गोस्त हाये पृथ्वी मोलाची...

    05-Feb-2024   
Total Views |
Keshav Laxman Kshatriya

जळगावचे यशस्वी उद्योजक केशव लक्ष्मण क्षत्रिय. प्रामाणिक कष्ट आणि समाजशीलता जपत केशव यांनी स्वतःचे अस्तित्व निर्माण केले. त्यांच्या कर्तृत्वाचा घेतलेला हा वेध...

ऐंशीचे दशक. आठवी इयत्तेत शिकत असलेला तो मुलगा. शिकता-शिकता कपड्याच्या दुकानात काम करायचा. त्या दिवशी त्याला पगाराचे दीडशे रूपये मिळाले. “किराणामालाच्या दुकानात जाऊन, उधारीचे दीडशे रूपये देऊन नव्याने उधारीवर धान्य घे,” असे त्याच्या आईने त्याला सांगितलेले. त्यामुळे पगार घेऊन, तो दुकानात गेला. दुकानदाराने मोठ्या गोडीने त्याच्याकडून उधारीचे दीडशे रूपये घेतले. त्यानंतर मात्र त्याने त्या मुलाकडे ढुंकूनही पाहिले नाही. मुलगा म्हणत राहिला की, ”शेठजी, पैसे दिले; आता सामान द्या.’‘ परंतु, दुकानदाराने उधारीवर धान्य द्यायला नकार दिला. त्या दिवशी एकादशी होती आणि त्याच्या घरी त्याच्यासकट सगळ्यांचा एकादशीचा उपवास होता. उपवास कसा सोडणार? सगळ्यांनी एकादशीचा उपवास चहा आणि बाजरीच्या भाकरीवर सोडला. चहा आणि चतकोर भाकरीवर उपवास सोडताना, त्या मुलाचे अश्रू अनावर झाले. हे दिवस बदलायलाच हवेत, हा निर्धार त्या मुलाने केला. तो मुलगा होता-पारोळ्याचा केशव लक्ष्मण क्षत्रिय.

आज केशव यांचे पारोळा येथे ’अमृत कलेक्शन’ नावाचे सगळ्यात मोठे कपड्याचे शोरूम आहे. धुळे येथे ‘अमृत साडी’ आणि शिरपूर येथे ’अमृत टेक्सटाईल’ म्हणून शोरुम्स आहेत. ते सोमवंशी क्षत्रिय समाजाचे माजी अध्यक्ष असून, सध्या समाजाचे महाराष्ट्र प्रांतिक खजिनदार आहेत. तसेच ते ‘पारोळा व्यापारी महासंघा’चे तसेच ’भाग्यलक्ष्मी नागरी पतसंस्थे’चे अध्यक्ष आहेत. ’बुलढाणा अर्बन बँके’चे तज्ज्ञ संचालक असून, ’नागरी शिक्षण मंडळा’चे उपाध्यक्ष आहेत. पारोळ्यातील ’बालाजी संस्थे’चे ते विश्वस्त आहे. चतकोर भाकर अश्रूसोबत खात, एकादशीचा उपवास सोडणार्‍या, केशव क्षत्रिय यांचे कर्तृत्व खरेच मोठे आहे. ‘नाही रे’ परिस्थितीतून स्वतःसोबत समाजाचेही नाव उज्ज्वल करणार्‍या, केशव यांच्या आयुष्याचा मागोवा घेतला तर जाणवते की, प्रामाणिक कष्टाशिवाय पर्याय नाही. लक्ष्मण आणि कुसूम क्षत्रिय हे मूळचे पारोळा-जळगावचेच. त्यांना सात अपत्ये. त्यापैकी केशव सगळ्यात मोठे. लक्ष्मण यांचे छोटेसे कपड्याचे दुकान. मात्र, ते बंद पडले. बेरोजगारी, गरिबी यांमुळे क्षत्रिय कुटुंबाच्या घरचे वासे फिरले. मात्र, याही परिस्थितीत लक्ष्मण आणि कुसूमबाई मुलांना कष्टाचे प्रामाणिकतेचे संस्कार देत असत.

 कुसूमबाई केशव यांना म्हणत की, ”तुला शिकलेच पाहिजे!“ आईची इच्छा अणि परिस्थिती बदलण्याची जिद्द, यांमुळे केशव यांनी शिक्षण पूर्ण करण्याचा निर्धार केला. ते सकाळी दूध विकायचे, त्यानंतर पेपर टाकायचे. तद्नंतर महाविद्यालयात जायचे आणि दुपारी कपड्याच्या दुकानात काम करायचे. या सगळ्या कामातून वेळ मिळाला की, अभ्यास करायचे. ते जिथे काम करत, त्या कपड्याच्या दुकानाचे मालक जगदिश अग्रवाल हे विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी होते. 90च्या दशकात त्यांच्याकडे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे प्रमुख मंहत नृत्यगोपाल दास महाराज यायचे. त्यावेळी केशव यांनाही महाराजांचा आशीर्वाद, स्नेह लाभला. त्यामुळे आणि प्रभू श्रीरामांच्या भक्तीमुळे केशव दरवर्षी अयोध्येला रमाललांच्या दर्शनाला जातात.असो. केशव यांनी ’एम.कॉम’पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी उधारीवर कपडे, साड्या गावोगावी विकण्याचा व्यवसाय सुरू केला. गावोगावी जाऊन साड्या, कपडे विकत असल्याने, त्यांना लोकांची कपड्यासंदर्भातील आवड समजू लागली. पुढे त्यांनी दहा बाय दहाचा छोटा गाळा भाड्याने विकत घेतला. कपड्याचे दुकान टाकले. बघता-बघता केशव यांनी 26 गाळे भाड्याने विकत घेतले. पुढे त्यांनी पारोळ्यात स्वतःचे शोरूम बांधले.

पैशाने पैसा जोडला जातो असे म्हणतात; मात्र केशव यांनी माणसांनाही जोडले. समाजासाठी ते काम करू लागले. विशेषतः गरीब, गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी त्यांनी कधीही हात आखडता घेतला नाही. याला कारण ती घटना. तेव्हा केशव दहावीला होते. परीक्षा फॉर्म भरण्याचे शुल्क 40 रूपये होते. पण, केशव यांच्याकडे पैसे नव्हते. त्यांनी एका सधन व्यक्तीकडे 40 रूपये मागितले. तेव्हा ती व्यक्ती म्हणाली, ”पैसे तर देऊ शकतो; पण तू कधी फेडणार? तुला काय वाटते, मी तुला पैसे देईन? तुझा पगार तर सगळा घरच्या गरजांवर खर्च होतो. मला नाही वाटत, तू माझे पैसे परत देऊ शकशील.” त्या माणसाने पैसे देण्यास नकार दिला. त्यावेळी आईने घरची परंपरागत वारसा म्हणून आलेली नथ सोनाराकडे मोडली आणि मग केशव यांनी दहावीच्या परीक्षेचा अर्ज भरला. केशव यांना आजही ते आठवते, त्यामुळे कुणाही विद्यार्थ्याला असा अनुभव येऊ नये आणि त्याने शिक्षण सन्मानाने पूर्ण करावे, यासाठी केशव गरीब, गरजू विद्यार्थ्यांना जमेल ते सहकार्य करतात. आपल्या आयुष्याबद्दल ते म्हणतात की, ”महंत नृत्यगोपाल दास महाराजांमुळे आयुष्याला आध्यात्मिक वळण लागले. शुद्ध भाव आणि प्रामाणिक कष्ट याला पर्याय नाही. ’मन सुद्ध तुझं गोस्त हाये पृथ्वी मोलाची’ खरेच आहे. केशव यांनी आयुष्यातील नकारात्मक अनुभवांचे भांडवल न करता, परिस्थितीला बदलण्याचा संकल्प केला. प्रतिकूल परिस्थितीवर मात करू इच्छिणार्‍या लोकांसाठी केशव यांचा तो परिस्थिती बदलण्याचा संकल्प म्हणजे ’गोस्त हाये पृथ्वी मोलाची’ असेच म्हटले पाहिजे.आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.