हाथरसमध्ये चेंगराचेंगरी, १०० हून अधिक मृत्यूमुखी!

    02-Jul-2024
Total Views |
hathras-satsang-stampede


नवी दिल्ली :     उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील सिकंदरराव शहरातील फुलराई गावात मंगळवारी मोठी दुर्घटना घडली. येथे साकार हरी बाबा यांचा सत्संग चालू होता. सत्संग संपल्यानंतर गर्दी येथून निघू लागली तेव्हा चेंगराचेंगरी झाली. चेंगराचेंगरीत आतापर्यंत 116 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्याविषयी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त करून राज्य सरकार या संपूर्ण घटनेची चौकशी करेल, असे ते म्हणाले. विरोधकांच्या आरोपांवर ते म्हणाले की, अशा घटनेवर शोक व्यक्त करण्याऐवजी राजकारण करणे अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि गंभीर जखमींच्या कुटुंबीयांना 50,000 रुपयांची भरपाई जाहीर केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील लोकसभेत आपल्या भाषणात या दुर्घटनेविषयी शोक व्यक्त केला. यावेळी त्यांनी हाथरस दुर्घटनेतील पीडितांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. त्याचप्रमाणे केंद्राचे वरिष्ठ अधिकारी उत्तर प्रदेश सरकारच्या संपर्कात आहेत, असेही ते म्हणाले.