मुंबई : केरळच्या वायनाड येथील 'एसएफआय'च्या गुंडगिरी विरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये मंगळवार, दि. १२ मार्च रोजी जोरदार घोषणाबाजी केली. 'सिद्धार्थ'ला न्याय मिळेपर्यंत लढा चालूच राहणार, असे म्हणत केरळ सरकारचा निषेधार्थ अभाविने यावेळी तीव्र निदर्शने केल्याचेही दिसले.
सिद्धार्थ हा वायनाड येथील व्हेटर्नरी आणि एनिमल सायन्स विद्यापीठातील द्वितीय वर्षाचा विद्यार्थी होता. दि. १८ फेब्रुवारी रोजी 'एसएफआय'च्या कार्यकर्त्यांकडून होणाऱ्या मानसिक व शारीरिक त्रासाला कंटाळून सिद्धार्थने आत्महत्या केली होती. याप्रकरणी सिद्धार्थला न्याय मिळावा या मागणीखातर अभाविपने मंगळवारी देशभरात निदर्शने केली.
अभाविप कोकण प्रदेश मंत्री संकल्प फळदेसाई यावेळी म्हणाले की, "एसएफआयच्या गुंडगिरीला केरळच्या कम्युनिस्ट पक्षाच्या सरकारचे समर्थन आहे. केरळमध्ये कायदा सुव्यवस्था धोक्यात आली आहे. एसएफआयच्या गुंडांना शिक्षा होऊन सिद्धार्थला न्याय मिळेपर्यंत अभाविपचा लढा चालूच राहील."
मुंबई महानगर मंत्री निधि गाला म्हणाल्या की, एसएफआयच्या कार्यकर्त्यांकडून सामान्य विद्यार्थ्यांची रॅगिंग करणे, त्यांच्यावर हल्ला करणे, त्यांची नग्न धिंड काढणे यातून एसएफआयचा विद्यार्थी विरोधी चेहरा स्पष्ट होतो. एसएफआयची दहशत देशभरातील विद्यार्थी सहन करणार नाही. सिद्धार्थच्या न्यायासाठीचा लढा चालूच राहील."