- अन्य कोणी दिसल्यास कठोर कारवाई, मोबाईल वापरास बंदी, मार्गावर बसविणार सीसीटीव्ही
17-Jun-2025
Total Views | 9
भुवनेश्वर: यावर्षी पुरी येथील जगन्नाथ रथयात्रेत सेवकांव्यतिरिक्त इतर कोणालाही रथावर चढण्यास मुभा असणार नाही. जर कोणी रथावर चढले, तर ओडिशा सरकार त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करणार आहे. तसेच, सेवकांना रथावर मोबाईल वापरण्यासही बंदी असणार आहे. याबाबत ओडिशा राज्याचे कायदामंत्री पृथ्वीराज हरिचंदन यांनी माहिती दिली.
शिस्त राखण्यासाठी सरकारने संपूर्ण रथयात्रेदरम्यान धार्मिक विधी करणार्या नियुक्त सेवकांची यादीही मागितली आहे. तसेच, पोलीस महासंचालक योगेश बहादूर खुरानिया यांनी रथयात्रेसाठी सुरक्षा आढावा बैठक घेतली. भुवनेश्वरजवळील उत्तरा स्क्वेअर ते पुरी आणि पुरी-कोणार्क रोडला जोडणार्या रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जात असल्याचे पोलीस महासंचालकांनी सांगितले.
पुरीमध्ये ड्रोन आणि अॅण्टी-ड्रोन सिस्टमही तैनात करणार
योगेश बहादूर खुरानिया यांनी सांगितले की, “गर्दी आणि वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी एकात्मिक ‘कमांड अॅण्ड कंट्रोल सेंटर’ची स्थापना केली जाईल. पुरीमधील महत्त्वाच्या ठिकाणी रिअल टाईम मॉनिटरिंगसाठी ‘एआय’ सक्षम सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जात आहेत.”
पुरीमध्ये रॅपिड अॅक्शन फोर्स, केंद्रीय औद्योगिक सुरक्षादल आणि विशेष एजन्सीदेखील तैनात केल्या जातील. यात्रेदरम्यान पुरीमध्ये ड्रोन आणि अॅण्टी-ड्रोन सिस्टमदेखील तैनात केल्या जातील.
रथाच्या कामाचा आढावा
दुसरीकडे, राज्याचे मुख्य सचिव मनोज आहुजा यांनी रविवार, दि. 15 जून रोजी पुरीला भेट दिली आणि रथांच्या बांधकामाचा आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, “रथांचे बांधकाम वेळापत्रकानुसार सुरू आहे.”
रथ बनवणारे कारागीर दिवसातून फक्त एकदाच खातात
पुरीमध्ये भगवान जगन्नाथाच्या यात्रेसाठी रथ तयार करणारे शेकडो कारागीर दिवसातून फक्त एकदाच खातात. त्यांच्या जेवणात कांदा किंवा लसूण नसतो. रथाचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत हे चालू राहते. या कारागिरांना ‘भोई’ म्हणतात. जगन्नाथ मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारापासून रथ बांधणी कार्यशाळा फक्त 70-80 मीटर अंतरावर आहे.
रथ बनविणार्या कारागिरांचे प्रमुख रवी भोई म्हणाले की, “आम्ही दिवसा फळे किंवा हलके काहीतरी खातो. काम संपल्यानंतर, आम्हाला मंदिरातून महाप्रसाद मिळतो. तसेच, आम्ही दररोज 12 ते 14 तास 35-40 अंश आर्द्रता आणि कडक उन्हात काम करत आहोत. आम्ही आळशी होऊ नये आणि आजारी पडू नये म्हणून आम्ही कठोर दिनचर्या पाळतो.”