आंतरराष्ट्रीय पातळीवर मागचे सात-आठ दिवस राजनीतिक आणि कुटनीतीकदृष्ट्या चांगलेतच चर्चेत होते. इटलीच्या अलुपिया शहरात नुकतीच ‘जी ७’ गटाची शिखर परिषद संपन्न झाली. ही शिखर परिषद संपताच स्वित्झर्लंडमध्ये रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्याच्या उपायावर चर्चा करण्यासाठी शांतता परिषद आयोजित करण्यात आली होती.
या शांतता परिषदेत ९० देशांच्या प्रतिनिधींसोबतचं जगभरातील आंतरराष्ट्रीय संस्थांनी सहभाग नोंदवला. पण, या परिषदेतूनही ठोस असं काही समोर आलं नाही. एकीकडे, रशियावर कुटनीतीक दबाव टाकण्यासाठी जग एकवटलं असताना रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन मात्र उत्तर कोरियाच्या दौर्यावर रवाना झाल्याची माहिती समोर आली.
सप्टेंबर २०२३ मध्ये उत्तर कोरियाचे तानाशाह किंम जोंग उन रशियाच्या सहा दिवसीय दौर्यावर गेले होते. या दौर्यात त्यांनी पुतीन यांना उ. कोरियात येण्याचे आमंत्रणही दिले. किंम जोंग उन यांच्या आमंत्रणाचा मान राखत पुतीन मंगळवार, दि. १८ जून रोजी उ. कोरियाला पोहोचले. याआधी पुतीन यांनी २००० साली पहिल्यांदाच राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली, तेव्हा उ. कोरियाला भेट दिली होती. त्यावेळी किम जोंग उनचे वडील किम जोंग इल हे उ. कोरियाचे सर्वोच्च नेते होते. म्हणजे तब्बल २४ वर्षांनंतर पुतीन उ. कोरियाला भेट देत आहेत. पुतीन यांच्या दौर्याविषयी कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. तरीही आंतरराष्ट्रीय माध्यमांचे या दौर्यावर विशेष लक्ष होते. कारण, रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर या दौर्याला महत्त्व प्राप्त झाले होते.
उ. कोरियाचे रशियासोबत सोव्हिएत युनियनच्या काळापासून ऐतिहासिक संबंध राहिलेले आहेत. दोन्ही देशांमध्ये कम्युनिस्ट राजवट असल्यामुळे शीतयुद्धाच्या काळात दोन्ही देशांमध्ये स्वाभाविक जवळीक होती. मात्र, सोव्हिएत युनियनच्या विघटनानंतर रशियासोबत तेवढे घनिष्ट संबंध राहिले नाही. उ. कोरियावर पाश्चिमात्य देशांनी लादलेल्या प्रतिबंधांमुळे दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये काहीशी निष्क्रियता आली होती. पण, आता दोन्ही देश पाश्चिमात्य देशांच्या प्रतिबंधांचा सामना करत आहेत. त्यामुळे दोन्ही देशांना आता पाश्चिमात्य प्रतिबंधांना घाबरण्याची गरज राहिलेली नाही. सध्या दोन्ही देशांना या प्रतिबंधांचा सामना करायचा असल्यास एकत्र येण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे उ. कोरिया-रशिया यांच्यातील द्विपक्षीय संबंध हे मैत्री पलीकडे जाऊन आता परस्पर फायद्याचे ठरु शकतात.
पुतीन यांच्या दौर्यातून रशिया आणि उ. कोरियाला एकमेकांकडून काय हवंय, याविषयी अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत. रशिया मागील दोन वर्षांपासून युक्रेन सोबत न संपणारे युद्ध लढत आहे. काही आठवड्यांत युक्रेनची राजधानी असलेल्या किव्हवर ताबा मिळवण्याची पुतीन यांची योजना पुरती फसली. मागील दोन वर्षांपासून युद्धरत असलेल्या रशियाला दारुगोळ्याबरोबरच युद्धात लढण्यासाठी सैनिकांची सुद्धा कमतरता भासत आहे. रशियाची ही कमतरता उ. कोरिया पूर्ण करु शकते. उ. कोरियाकडे ना दारुगोळ्याची कमी आहे ना माणसांची. त्यामुळे या दोन्हीचा पुरवठा उ. कोरिया रशियाला करू शकते.
उ. कोरियामध्ये माध्यमांना स्वातंत्र्य नसल्यामुळे तिथून कोणतीही बातमी बाहेर येत नाही. पण, काही अहवालानुसार, उ. कोरियात पडलेल्या दुष्काळामुळे तिथे भीषण अन्नटंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. उ. कोरियाला मोठ्या प्रमाणावर खाद्यान्नाची गरज आहे. पण, पाश्चिमात्य देशांच्या प्रतिबंधांमुळे कोणताही देश उ. कोरियासोबत व्यापार करत नाही. रशियाला आता प्रतिबंधांची पर्वा राहिलेली नाही. त्यामुळे रशिया उ. कोरियाला खाद्यान्न पुरवठा करू शकतो. त्यामुळे दोन्ही देशांच्या गरजा पूर्ण होऊ शकतात. त्यासोबतचं दोन्ही नेत्यांना जागतिक पातळीवर आणि देशांतर्गत जागतिक नेता म्हणून प्रोजेक्ट करायची चांगली संधी मिळेल.
उ. कोरियाचे आजघडीला चीन व्यतिरिक्त कोणत्याही देशासोबत व्यापारिक आणि राजनीतीक संबंध नाहीत. रशियासुद्धा पाश्चिमात्य देशांच्या प्रतिबंधामुळे जागतिक पातळीवर वेगळा पडला आहे. या कारणाने पुतीन या दौर्यातून पाश्चिमात्य देशांना संदेश देण्याचा प्रयत्न करत आहेत, तर उ. कोरियासुद्धा पुतीन यांचे आदरातिथ्य करून आपल्या ’मोडेल पण वाकणार नाही’ हे धोरण अमेरिकेला ठणकावून सांगू शकेल. ते काहीही असो, या दोन हुकूमशाही शासकांची भेट जागतिक राजकारणाला कलाटणी देणारी ठरू शकते.