रमाबाई आंबेडकर नगरमधील १० हजार झोपड्यांचे सर्वेक्षण!

झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून सर्वेक्षण सुरु

    02-Apr-2024
Total Views |
ghatkopar ramabai nagar survey


मुंबई :     'सर्वांकरीता परवडणारी घरे'अंतर्गत घाटकोपर, रमाबाई आंबेडकर नगर झोपडपट्टीचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून घाटकोपर रमाबाई आंबेडकर नगर येथील ३३.१५ हेक्टर क्षेत्राचा विकास करताना १६ हजार ५७५ झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन कण्यात येणार आहे. या झोपडीधारकांच्या सर्व्हेक्षणाचे काम झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून सुरु आहे. हे काम गतीने सुरु असून आत्तापर्यंत १० हजार झोपड्यांचे सर्व्हेक्षण पूर्ण झाले असल्याची माहिती झोपू प्राधिकरणातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.
 
घाटकोपर येथील रमाबाई आंबेडकर नगर येथील अंदाजित एकूण ३३१४९५.४४ चौ.मी. (३३.१५ हे.) इतक्या जागेचा विकास करून तेथील अंदाजे १६,५७५ झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या झोपड्यांच्या पुनर्विकासासाठी एमएमआरडीए आणि एसआरएमध्ये संयुक्त भागीदारी करार करण्यात आला आहे. ज्यामुळे या भागाचा सुनियोजित विकास होऊन तेथील नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी मदत होणार आहे.
 

हे वाचलंत का? - बदलापूरमध्ये केमिकल कंपनीला आग


या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेमुळे पूर्व मुक्त मार्ग (इस्टन फ्री वे) विस्तार प्रकल्पाकरिता लागणाऱ्या जमिनीचा काही भाग रमाबाई आंबेडकरनगर झोपडपट्टीने बाधीत होणारी जमीन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणास विनामुल्य उपलब्ध होणार आहे. त्यासोबतच या योजनेमुळे प्राधिकरणास अंदाजित ५००० सदनिका उपलब्ध होणार आहेत.
 
याच पार्श्वभूमीवर प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून १५ मार्च रोजी सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली. प्राधिकरणाच्या माध्यमातून येणाऱ्या टीमला स्थानिकांचे संपूर्ण सहकार्य मिळत असल्याने या सर्व्हेक्षणात गती मिळत असल्याचेही प्राधिकरणातील अधिकाऱ्यांनी सांगितले. पाच टीम रमाबाई आंबेडकर नगर झोपडपट्टी परिसरात सर्वेक्षणासाठी जातात. या पाच टीममध्ये प्रत्येकी ५ सभासद आहेत.

या टीम दिवसभरात ३५० ते ४०० कुटुंबांची माहिती जमा करतात. डिजिटलपद्धतीने आणि कागदपत्रांच्या छायांकित प्रति अशा दोन्ही पद्धतीचे कागदपत्रे एसआरएच्या माध्यमातून गोळा जमा करून घेतली जात आहेत. ही संपूर्ण माहितीची आणि कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर पात्रता निश्चिती करण्यात येणार आहे.