आसाममधील घुसखोरीवर आता जालीम उपाय; १८ वर्षांवरील नागरिकांना आधार कार्ड मिळणार नाही

    22-Aug-2025
Total Views |


मुंबई : आसाममधील घुसखोरांना तोंड देण्यासाठी सरकारने मोठी घोषणा केली आहे. आसाम सरकारने निर्णय घेतला आहे की, १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी आधार कार्ड बनवले जाणार नाही. गुरुवारी २१ ऑगस्ट रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा म्हणाले की, 'बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरितांना आधार कार्ड मिळण्यापासून रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.'

मुख्यमंत्री हिमंता म्हणाले की, ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून हा निर्णय लागू केला जाईल. जर एखाद्याकडे आधार कार्ड नसेल तर तो सप्टेंबर महिन्यात त्यासाठी अर्ज करू शकतो. अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि चहाच्या शेतातील मजूर समुदायातील लोक पुढील एक वर्षासाठी आधार कार्ड बनवू शकतील. कारण त्यांची आधार सॅच्युरेशन ९६% आहे, म्हणजेच ४% लोकांचा समावेश अद्याप बाकी आहे.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की राज्यात आधार सॅच्युरेशन १०३% पर्यंत पोहोचले आहे, याचा अर्थ १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्व व्यक्तींकडे आधार कार्ड आहे. आधार सॅच्युरेशन १०३% असण्याचा अर्थ असा की जर लोकसंख्या १०० असेल तर १०३ आधार कार्ड जारी केले गेले आहेत. बांगलादेशी घुसखोरांनाही आधार कार्ड दिले गेले असण्याची शक्यता आहे.परदेशातील कोणीही व्यक्ती बेकायदेशीर आसाममध्ये प्रवेश करून आधार कार्ड मिळवू शकत नाही आणि भारतीय नागरिक असल्याचा दावा करू शकत नाही. आम्ही तो मार्ग पूर्णपणे बंद केला आहे.