लोकसभा निवडणूक २०२४! 'या' पाच राज्यात इंडी आघाडीचा सुफडा साफ

    04-Jun-2024
Total Views |
 INDI
 
नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक २०२४ च्या निकालाची मतमोजणी सुरू झाली आहे. आतापर्यंत झालेल्या मतमोजणीच्या आकडेवारीनुसार, भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए २९७ जागांवर आघाडीवर असून बहुमताचा टप्पा ओलांडला आहे. तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडी आघाडीने २२७ जागांवर आघाडीवर आहे. निवडणूक निकाल हा वर्तवण्यात आलेल्या अंदाजापेक्षा अधिक चुरशीचा झालेला आहे. भाजपप्रणित एनडीएला उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, हरियाणा, राजस्थानमध्ये २०१९ च्या तुलनेत नुकसान होत आहे. तर पाच राज्यांमध्ये भाजपनं आपली ताकद कायम राखली आहे.
 
मध्य प्रदेशातील सर्वच्या सर्व २९ लोकसभा जागांवर भारतीय जनता पक्षाने आघाडी मिळवली आहे. २०१९ मध्ये भाजपनं छिंदवाडा वगळता २८ जागांवर विजय मिळवला होता. यावेळी मात्र, भाजपनं काँग्रेस नेते कमलनाथ यांचा बालेकिल्ला असलेल्या छिंदवाडा मतदारसंघातून भाजपचे बंटी साहू आघाडीवर आहेत. याशिवाय सर्व जागांवर भाजपच्या उमेदवारांना आघाडी मिळत आहे.
 
दिल्लीत लोकसभेच्या सात जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजप सातही जागांवर आघाडीवर आहे. चांदनी चौकातून प्रवीण खंडेलवाल, पूर्व दिल्लीतून हर्ष मल्होत्रा, ईशान्य दिल्लीतून मनोज तिवारी, नवी दिल्लीतून बन्सुरी स्वराज, पश्चिम दिल्लीतून कमलजीत सेहरावत, उत्तर-पश्चिम दिल्लीतून योगेंद्र चंडोलिया आणि दक्षिण दिल्लीतून रामवीर सिंग बिधुरी आघाडीवर आहेत.
छत्तीसगडमधील लोकसभेच्या ११ जागांसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. 11 पैकी १० जागांवर भाजप आघाडीवर आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल हे राजनांदगाव येथील भाजपचे उमेदवार संतोष पांडे यांच्यापेक्षा मागे राहिले आहेत.
  
भारतीय जनता पक्षाचा बाल्लेकिल्ला असलेल्या गुजरातमध्ये २६ पैकी २५ जागांवर आघाडी मिळवली आहे. तर काँग्रेसने एका जागेवर आघाडी मिळवली आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत भाजपनं २६ पैकी २६ जागांवर विजय मिळवला होता.
तेलंगणामध्ये भाजपला मोठी आघाडी मिळाली आहे. भाजपने लोकसभेच्या १७ पैकी ७ जागांवर आघाडी घेतली आहे. राज्यातील सत्ताधारी काँग्रेस आठ मतदारसंघात आघाडीवर आहे, तर नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सत्ता गमावलेली भारत राष्ट्र समिती (BRS) एका मतदारसंघात आघाडीवर आहे. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (AIMIM) हैदराबाद मतदारसंघात आपली आघाडी कायम ठेवत आहे.