लोकसभेत संविधानावर चर्चा, पंतप्रधान देणार उत्तर

भाजप आणि काँग्रेसतर्फे तीन ओळींचा ‘व्हिप’ जारी

    13-Dec-2024
Total Views | 52
Loksabha

नवी दिल्ली : भारतीय राज्यघटनेवरील नियोजित चर्चेदरम्यान दि. १३ डिसेंबर आणि दि. १४ डिसेंबर रोजी सभागृहात उपस्थित राहण्यासाठी भाजप आणि काँग्रेस पक्षाने त्यांच्या सर्व लोकसभा ( Loksabha ) सदस्यांना तीन ओळींचा ‘व्हिप’ जारी केला आहे.

लोकसभेतील सर्व भाजप सदस्यांना याद्वारे कळविण्यात येते की, भारतीय संविधान स्वीकारल्याच्या ७५व्या वर्धापन दिनानिमित्त लोकसभेत शुक्रवार, दि. १३ डिसेंबर आणि शनिवार, दि. १४ डिसेंबर रोजी चर्चा होणार आहे. त्यासाठी भाजपच्या सर्व सदस्यांनी शुक्रवार, दि. १३ डिसेंबर आणि शनिवार, दि. १४ डिसेंबर रोजी दोन्ही दिवस सभागृहात सकारात्मकपणे उपस्थित राहण्याची आणि सरकारच्या भूमिकेस पाठिंबा देण्याची विनंती करण्यात येत असल्याचे भाजपने म्हटले आहे.

प्राप्त माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी लोकसभेत चर्चेला उत्तर देणार आहेत. त्याचप्रमाणे, दि. १६ डिसेंबर रोजी केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शाह राज्यसभेत चर्चेला सुरुवात करतील.

राज्यसभेत गदारोळ कायम

‘सोनिया गांधी-सोरोस यांच्यातील संबंध आणि काँग्रेसकडून राज्यसभा सभापतींचा अपमान’ या मुद्द्यांवरून गुरुवारीदेखील राज्यसभेत गदारोळ झाला. काँग्रेसतर्फे पत्रकार परिषद घेऊन सभापतींचा अपमान केला जातो. त्याचप्रमाणे, काँग्रेसच्या अधिकृत ‘एक्स’ हँडलवरून सभापतींचा उल्लेख ‘चेअर लीडर’ असा करण्यात आला आहे. त्यामुळे काँग्रेस संविधानिक पदांचा मान ठेवत नसल्याचा आरोप नड्डा यांनी केला. त्याचप्रमाणे, राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या कथित वक्तव्याप्रकरणी काँग्रेसचा स्थगन प्रस्ताव फेटाळून लावला.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121