तिरुवनंतपुरम, केरळमधील एका तृतीयपंथीयाने पलक्कडचे आमदार आणि काँग्रेस नेते राहुल ममकुटाथिल यांच्यावर विनयभंगाचा आरोप केला आहे. राहुल यांनी माझ्यावर बलात्कार करण्याची इच्छा असल्याचा संदेश पाठवल्याचे या तृतीयपंथीयाने तक्रारीमध्ये म्हटले आहे.
केरळमधील काँग्रेसचे आमदार राहुल ममकुटाथिल यांनी बलात्कार करण्याची इच्छा असून, तो आपण बंगळुरु किंवा हैदराबाद येथे जाऊन करू, असा संदेश पाठवल्याचा आरोप एका तृतीयपंथीयाने केला आहे. सुरुवातीला या दोघांची मैत्री निवडणुकीदरम्यान झाली होती. मात्र, नंतर सातत्याने राहुल यांचे वागणे अधिकच घृणास्पद होत गेल्याचेही तक्रारदाराने म्हटले आहे.
केरळ काँग्रेसमध्ये लैंगिक छळाचे आरोप होण्याची ही पहिलीच वेळ नसून, याआधीही महिला युवानेत्या रिनी ज़ॉर्ज यांनीही त्यांना पक्षातील एका नेत्याने अश्लील संदेश पाठवल्याचे आणि हॉटेलमध्ये बोलावल्याचे आरोप केले होते. मात्र, त्यांनी आरोपात कोणाचेही नाव घेतले नाही. त्यानंतर हनी भास्करन यांनी राहुल यांच्यावर अश्लील संभाषण करण्याचा आरोप करत, त्यांच्या पदाचा राजीनामा दिला होता. तसेच, त्यांनी केलेल्या तक्रारीला केरळ काँग्रेसने न्याय न दिल्याची खंतही व्यक्त केली होती.
या आरोपांनंतर राहुल ममकुटाथिल यांनी पक्षातील पदाचा राजीनामा दिला असून, हा राजीनामा कोणत्याही आरोपांच्या दबावाखाली न देता पक्षातील तरुणांना संधी देण्यासाठी देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
राहुल यांच्या राजीनाम्यावर केरळच्या मंत्री आणि सीपीआय नेत्या आर बिंदू म्हणाल्या की, आमदार राहुल ममकुटाथिल यांच्यावर अनेक महिलांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी आमदारपदाचा राजीनामा देणे अत्यंत आवश्यक आहे. त्यांनी युवक काँग्रेसच्या पदाचा राजीनामा दिला आहे. समाजाचे रक्षण करण्यासाठी त्यांनी आमदारकीचाही राजीनामा देणे आवश्यक आहे.फफ