९० वेळा जनतेने नाकारलेल्यांकडून संसद वेठीस : पंतप्रधान नरेंद्र मोदी

संसदेच्या हिवाळी अधिवेशनास आरंभ

    26-Nov-2024
Total Views |
Narendra Modi

नवी दिल्ली : “देशातील जनतेने ८० ते ९० वेळा नाकारलेल्यांकडून संसदेत गोंधळ घालून कामकाजास वेठीस धरण्याचे प्रयत्न सातत्याने होत आहेत. त्यामुळे अशा घटकांना जनताच शिक्षा देते,” असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांनी सोमवार, दि. २५ नोव्हेंबर रोजी केले.

संसदेच्या हिवाळी अधिवेशनास सोमवारपासून प्रारंभ झाला असून अधिवेशन दि. २० डिसेंबर रोजीपर्यंत चालणार आहे. अधिवेशनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, “आपली संसद हे राज्यघटनेचे महत्त्वाचे एकक आहे. त्याचप्रमाणे, खासदारदेखील महत्त्वाचे आहेत. संसदेत निरोगी चर्चा व्हावी, अधिकाधिक लोकांनी चर्चेला हातभार लावणे आवश्यक आहे. मात्र, दुर्दैवाने आपल्या राजकीय स्वार्थासाठी जनतेने नाकारलेले काही लोक मूठभर लोक संसदेवर नियंत्रण ठेवण्याचा सतत प्रयत्न करत आहेत.

अर्थात, संसदेचे कामकाज थांबवण्याचे त्यांचे मुख्य उद्दिष्ट क्वचितच यशस्वी ठरते. परंतु, अशा वागण्यामुळे सर्व पक्षांतून नवनवीन कल्पना आणि ऊर्जा घेऊन संसदेत आलेल्या नव्या खासदारांच्या अधिकारांवर गदा येत आहे,” असे पंतप्रधानांनी सांगितले.
“अनेकदा या नव्या सदस्यांना सदनात बोलण्याची संधी नाकारली जाते. लोकशाही परंपरेत, संसद सदस्यांच्या प्रत्येक पिढीवर आगामी पिढ्यांची तयारी करवून घेण्याची जबाबदारी असते. मात्र, ज्यांना लोकांनी सतत, ८०-९० वेळा नाकारले आहे, असे लोक संसदेत चर्चा तर होऊ देतच नाहीत, पण त्याचबरोबर लोकशाही तत्त्वे किंवा जनतेच्या आकांक्षा यांचादेखील आदर करत नाहीत. जनतेप्रति असलेली जबाबदारी अशा लोकांना समजतच नाही. परिणामी, लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात ते सतत अपयशी होत राहतात आणि त्यातून मग निवडणुकीतही जनता त्यांना पुनःपुन्हा नाकारते,” असा टोला पंतप्रधानांनी यावेळी लगावला.