मुंबई : जुन्नर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित शिवनेरी संग्रहालय उभारणार असल्याची माहिती राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यांनी राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यावेळी ते बोलत होते.
शिवसंग्राहलयाविषयी बोलताना अजित पवार म्हणाले की, "आपण सर्वांनीच नुकतीच छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी केली. त्यानिमित्त राज्याच्या प्रेरणादायी इतिहासाची साक्ष देणारा भव्य हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२४ पुणे जिल्ह्यातील जुन्नरमध्ये संपन्न झाला. मौजे वडज तालुका जुन्नर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित शिवनेरी संग्रहालय उभारण्याचे शासनाने निश्चित केले आहे. यात वस्तू संग्रहालय, शिवकालीन गाव, किल्ल्यांची प्रतिकृती आणि खुले सभागृह इत्यादी बाबींचा समावेश असेल," अशी माहिती त्यांनी दिली.
ते पुढे म्हणाले की, "छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष राज्यात सध्या साजरे करण्यात येत आहे. याअनुषंगाने संपुर्ण राज्यात शिवरायांच्या अलौकिक आणि प्रेरणादायी कार्याचा प्रसार विविध कार्यक्रमांद्वारे करण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे साक्षीदार असलेल्या महाराष्ट्रातील ११ गडकिल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा देण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारने युनेस्कोला पाठवला आहे," असेही त्यांनी सांगितले.