हिंदू म्हणूनच मतदान करा!

    19-May-2024
Total Views |
vote
 
महाराष्ट्रात मराठी अधिक मुस्लीम अशी एक नवीन मतपेढी तयार करण्याचे प्रयत्न, उद्धव ठाकरे आणि कंपू करीत आहे. देशभरात मोदीविरोधी मंडळी अशा अनेक प्रयोगांत व्यस्त आहेत. हे लोक यशस्वी झाले, तर काय घडेल, हे कोणीही सांगू शकत नाही. मात्र, याला उत्तर द्यायचे असेल, तर हिंदूंनी हिंदू म्हणूनच मतदान करावे लागेल.
 
आज मुंबईतले मतदान संपूर्ण होऊन महाराष्ट्रातील निवडणुकांची सांगता होईल आणि निकालाकडे सर्वांचे लक्ष लागेल. कोणतीही निवडणूक सत्ताधारी पक्षाला सोपी नसते. हे सरकारही त्याला अपवाद नाही. भारतीय जनता पक्षाच्या सर्व लहान मोठ्या कार्यकर्त्यांनी, या निवडणुकीत अपार कष्ट केले आहे. मोदी व फडणवीस यांनी केलेल्या सभा व प्रचार दौरे, यांची संख्या थक्क करणारी आहे. निवडणूक कार्यकर्त्यांची परीक्षा पाहाते, तशी ती सरकारचीही पाहाते. पक्ष व विचारसरणी म्हणून आपल्या विचारांचे सरकार यावे, असे जगातल्या प्रत्येक पक्षाला वाटत असते. मात्र, अंतिम निर्णय जनतेचाच असतो.प्रत्येक पक्षाला जनतेपर्यंत स्वत:चा विचार घेऊन जायचा असतो. हा विचार जनतेला पटला, आपला कृती आराखडा जनतेला पटला, जनतेने आपल्यावर विश्वास ठेवला, की सरकार निवडून येते. या देशातील कोट्यवधी लोकांनी नरेंद्र मोदींच्या रुपाने भारतीय जनता पक्षावर विश्वास ठेवला. हा विश्वास केवळ पक्षावर नव्हता, तर तो हिंदुत्वालाच राष्ट्रीयत्व मानणार्‍या विचारधारेवर ठेवलेला विश्वास होता. या विश्वासाला प्रतिसाद म्हणून, नरेंद्र मोदींनी गेल्या दहा वर्षांत कामाचा डोंगर उपसला.
 
देशात अभूतपूर्व बदल घडवून आणले. महाकाय प्रकल्प तर आलेच, पण त्याच बरोबर रस्तेही आले. विजेचा तुटवडा कमी झाला. कोट्यवधी लोकांच्या घरी पाणी आणि वीज पोहोचली. गुंतवणुकीच्या संधी आणि परताव्याची खात्री असल्यानेच, विदेशी कंपन्यांनीदेखील आपली गुंतवणूक भारतातच करणे पसंत केले. कामाचे डोंगर उपसण्याचे हे सत्र नरेंद्र मोदी थांबवणार नाहीत. मात्र, या सगळ्यावर कळस रचला गेला, तो राममंदिराचा. शेकडो वर्षे मंदिरात प्रतिष्ठापना होण्याची वाट पाहात असलेला रामलला, यावेळी मंदिरात विराजमान झाला. बॉम्बस्फोटात मृत्युमुखी पडण्याचे प्रकार थांबले, ही आणि अशी कितीतरी नव्या गोष्टींची मोठी सूचीच देता येईल, जी थांबणारी नसेल. मात्र, ही सूची देणे, हा या अग्रलेखाचा उद्देश नाही.
 
निवडणूक कशी लढली जाते, याची आपल्याला पुरेपूर कल्पना आहे आणि ती कशी जिंकली जाते, हेसुद्धा आपण पाहात आलो आहोत. ही निवडणूक दोन राजकीय पक्षांमधली निवडणूक नसून, ती दोन विचारधारांमधील निवडणूक आहे. एका बाजूला घराणेशाही आहे, भ्रष्टाचार आहे. लांगूलचालनाच्या आधारावर मतांचे संपादन आहे आणि दुसर्‍या बाजूला या देशाला अग्रस्थानी मानून सर्व प्रकारच्या रचना आकाराला आणणारी विचारधारा, आणि राजकीय पक्ष आहे. देशाला स्वातंत्र्य प्राप्त होऊन इतकी वर्षे लोटली, मात्र, काही बाबींपासून आपण आजही संपूर्णपणे मुक्त होऊ शकलेलो नाही. जात, पैसा, प्रांतीय अस्मिता यांसारख्या घटकांमुळे आजही मतदाता विचलित होतो. आपण जिंकणारच आहोत, हा विचार करणारा कार्यकर्ताही, कधीतरी कष्टाला मागे पडतो आणि धक्कादायक निकाल लागतात. केवळ राजकीय कार्यकर्ताच नव्हे, तर अनेकदा विचारसरणी मानणारा मतदाताही मागील निवडणुकीच्या निकालाचे आकडे पाहून काहीसा आश्वस्त होऊन जातो. मतदान हे आपले आद्य कर्तव्य आहे आणि ते बजावलेच पाहिजे.
 
महाराष्ट्राच्या संदर्भात तर, स्थिती अत्यंत विपरितच आहे. मोदींना पाठिंबा देण्यासाठी तिन्ही पक्ष एकवटले आहेत. यातील विचारांना पटणारे, न पटणारे असे सगळेच लोक एकत्र आहेत. आजची राजकीय गरज म्हणूनच याकडे पहावे लागेल. महाराष्ट्रात यंदा येऊ घातलेले नवे समीकरण मराठी व मुस्लीम मतांचे आहे. ‘उबाठा’ नावाचा पक्ष एकनाथ शिंदे भारतीय जनता पक्षाबरोबर गेल्यानंतर आकाराला आला. मूळात स्वत:चे काहीच कर्तृत्व नसलेल्या उद्धव ठाकरेंनी शरद पवारांच्या मदतीने सरकार स्थापन केले व महाराष्ट्रात विचारांच्या युतीपासून निर्माण झालेली राजकीय परंपरा खंडित केली. खरेतर वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसून, नंतर स्वत:चे सरकार स्थापन करणार्‍या शरद पवारांनीच महाराष्ट्राच्या राजकारणातील अस्थिरतेला सुरुवात केली होती, ती आजतागायत. हेच शरद पवार आज उद्धव ठाकरेंचे सहकारी आहेत. ही सगळीच मंडळी अराजकवादी आहेत. देशाने या मंडळीच्या आधारावर चाललेला खेळखंडोबा पाहिला आहे. अस्थिर पंतप्रधान देश कसा चालवितो, हेसुद्धा आपण पाहिले आहे. यातील सगळ्याच मंडळींनी आपल्या मतदारांना फसविले आहे.
 
दिल्लीत नैतिकतेचा ढोल बडवत सत्तेवर चढलेल्या केजरीवाल यांनी, दारूच्या घोटाळ्यापासून ते आपल्याच पक्षाच्या महिला खासदाराला बडविण्यापर्यंत सगळे काही केले आहे. राहुल गांधी यांच्याविषयी लिहावे तेवढे थोडे. यात लालू आणि त्यांचा परिवार आहे. उद्धव ठाकरे आणि त्यांचा परिवार ही नवी भर. या मंडळींनी मराठी माणसाला जेवढा लावता येईल तेवढा चुना लावला. सारे काही होऊनही काही माणसे अजून यांच्या सोबत आहेत. मात्र, त्यांवर मतांची बेगमी होणे शक्य नाही. त्यामुळे, ममता बॅनर्जी यांच्याप्रमाणे यांनी आता मुस्लिमांच्या दाढ्या कुरवाळण्याचे धोरण अंगीकारले आहे. ही स्थिती चांगली नाही. कधी नव्हे, ते यंदा छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणार्‍या मराठी माणसाला, हिरवे झेंडे नाचविणार्‍या धर्मांधांसोबत फिरावे लागले. दिल्लीत हा फॉर्म्युला यशस्वी झाला. मोदींच्या विरोधात केजरीवाल उभे राहू शकतात, असे झाल्याबरोबर सगळे धर्मांध एकत्र येऊन उभे राहिले आणि केजरीवाल यांना पाठिंबा दिला. उद्धव ठाकरे तोच खेळ खेळून पाहात आहेत. यात ते यशस्वी झाले, तर महाराष्ट्रात धर्मांधांचा नंगानाच सुरू होईल. प्रत्येक राज्यात मग याचे लहान-मोठे प्रयोग सुरू होतील. या सगळ्याला चाप लावायचा असेल, तर एकच मार्ग उरतो आणि तो म्हणजे, हिंदूंनी हिंदू म्हणूनच मतदान करण्याचा!