मुंबई, दि.२६: विशेष प्रतिनिधी बहुप्रतिक्षित समृद्धी महामार्गाचा इगतपुरी ते आमने शेवटचा टप्पा येत्या महिनाभरात सुरू होईल अशी माहिती महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. म्हणजेच मंत्रिमंडळ स्थापनेनंतर नव्या मुख्यमंत्र्यांच्या हस्तेच या मार्गाचे लोकपर्ण होण्याचे संकेत मिळत आहे.
महाराष्ट्राच्या विकासाला गती देण्यासाठी समृद्धी महामार्ग बांधण्याची योजना तयार करण्यात आली. मुंबई ते नागपूर दरम्यान ७०१ किमी लांबीचा महामार्ग आहे. या महामार्गावरील ६२५ किलोमीटरचा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. आता महामार्गावरचा आमणे ते इगतपुरी हा शेवटचा टप्पाची कामे अंतिम टप्प्यात असून येत्या महिनाभरात या मार्गाचे लोकार्पण करण्यात येईल अशी माहिती महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. या मार्गामुळे मुंबई नागपूर हे अंतर केवळ सात ते आठ तासांत पार होणार आहे.
महाराष्ट्र सरकारच्या महत्वाकांक्षी रस्ते प्रकल्प असणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या शेवटचा इगतपुरी ते आमने हा टप्पा लवकरच पूर्ण होणार आहे. या ग्रीनफिल्ड महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे कामे पूर्ण झाले असून येत्या महिनाभरात हा मार्ग नागरिकांसाठी खुला करण्यात येईल, अशी माहिती मिळते आहे. इगतपुरी ते ठाणे दरम्यान ७६ किलोमीटर लांबीच्या महामार्गत १६ पूल आणि ४ बोगदे बांधण्यात येत आहेत. या टप्प्यात इगतपुरी, खुटघर शहापूर व आमणे येथे इंटरचेंज येतात. पॅकेज १६ मध्ये १ रेल्वे ओलांडणी पूल बांधण्यात आलेला आहे.
देशातील सर्वाधिक रुंदीचा बोगदा
सह्याद्रीच्या पर्वतरांगामधून खडतर मार्ग काढत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हे अभियांत्रिकी आव्हान समर्थपणे पेलले. या टप्प्यामध्ये एकूण ५ बोगदे असून एकूण लांबी ११ कि. मी. आहे. त्यातील पॅकेज १४ (इगतपुरी) येथील ८ कि. मी. चा बोगदा महाराष्ट्रातील सर्वात लांब बोगदा आहे. तसेच हा देशातील सर्वाधिक रुंदीचा (१७.६१ मीटर) बोगदा आहे. या बोगद्याची उंची ९.१२ मीटर आहे. या बोगद्यामुळे अवघ्या आठ मिनिटात इगतपुरी ते कसारा हे अंतर पार करता येणार आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग क्र.३ नाशिक महामार्गावरील कसारा घाटाला पर्यायी मार्ग उपलब्ध झाल्यामुळे वाहतूक अधिक जलद होणार आहे.
सर्वाधिक लांबीचा पूल
या टप्प्यात डोंगर दऱ्यांमुळे तसेच अति पर्जन्यमान असल्यामुळे पुलांचे बांधकाम आव्हानात्मक होते. या टप्प्यात एकूण १५ व्हायाडक्ट (व्हॅली पूल) असून त्यांची एकूण लांबी ११ कि. मी. आहे. त्यापैकी पॅकेज १६ मध्ये सर्वाधिक लांबीचा व्हॅली पूल (व्हायाडक्ट) २.२८ कि. मी. लांबीचा आहे. पॅकेज १५मध्ये खोल दरी असल्यामुळे (व्हायाडक्ट-२) पुलाच्या खांबाची उंची ८४ मीटरपर्यंत असून ती जवळपास २८ मजली इमारतीएवढी आहे. याशिवाय शेवटच्या टप्यात ६ छोटे पूल बांधण्यात आलेले आहेत.