लंकेच्या जनसंपर्काने शरद पवारांना तारले !

अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ

    05-Jun-2024
Total Views |

vikhe v lanke


महाराष्ट्रातल्या ४८ मतदारसंघातील काही बहुचर्चित लढतींमध्ये नगर दक्षिणच्या जागेचा समावेश होता. अहमदनगर लोकसभा मतदारसंघामध्ये शेवगाव, राहुरी, पारनेर, नगर शहर, श्रीगोंदा, कर्जत-जामखेड मतदार संघ येतात. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात महायुतीने खासदार सुजय विखे आणि महाविकास आघाडीने माजी आमदार निलेश लंके यांच्यात लढत झाली. या लढतीत निलेश लंके यांनी विक्रमी मतांनी विजय मिळविला आहे. बहुतांश मतदारसंघात मतदानाची टक्केवारी २०१९च्या तुलनेत वाढली होती. ही वाढलेली टक्केवारी आणि जनसंपर्क हीच निलेश लंकेच्या विजयी गुलालाचे प्रमुख कारण ठरले.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर या दोन पक्षांचे चार पक्ष झाले. त्यामुळे मतांचे विभाजन बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळाले. जगताप समर्थकांचा विखेंच्या उमेदवारीला विरोध आणि लंकेंना असलेला पाठिंबा यामुळे विखेंना या निवडणुकीत चांगलीच कसरत करावी लागली. या निवडणुकीमध्ये प्रामुख्याने कांदा निर्यात, दूध दरवाढ, गुंडगिरी एमआयडीसी आणि लक्ष्मी दर्शन हे मुद्दे प्रामुख्याने गाजले. हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला, २०१९मध्ये भाजपने विद्यमान खासदार दिलीप गांधी यांना बाजूला करत काँग्रेसमधून आलेल्या सुजय विखे पाटील यांना उमेदवारी दिली. यावेळी संग्राम जगताप यांचे आव्हान मोडून काढत सुजय विखेंनी सुमारे तीन लाखांच्या मताधिक्याने विजय मिळवला. मात्र, पाच वर्षाच्या कार्यकाळात जनसंपर्काची कमी आणि अहमदनगर जिल्ह्याच्या विकासासाठी नव्या व्हिजनबाबतची उदासीनता विखेंच्या पराभवास कारणीभूत ठरल्याचे दिसून येते.

अशातच भाजपमधील एक गट विखेंवर नाराज असल्याची चर्चा होती. अशातच निलेश लंके यांनी शरद पवार गटात प्रवेश केल्याने पाठीमागच्या दाराने लंकेना पाठिंबा दिल्याच्या चर्चांना या विजयाने पाठबळ दिले. तर दुसरीकडे सामान्य मतदारांचा विचार करता, गेल्या काही वर्षातील राज्याच्या फुटीच्या राजकारणावरही लोक उघडपणे मत मांडत असल्याचे प्रचारदरम्यान पाहायला मिळत होते. याचे मतांमध्ये रूपांतर झाले आहे का? अशा शक्यताही लंकेच्या विजयामुळे उपस्थित होत आहे.पारनेर मतदार संघ निलेश लंकेचा बालेकिल्ला आहे. कर्जत जामखेडमध्येही रोहित पवार हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार आहेत, तर राहुरी मतदारसंघांमध्ये प्राजक्त तनपुरे हेही राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार आहेत. त्यामुळे या तिन्ही मतदारसंघांचा माजी आमदार निलेश लंके यांना फायदा झालेला पाहायला मिळाला. तर नगर शहरामध्ये अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप आहेत, श्रीगोंदामध्ये आमदार बबनराव पाचपुते यांचे वर्चस्व आहे तर पाथर्डी शेवगाव मतदार संघामध्ये भाजपाच्या आमदार मोनिका राजळे यांचा वर्चस्व आहे. त्यामुळे या ठिकाणी खासदार सुजय विखे यांना मदत झाली. मात्र, पाथर्डी, श्रीगोंदा, कर्जत आणि पारनेर तालुक्यांतून मिळालेली मते या निकालात गेमचेंजर ठरली.

आकडेवारी 

निलेश लंके         राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार   ६, २४, ७९७
डॉ. सुजय विखे    भारतीय जनता पक्ष                ५, ९५, ८६८