केशवचैतन्य कुंटे यांना कृष्ण मुकुंद पुरस्कार

    08-May-2024
Total Views |
keshavchaitanya kunte 
 
मुंबई : पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रातील संगीत विभागाचे प्रमुख डॉ. केशवचैतन्य कुंटे यांच्या 'भारतीय धर्मसंगीत ' या पुस्तकाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा कै. कृष्ण मुकुंद स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. मंगळवार दि. ७ मे रोजी पुण्यातील माधवराव पटवर्धन सभागृह, टिळक रस्ता, येथे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने ख्यातनाम शास्त्रीय गायक पंडित सत्यशील देशपांडे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी मोहन गुजराथी आणि डॉ. नलिनी गुजराथी यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. तर प्रा. मिलिंद जोशी, कार्याध्यक्ष, मसाप, पुणे हे या कार्याक्रमचे अध्यक्ष होते.
 
यावेळी केशवचैतन्य कुंटेपुरस्काराला उत्तर देताना म्हणाले, "'भारतीय धर्म संगीत' ह्या ग्रंथासाठी गुरुतुल्य पंडित सत्यशील देशपांडे यांच्या हस्ते 'कृष्ण मुकुंद पुरस्कार' लाभणे हा एक सुंदर योग आज जुळून आला. मराठीतील संशोधनपर लेखनासाठी दिला जाणारा हा पुरस्कार कृष्ण मुकुंद उजळंबकर ह्यांच्या जन्मशताब्दीत मिळाला हाही अजून एक चांगला योग. पुरस्काराचे प्रायोजक नलिनी गुजराथी आणि मोहन गुजराथी, निवड समितीच्या प्रा. नीलिमा गुंडी, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पदाधिकारी - विशेषत: मृणालिनी जोशी, सुनीता राजे पवार, प्रा. मिलिंद जोशी ह्या सर्वांचे विशेष आभार. असे पुरस्कार स्वत:वर असलेल्या जबाबदारीची जाणीव करून देऊन अधिक काम करण्यासाठी प्रेरणा आणि ऊर्जा देतात."