयांना आणि पर्यायाने संपूर्ण मानव जातीसाठी खुले केले, यातच त्यांचे मोठेपण दडलेले. आता हे अनमोल विचार त्यांनी ज्यावेळी व्यक्त केले, तेव्हा आपल्या कार्यकर्त्यांना नकळत त्यांनी रस्त्यावर उतरून विरोधी चळवळ सुरु करण्याचा सल्लादेखील दिला. काय ते चातुर्य! संपूर्ण जगभरात आज डावे आपल्या निर्बुद्धतेचे अखंड प्रदर्शन घडवत असताना, योगेंद्र यादव यांच्यासमोर कार्यकर्ते बसतात तरी कसे, हेच कळत नाही. एकीकडे गांधीजींच्या अहिंसेचे दाखले द्यायचे आणि दुसरीकडे मात्र देश पेटवण्यासाठी जमीन भुसभुशीत करून ठेवण्याचे कार्यक्रम योगेंद्र यादवांसारख्या बंडलबाजाने सुरु केले आहेत. प्रत्यक्षात खांदा जरी यादवांचा असला, तरी बंदूक कोणाची आहे, हे वेगळे सांगायची गरज नाही. पंतप्रधान मोदी काही केल्या सत्तेत येत नाहीत, ही डाव्यांची मधुर स्वप्ने उद्ध्वस्त झाल्यानंतर, देशात येनकेनप्रकारे दंगल घडवण्याची तयारीच डावे करत असल्याची कबुली योगेंद्र यादव यांनी दिली आहे. त्यामुळे प्रजासत्ताक भारताची अंतर्गत शांतता धोक्यात आणण्याचा कट केल्याच्या आरोपाखाली सरकारने योगेंद्र यांच्यावर कारवाई करावीच. पण, यापेक्षाही दुर्दैवी म्हणजे, आपल्याच देशात अशांतता पसरवण्यासाठी याच देशातील काही नतद्रष्ट कटकारस्थाने करीत आहेत. देशात बहुमताचे सरकार नको, म्हणून जनतेने थोडे झुकते माप विरोधीपक्षांना दिलेही. पण, निवडणुकीत विरोधी पक्षाच्या रंगमंचावर फुगडी घालणारे योगेंद्र यादव या जनतेच्या निर्णयावरही समाधानी दिसत नाहीत. याचे कारण त्यांचा लोकशाही व्यवस्थेवर मुळी विश्वासच नाही. कारण, डाव्यांना मुळात लोकशाही व्यवस्थाच मान्य नाही. देशातील लोकशाही व्यवस्थाच उलथवून टाकण्यासाठी रस्त्यावर उतरून रक्तरंजित संघर्षाचा जुनाच मार्ग डाव्यांनी निवडला आहे. तेव्हा जनतेने अशा अराजकवाद्यांपासून अखंड सावधान असणे, हेच देशाच्या भविष्यासाठी आवश्यक आहे.

कौस्तुभ वीरकर
अग्रलेख
जरुर वाचा
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागरी क्षेत्रातील आरोग्य प्रकल्पांच्या कामांसाठी प्रत्येक पालकसचिवांनी नियोजनबध्द कार्यक्रम आखावा आरोग्य विभागाच्या पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी ग्रामीण व शहरी भागात लोकसंख्यानिहाय आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी काटेकोर नियोजन करा. नागरी क्षेत्रातील आरोग्य प्रकल्पांची कामांसाठी प्रत्येक पालकसचिवांनी नियोजनबध्द कार्यक्रम आखून या कामांना गती द्यावी.सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देवून आपले सरकार संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात याव्यात अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121