मुंबई: आजच्या तंत्रयुगात माहितीच्या विस्फोटामुळे आपापसातील संवाद हरवत चालला आहे. असे प्रतिपादन छत्रपती शिक्षण मंडळाचे कार्यकारिणी सदस्य महेश देशपांडे यांनी केले. छत्रपती शिक्षण मंडळाच्या सानपाडा स्थित विवेकानंद संकुलाच्या ३० वा वर्धापन दिन नुकताच संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.
उपस्थितांना संबोधत पुढे ते म्हणाले, माणसातील हरवत चाललेला संवाद, नात्यात आलेल्या यांत्रिकपणा, त्याचे समाजात जाणवणारे दुष्परिणाम आणि परिणामी एकलकोंडेपणातूच होणाऱ्या आत्महत्या या सर्वांवरचा रामबाण उपाय म्हणजे आपण आपल्या भावना योग्य ठिकाणी व्यक्त करत राहणे. त्यासाठी केवळ मोबाईल सारख्या कृत्रिम साधनावर अवलंबून न राहता आपल्या आप्तस्वकीयांशी मनमोकळेपणाने प्रत्यक्ष संवाद साधणे गरजेचे आहे.
प्रमुख अतिथी म्हणून वैद्यकीय सेवेत कार्यरत असलेल्या सानपाडा परिसरातील डॉ. मेघना जाधव उपस्थित होत्या. त्यांनी आपल्या मनोगतातून त्यांचा शालेय भूतकाळ उलगडत आज विद्यार्थ्यासोबत पालकांनाही समुपदेशनाची कशी गरज आहे ? हे सविस्तर सांगितले तसेच शिक्षकाचे जीवनातील महत्त्व आणि मानवाच्या प्रगतीतील त्याचे योगदानही विषद केले .
संकुलाच्या मराठी पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. सुवर्षा सागवेकर यांनी आपल्या भावस्पर्शी मनोगतात सांगितले की, परिसराची गरज लक्षात घेऊन 3 जुलै 1995 रोजी सिडको कडून अतिशय अल्प खोल्यांमधील ही शाळा छत्रपती शिक्षण मंडळाने आपल्यात वर्ग करून घेतली. आज सुमारे ३ दशकानंतर तीन हजार विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत.
कार्यक्रमादरम्यान प्राथमिक विभागाच्या निसर्ग या हस्तलिखिताचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सारिका मिसाळ यांनी केले. तर सौ. ऋतुजा गवस यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमासाठी संकुलातील सर्व विभागाचे मुख्याध्यापक व शिक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते.
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक