‘सीन’किनारी जमला जागतिक क्रीडा मेळा...

    21-Jul-2024
Total Views | 114
 Paris Olympics
 
शुक्रवार, दि. २६ जुलैपासून फ्रान्समधील पॅरिस शहरात सीन नदीच्या किनारी जागतिक क्रीडा मेळा अर्थात ऑलिम्पिक स्पर्धांची मेजवानी क्रीडाप्रेमींना अनुभवता येईल. त्यानिमित्ताने ऑलिम्पिक स्पर्धांचा संक्षिप्त इतिहास आणि या स्पर्धेशी निगडित भारतीयांचे विक्रम यांची रंजक सफर घडवून आणणारा आजचा माहितीपूर्ण लेख...
 
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती मंगळवार, दि. २३ जुलै रोजी आपण साजरी करत आहोत. सर्वप्रथम त्यानिमित्त त्यांना शतश: नमन. ‘गीतारहस्य’कार, ’द आर्क्टिक होम इन द वेदाज’ आणि ‘ओरायन’ हे संशोधनात्मक प्रबंध लिहिणार्या टिळकांचे जागतिक स्तरांवरील घडामोडींबाबतचे ज्ञानही अगाध होते.
 
लोकमान्यांच्याही पसंतीस उतरलेला ‘मेळा’
ज्या टिळकांनी वाचन व चिंतन करून हिंदू धर्मग्रंथांचा सखोल अभ्यास केला होता, त्या महापुरुषाने जागतिक पटलावरील अभ्यासात ग्रीक संस्कृतीचाही अभ्यास केला होता. टिळकांनी त्या अभ्यासात क्रीडा मेळ्याबाबत म्हणजे ग्रीसच्या ऑलिम्पिकबद्दलही जाणून घेतलं. दर चार वर्षांनी सर्व ग्रीक नगर, राज्यातील खेळाडू ’ऑलिम्पिया’त एकत्र येत. तेथे त्यांच्यात विविध खेळांच्या स्पर्धा पारल पडत.
 
दर चार वर्षांनी उन्हाळ्याच्या मध्यात ग्रीकांचे एक दैवत असलेल्या ‘झ्यूस’च्या उत्सवार्थ ऑलिम्पिक सामनेही भरवले जात. त्या सामन्यांत अश्वशर्यती, धावणे, भालाफेक, थाळीफेक, कुस्ती, कसरती इत्यादींचा समावेश असे. या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धाकाळात सर्व युद्धांना बंदी असे. ‘सिटियस, ऑल्टियस, फॉर्टियस’ म्हणजे ‘गतिमानता, उच्चता, तेजस्विता’ अशी बोधवाक्ये ज्या सद्भावना, मैत्र, शांतता या विचारांना जागतिक स्तरावर मूर्त स्वरूप देतात, त्या क्रीडा स्पर्धा म्हणजे ऑलिम्पिक. आज आपण अनुभवत आहोत, त्या आधुनिक ऑलिम्पिक स्पर्धांचे मूळ त्या प्राचीन ग्रीक संस्कृतीत दडलेलं आहे.
 
विविध ग्रीक राज्यांना एकत्र आणण्यात ऑलिम्पिकचा वाटा असतो, हे लोकमान्य टिळकांनी जाणले. सन १८९३ मध्ये त्यांनी जुन्या काळातील घरगुती गणेशोत्सवाला नव्या स्वरूपात पुनरुज्जीवित करत त्याला दहा दिवसांच्या सामाजिक उत्सवाचे स्वरूप दिले आणि तो गणेशोत्सव आणि ती शिवजयंती यांचा उत्सव त्यांनी लोकांना संघटित करण्यासाठीही वापरात आणला. ऑलिम्पिकसारखं स्वरूप आपल्या हिंदू संस्कृतीत असलेल्या गणेशोत्सवात रुजवण्यासाठी, या उत्सवांचे एक प्रमुख अंग म्हणून त्यात भरणार्या मेळ्यांवर टिळकांनी विशेष भर दिला. समाजाला एकत्र आणणे आणि त्यांची एकता वृद्धिंगत करण्यासाठी त्यांनी असे उत्सव, मेळे यांचा वापर केला. टिळकांच्याही पसंतीस उतरला होता, त्या ग्रीकांचा जगप्रसिद्ध झालेला जागतिक क्रीडा मेळा म्हणजे हे ऑलिम्पिक!
 
‘सीन’तीरावरील जागतिक मेळे
फ्रान्सच्या पॅरिस या राजधानीच्या नदीकिनारी तसा क्रीडामेळा एकदा आधी १९०० व १९२४ साली भरला होता अन् आता २०२४ मध्ये पुन्हा एकदा ‘सीन’ नदीकिनारी ऑलिम्पिकच्या स्वरूपात शुक्रवार दि. २६ जुलै ते ११ ऑगस्टदरम्यान भरत आहे. या वर्षीच्या आषाढी देवशयनी एकादशीच्या सोहळ्यासाठी लाखो वैष्णवांचा मेळा वाळवंटी चंद्रभागेच्या तीरी जसा विठूच्या हरिनामाचा झेंडा रोवत डाव मांडण्यासाठी जमला होता, तसा भारतमातेच्या पुत्रांचा ११७ क्रीडापटूंचा अन् सोबत अत्यावश्यक असलेल्या १४० साहाय्यकांचा एक मेळा ‘सीन’ तीरावर ऑलिम्पिकचे डाव मांडण्यासाठी गोळा झाला आहे. १९०० साली व १९२४ साली भरलेले ते मेळे ऑलिम्पिकची अनुक्रमे दुसरी व आठवी आवृत्ती होती, तर या २०२४ साली भरणारा हा क्रीडामेळा ही ऑलिम्पिकची दददखखख अर्थात ३३वी आवृत्ती असेल.
 
 
दिंडी चालली...
वर्षभरातील अनेक मोठ्या एकादशींनिमित्त पंढरपूरला पालखी सोहळ्याला प्रतिवर्षी जाणार्या दिंड्या आपण बघत असलो, तरी त्यातील आषाढीला जसे विशेष महत्त्व असते, तसेच विशेष महत्त्व या क्रीडा मेळ्यातील ऑलिम्पिकचे असते. दरवर्षी राष्ट्र मंडळ क्रीडा स्पर्धा, जागतिक विजेतेपद (वर्ल्ड चॅम्पियनशिप) यांसारख्या महत्त्वाच्या जागतिक स्पर्धा अनेक ठिकाणी आयोजित केल्या जातात आणि जगभरातील अनेक क्रीडापटू त्यात सहभागी होत असले, तरी त्या सगळ्यांचे लक्ष लागून राहिलेलं असतं ते ऑलिम्पिकवर.
 
ठिकठिकाणांहून येणार्या दिंडीतील वारकरी जसे चंद्रभागेच्या तीरी एकत्र जमतात, तसे वातावरण सध्या आयफेल टॉवरजवळील सीन नदीकिनारी आपल्याला दिसेल. पंढरपुरी जाणार्या वारकर्यांच्या एका समूहाने जाणार्यांचा स्वतःचा असा एक पथकप्रमुख म्हणजेच एक दिंडीप्रमुख असतो. दि. १७ जुलैच्या बुधवारी महाराष्ट्र, कर्नाटक वगैरे प्रदेशांतून पंढरपूरच्या यात्रेत सहभाग घेणार्या भक्तजनांच्या दिंड्या आपण पाहिल्या. तशा दिंड्या सीनकिनारी २६ जुलैच्या शुक्रवारी आढळणार आहेत.
 
दिंडी म्हणजे पालखीबरोबर एका अधिकारी सन्माननीय जाणकार व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली एकत्र चालणारा वा राहणारा वारकर्यांचा समूह. संतांची किंवा दिंडी काढणार्यांची नावे दिंड्यांना असतात. ठराविक वेळी देवाच्या भेटीस जाणे याला ‘वारी’ म्हणतात. यावरून दिंडीतील लोकांना ‘वारकरी’ असे म्हणतात. पालख्यांच्या बरोबर ठरलेल्या क्रमाप्रमाणे दिंड्या एकामागे एक चालत असतात. दिंड्यांमध्ये स्त्रिया व मुलेही असतात. अध्यात्माप्रमाणेच क्रीडाक्षेत्रातील ऑलिम्पिकमध्येही आपल्याला तशाच दिंड्या दिसून येतील. प्रत्येक देशातील लहान-मोठे स्त्री-पुरुष क्रीडापटू, त्या-त्या देशाचे प्रशिक्षक, वैद्यकीय व प्रबंधन कर्मचारीवर्ग अशांचा एक गट ऑलिम्पिक ग्रामाला रवाना होतो.
 
पंढरीला जाणार्या दिंडीप्रमाणेच तसे ते चित्र दिसते. आपण पंढरपूर यात्रेला ज्या गटाने जातो, त्या गटाचा एक दिंडीप्रमुख असतो, तद्वतच पॅरिस ऑलिम्पिकसाठी जाणार्या भारतीय क्रीडापटूंच्या मेळ्याचा एक गटनेता ठरला आहे. भारतीय ऑलिम्पिक समितीने तसा या वेळचा दिंडीप्रमुख अर्थात ‘शेफ-डी-मिशन’ म्हणजेच अभियानप्रमुख, संघ व्यवस्थापक प्रमुख अशी जबाबदारी नक्की केली आहे. पालख्यांच्या बरोबर ठरलेल्या क्रमाप्रमाणे दिंड्या एकामागे एक चालत असतात. दिंडीमध्ये स्त्रिया व मुलेही असतात. सर्व वैष्णवांच्या हातांत भगव्या पताका असतात. पॅरिस ऑलिम्पिकच्या उद्घाटन आणि समारोपाच्या दिवशी ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्यांची एक संचलन मिरवणूक अगदी पंढरीच्या वारकरी दिंडीप्रमाणे जाताना आपल्याला दिसेल.
 
पॅरिस २०२४ ऑलिम्पियाडचे खेळ आता सुरू होत असून, जगभरातून या क्रीडा मेळ्यात २०६ देशांतील १०,६७२ खेळाडूंनी ३२ खेळांमधील ३२९ स्पर्धांमध्ये भाग घेतला असून, पॅरिस ऑलिम्पिक हे सर्वात मोठे आणि सर्वसमावेशक खेळ असल्याचे दिसून येते. जसा हातात वीणा घेतलेला मनुष्य दिंडीचा सर्वाधिकारी असतो, तसा पॅरिसला आलेल्या देशांचा हा ‘शेफ-डी-मिशन’ असतो. पंढरपुरी जाण्यासाठी दिंडी काढताना पालखीच्या अधिकार्यांची मान्यता घ्यावी लागते, तशी मान्यता जागतिक ऑलिम्पिक समितीला सादर करण्यासाठी क्रीडा मंत्रालय आणि राष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची लागते. तशी भारतीय क्रीडाविश्वातील एक सर्वमान्य यादी अधिकारीवर्गाकडे सोपविण्यात आली आहे. यावेळी गगन नारंगची प्रमुख ध्वजवाहकपदासाठी निवड केली असून, पी. व्ही. सिंधू आणि शरत कमल हे सह-ध्वजवाहक असतील.
 
शुक्रवारी पॅरिसला भरणार्या या आधुनिक ऑलिम्पिकबाबत आपण थोडे जाणून घेऊ.
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती : ऑलिम्पिक या आघाडीच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे उन्हाळी आणि हिवाळी असे दोन प्रकार असतात. बॅरन पियरे डी कौबर्टिन यांनी १८९४ मध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (आयओसी) ची स्थापना केली, ज्यामुळे १८९६ साली अथेन्समध्ये पहिले आधुनिक ऑलिम्पिक झाले. ‘आयओसी’ ही ऑलिम्पिक चळवळीची प्रशासकीय संस्था आहे, ज्यामध्ये ऑलिम्पिक खेळांमध्ये सहभागी असलेल्या सर्व संस्था आणि व्यक्तींचा समावेश असतो.
तीन पदकांची प्रथा : सुवर्ण, रौप्य आणि कांस्य अशी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय स्थानांवर येणार्यांना पदके प्रदान करण्याची प्रथा १९०४ साली सेंट लुईस येथे अमेरिकेच्या ऑलिम्पिकमध्ये पडली.
 
एकमेव विक्रमी संघ : आज ऑलिम्पिक हॉकीत भारतीय पुरुषांचा असा एकमेव संघ आहे की, ज्याने सन १९२८, १९३२, १९३६, १९४८, १९५२, १९५६, १९६४ आणि १९८०च्या स्पर्धेत एकूण आठ सुवर्णपदके मिळवून एक विक्रम केला आहे. त्यापैकी १९२८ ते १९६० या दरम्यान झालेल्या स्पर्धेत भारताने एकही सामना गमावला नव्हता. खाशाबांची खासियत : हेलसिंकी १९५२च्या ऑलिम्पिकमध्ये फ्री-स्टाईल कुस्तीत खाशाबा दादासाहेब जाधव यांनी कांस्यपदक पटकावले होते.
 
ऑलिम्पिक पदक जिंकणारे ते स्वतंत्र भारतातील पहिले खेळाडू होते. सन १९०० मध्ये, वसाहतकाळात भारतासाठी अॅथलेटिक्समध्ये दोन रौप्यपदके जिंकणार्या नॉर्मन प्रिचर्ड यांच्यानंतर खाशाबा जाधव हे स्वतंत्र भारतातील पहिले वैयक्तिक खेळाडू होते, ज्यांनी ऑलिम्पिक पदकावर नाव कोरले होते. खाशाबा यांच्या आधीच्या वर्षांमध्ये भारत फक्त ‘फील्ड हॉकी’ या सांघिक खेळात सुवर्णपदक जिंकत असे.
 
एकही गोल न स्वीकारणारा संघ : सन १९२८ ला झालेल्या मस्टरडॅम नेदरलँड आणि सन १९५६ च्या मेलबर्न ऑस्ट्रेलियात झालेल्या ऑलिम्पिक हॉकी स्पर्धेतील भारतीय पुरुष संघाने जेव्हा सुवर्णपदक मिळवले होते, त्या स्पर्धेत भारताने एकही गोल स्वीकारला नव्हता. भारत हा तसा एकमेव संघ होता.
 
पहिली महिला खेळाडू : सन १९०२ साली ब्रिटिशांच्या काळातील भारतीय सैन्यदलात ‘मेजर’ या हुद्द्यापर्यंत गेलेली नोरा मार्गारेट पोली ही फ्रान्समधील १९२४च्या ऑलिम्पिकमध्ये टेनिस क्रीडा प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करणारी पहिली महिला ठरली. सिडनी २००० ऑलिम्पिकमध्ये, भारोत्तोलन क्रीडा प्रकारात कर्णाम मल्लेश्वरीने स्नॅच पद्धतीत ११० किलो वजन उचलले आणक्लीन अॅण्ड जर्क पद्धतीत १३० किलो असे एकूण २४० किलोसाठी तिने कांस्यपदक मिळवले आणि ऑलिम्पिक पदक जिंकणारी भारताची कर्णाम मल्लेश्वरी ही पहिली महिला ठरली.
 
 
पहिला ध्वजवाहक : बेल्जियममधील अँटवर्प येथे १९२०च्या ऑलिम्पिकमध्ये उद्घाटन समारंभात भारतीय राष्ट्रध्वज हाती घेणारा पहिला ध्वजवाहक ४०० मीटरचा धावपटू पूर्मा सी. बॅनर्जी हा होता. असा होता तो पहिला ध्वज : आपण प्रथम ऑलिम्पिक पदक मिळवले, ते पॅरिसमध्ये खेळविल्या गेलेल्या सन १९००च्या ऑलिम्पिकमध्ये. भारतातर्फे नॉर्मन प्रिचर्ड हा एकमेव खेळाडू सहभागी झाला होता. त्यावेळी भारत देश स्वतंत्र नव्हता, तरीही भारताचे निकाल ब्रिटिशांच्या निकालापासून वेगळे नोंदवले गेले. ब्रिटिशवंशीय भारतीय खेळाडू नॉर्मन प्रिचर्डने दोन रौप्यपदके मिळवली.
 
ब्रिटिशवंशीय असला तरी तत्कालीन निवास भारतात होता आणि त्याने भारतातर्फे सहभाग घेतला होता, त्यामुळे प्रिचर्ड हा भारतासाठी ऑलिम्पिक पदक मिळवणारा पहिला खेळाडू ठरला. तेव्हाचा भारताचा ध्वज कसा होता, ते सोबतच्या चित्रात आपल्याला दिसेल. स्वातंत्र्यानंतरचे वैयक्तिक रौप्यपदक : देशाचे माजी क्रीडामंत्री आणि राजस्थानचे विद्यमान क्रीडामंत्री राज्यवर्धन सिंह राठोड लष्करी पार्श्वभूमी असलेला एक भारतीय नेमबाज. त्याने अथेन्समध्ये २००४च्या ऑलिम्पिक स्पर्धेत ‘डबल ट्रॅप’ प्रकारात रौप्यपदक जिंकले. वैयक्तिक रौप्यपदक जिंकणारा तो पहिला भारतीय (स्वातंत्र्यानंतर) ठरला.
 
भारताचा सर्वाधिक सहभाग : भारताचे प्रतिनिधित्व करायला जाणार्या पात्र क्रीडापटूंची संख्या आज वाढताना दिसते. २०२०च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये १२४चा सर्वाधिक संख्या असणारा चमू होता, तर २०२४च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ११३चा चमू सहभागी होत आहे.
 
खुद्द महापौरांचे जलतरण : पॅरिसच्या महापौर ६५ वर्षीय अॅन हिडाल्गो यांनी २०२४ पॅरिस ऑलिम्पिक सुरू होण्यापूर्वी तेथील सीन नदीच्या पाण्याच्या गुणवत्तेविषयी शंका दूर करून दाखवून देताना त्यांनी स्वतः सीन नदीत डुबकी घेतली. पॅरिसची सीन नदी अनेक वर्षांपासून आपल्या अस्वच्छतेमुळे चर्चेत होती. अस्वच्छतेमुळे या नदीत गेल्या १०० वर्षांपासून पोहण्यास बंदी होती. पॅरिस ऑलिम्पिकमधील मॅरेथॉन जलतरण आणि ट्रायथलॉन स्पर्धा या नदीवर होणार आहेत. या नदीच्या स्वच्छतेसाठी ११ हजार कोटी रुपयांहून अधिक खर्च करण्यात आला आहे.
 
’के-९’ची टीम पॅरिसमध्ये दाखल : केंद्रीय क्रीडा मंत्रालय, राष्ट्रीय क्रीडा संघटना, आयओसी असे अनेकजण खेळाडूंच्या दिमतीला जसे आहेत, तसेच खेळाडूंच्या सुरक्षेसाठी भारताच्या केंद्रीय राखीव पोलीस दलाचे विशेष प्रशिक्षण घेतलेले ‘के-९’ हे श्वानपथक फ्रेंच सरकारच्या विनंतीवरून तैनात करण्यात आले आहे. ‘के-९’ श्वानपथक तेथील विविध स्थळांना सुरक्षा पुरवण्यासाठी गेलेले ‘विशाल’ आणि ‘डेन्बी’ हे ‘बेल्जियन शेफर्ड मालिनॉइस’ हे श्वान वयाच्या पाच आणि तीन वर्षांचे आहेत. १० जुलै रोजीच ते श्वानपथक त्याच्या पालकांसमवेत पॅरिसला पोहोचले आहे.
  
राज्यसभा सदस्याने गरज अधोरेखित केली: खेळाडूंचे हित लक्षात घेऊन राज्यसभा सदस्य असलेल्या पी. टी. उषा यांच्या अध्यक्षतेखालील भारतीय ऑलिम्पिक संघटनेने या वर्षी एक क्रांतिकारी पाऊल उचलले. याआधी खेळाडू व साहाय्यक अधिकारीवर्ग यांच्यात थोडी दरी असायची, पण आता खेळाडू आणि सोबतचा अधिकारीवर्ग यांचे प्रमाण समानच ठेवले आहे. पॅरिसवारीसाठी ११७ खेळाडूंची जी निवड करण्यात आली आहे, त्यांना ६८ प्रशिक्षक व ५० साहाय्यक मार्गदर्शक यांचा लाभ मिळणार आहे.
  
शुभं भवतु : चला तर मग अशीच क्रांतिकारक कामगिरी आपल्याही खेळाडूंनी करत स्वतःचे अन् समस्त भारतीयांचे परिश्रम सार्थकी लावावेत, असे सकारात्मक विचार आपण करू. हे वर्ष आजपर्यंतचे सगळ्यात जास्त पदके मिळवणारे ठरो, अशी अपेक्षा या आपल्या ऑलिम्पिक संघाकडून करत, आपण त्यांना मनापासून शुभेच्छा देत आपले भरभरून आशीर्वादही देऊ.
 
 श्रीपाद पेंडसे
(लेखक माजी खेलकूद आयामप्रमुख, पश्चिम महाराष्ट्र प्रांत, जनजाती कल्याण आश्रम आणि माजी हॉकीपटू आहेत.)
९४२२०३१७०४
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
ऐतिहासिक वसई किल्ला जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्याबाबत शासनदरबारी मागणी : खानिवडे

ऐतिहासिक वसई किल्ला जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्याबाबत शासनदरबारी मागणी : खानिवडे

११ जुलै २०२५ रोजी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ ऐतिहासिक किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाला आहे. अवघ्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचा हा मोठा गौरव आहे. मात्र याचबरोबर पोर्तुगीजांच्या जुलमी जोखडातून वसई प्रांताला मुक्त करणाऱ्या नरवीर  चिमणाजी अप्पा यांच्या साहसी शौर्याची परिसीमा असलेल्या मुंब‌ईपासून अगदी हाकेच्या अंतरावरील वसईच्या ऐतिहासिक किल्लाचा देखील जागतिक वारसा यादीमध्ये समावेश व्हावा यासाठी वसईतील सामाजिक कार्यकर्ते तसेच शिवप्रेमीनितीन म्हात्रे यांनी ..

भाजपा महिला विभागाचे महिला बचत गटांना मार्गदर्शन :खानिवडे

भाजपा महिला विभागाचे महिला बचत गटांना मार्गदर्शन :खानिवडे

नायगांव पूर्व विभागातील जुचंद्र गावात (छत्रपती शिवाजी महाराज चौक) येथील भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा कार्यालयात जुचंद्र परिसरातील नव्याने तयार केलेल्या महिला बचत गटासाठी पहिल्यांदाच मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. वसई विधानसभा आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या मार्गदर्शनात तसेच जिल्हाध्यक्षा प्रज्ञाताई पाटील यांच्या नेतृत्वात महिला मोर्चाच्याहर्षलाप्रविण गावडे यांनी आयोजन केले होते. ह्या महिला बचत गटाच्या मार्गदर्शन शिबिराला वसई पूर्व दक्षिण मंडळाचे अध्यक्ष उदय शेट्टी, अल्पसंख्यांक महिला मोर्चाच्..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121