मिरजेच्या सतार तानपुऱ्याला भौगोलिक मानांकन

    01-Apr-2024
Total Views |
 
miraj
 
मुंबई : एखाद्या प्रदेशातील एखादी वस्तू विशेष प्रसिद्ध असेल तर त्या ठिकाणी ती तयार झालेली असल्याचे सिद्ध करण्यासाठी त्या त्या वस्तूला भौगोलिक मानांकन म्हणजे जिऑग्राफिकल इंडेक्स लाभते. यापूर्वी पेण येथील गणपतीला हे मानांकन प्राप्त झाले आहे. त्याप्रमाणे शास्त्रीय गायनात मृदू स्वरांची साथ देणार्याग मिरजेतील सतार, तानपुरा या वाद्यांना भौगोलिक मानांकन मिळाले आहे. पांरपारिकता व विशिष्ट गुणवत्तेच्या जोरावर हे मानांकन मिळाले असून यामुळे जागतिक पातळीवर या वाद्यांना चांगले मोल मिळणार आहे.
 
याबाबत पत्रकारांना माहिती देताना बाळासाहेब मिरजकर यांनी सांगितले, "वाणिज्य व उद्योग मंडळाच्या उद्योग प्रोत्साहन अंतर्गत व्यापार विभागातून मानांकन मिळाले आहे. मिरज म्युझिकल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर या संस्थेने मिरज सितार व सोलटुन म्युझिकल इन्स्ट्रुमेंट प्रोड्युसर कंपनी या संस्थेने मिरज तानपुरा या वाद्यांचे मानांकन प्रस्ताव सादर केले होते. मानांकन मिळवण्यासाठी नाबार्ड, हस्तकला विभाग कोल्हापूर, उद्योग विभाग सांगली यांचे सहकार्य लाभले व पद्मश्री डॉ. रजनीकांत (जीआय) एक्स्पर्ट संस्थेच्या माध्यमातून हे प्रस्ताव दाखल करण्यात आले होते."
 
ते पुढे म्हणाले, "गेल्या सहा पिढ्यांनी मिरजेतील तंतूवाद्य निर्मितीची वेगळी शैली जपत नाविन्यपूर्णता देण्याचा प्रयत्न केला आहे. स्थानिक पातळीवर उपलब्ध होणारे कठीण लाकूड आणि माणदेशातील सांगोला, बेगमपूर, मंगळवेढा भागातील कडू भोपळा याचा वापर करून त्यावर कलाकुसर करून सतार व तानपुरा याची निर्मिती करण्यात येते. या तंतूवाद्यांना जगभरातून मागणी असून जर्मनी, इंडोनेशिया, मलेशिया, इंग्लड, अमेरिका, जपान, फ्रान्स आदी देशात या तंतूवाद्यांना मागणी आहे. भौगोलिक मानांकन मिळाल्याने या तंतूवाद्यांवर गुणवत्तेची मोहोर उमटली असून यापुढे मिरज सितार आणि मिरज तानपुरा या नावाने या वाद्यांची विक्री करता येणार नाही."
 
यावेळी मिरज म्युझिकल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरचे अध्यक्ष मोहसीन मिरजकर, सोलट्युन म्युझिकल इन्स्ट्रुमेंट प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष मुबीन मिरजकर, संचालक अल्ताफ पिरजादे, फारुक सतरमेकर,नासीर मु, रियाज सतरमेकर आदी उपस्थित होते.